जिज्ञासा
आपण मकरसंक्रांत १४ जानेवारी रोजी साजरी करणार आहोत. गेल्या अंकात मी एक प्रश्न म्हणून विचारला होता की, जर आपले सर्व सण- होळी ते दिवाळी आणि इतर इंग्रजी तारखांप्रमाणे वेगवेगळ्या दिवशी येतात तर दरवर्षी मकर संक्रांतच फक्त १४ जानेवारीला का येते ?
ज्या दिवशी आपण आपले सण साजरे करतो त्या दिवशी चंद्राची कला काय होती हे तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की या सणांचा आणि चंद्रकलेचा काहीतरी संबंध आहे. म्हणजे असे बघा होळी ही आपण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी करतो, तर लक्ष्मीपूजन आपण आश्विन अमावस्येला करतो. पण संक्रांतीचा संबंध हा चंद्राशी नसून सूर्याशी आहे. तो कसा हे बघण्याकरिता आपण थोडं रात्रीच्या ोकाशाकडे बघूया. निरभ्र रात्री आपल्याला आकाशात हजारो तारे विखुरलेले दिसतात. काही काळ निरीक्षण केल्यानंतर आपल्याला त्यात काही चित्र दिसायला लागतात. म्हणजे कुठेतरी एका रेषेत तीन तारे तर दुसरीकडे कुठेतरी चार ताऱ्यांचा चौकोन. या आकारांचा खुद्द ताऱ्यांशी तसा काही संबंध नसतो. ही फक्त मानवी मेंदूची करामत आहे.आपल्या पूर्वजांनी कल्पना करून काही चित्र निर्माण केली. जसं लहान मुलांच्या पुस्तकात ठिपक्यांना ठिपके जोडून चित्र तयार होतं साधारण तसंच. आपल्या पूर्वजांना कुठे सिंह तर कुठे हरीण दिसलं. त्यांचा उद्देश आकाशात चित्र तयार करण्याचा कदाचित नसावा, पण हे तारे लक्षात ठेवण्याकरिता ती एक गरज होती.
पृथ्वी सूर्याची एक परिक्रमा सुमारे ३६५ दिवसात पूर्ण करते. त्यामुळे क्रमाक्रमाने सूर्याची सापेक्ष स्थिती या आकृत्यांमध्ये बदलत असते. आता तुम्ही म्हणाल की, आपल्याला दिवसा तर तारे दिसत नाहीत तर मग आपल्याला या आकृत्यांच्या सापेक्षात सूर्याची बदलती स्थिती कशी कळेल, तर हे ओळखणं तसं अवघड नाही. जी आकृती मध्यरात्री डोक्यावर असेल त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेच्या आकृतीच्या दिशेने सूर्य असेल. या आकृत्यांना आपण तारकासमूह म्हणून ओळखतो. अशा एकंदर ८८ तारकासमूहांची यादी खगोलशास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय संघाने केली आहे. यातील १२ तारकासमूह असे आहेत की फक्त त्यांच्याच दिशेने सूर्य किंवा इतर ग्रह आपल्याला दिसतात. म्हणजे असे की सूर्य कधी सप्तर्षीमध्ये असणार नाही. या बारा तारकासमूहांना आपण राशी म्हणून ओळखतो. बोली भाषेत म्हणायचं झालं तर सूर्याचा प्रवास क्रमाने वेगवेगळ्या राशींमधून होत असतो आणि ज्या दिवशी सूर्याचा प्रवास एका राशीतून दुसऱ्या राशीत होतो किंवा संक्रमण होते ती त्या राशीची संक्रांत असते. स्वाभाविक अशा वर्षांतून बारा संक्रांती होतात. यातील सर्वात महत्त्वाची संक्रांत म्हणजे मकर संक्रांत.
या दिवशी सूर्याचा प्रवास धनू राशीतून मकर राशीत होतो, पण मग तुम्ही विचाराल की या बारा संक्रांतीतील या एका संक्रांतीला एवढे अनन्यसाधारण महत्त्व का, तर त्याचा शोध घेण्यासाठी आता आपल्याला जावं लागेल जवळ जवळ दीड हजार वर्ष मागे, पण त्या आधी आपण पृथ्वीकडे वळूया. पृथ्वीचा अक्ष पृथ्वी ज्या कक्षेत सूर्याची परिक्रमा करते त्या कक्षेच्या पातळीला कललेला आहे. त्याचा परिणाम असा की आपल्याला सूर्याचे उत्तरायण किंवा दक्षिणायन होताना दिसते. दर आयनाचा कालावधी सुमारे ६ महिन्यांचा असतो. उत्तरायणाच्या कालावधीत दिवस मोठा होत जातो, तर दक्षिणायनाच्या कालावधीत दिवस लहान, तर रात्रीचा कालावधी मोठा होत जातो. तसेच पृथ्वी ज्या अक्षावर स्वत:भोवती फिरत आहे.
या अक्षाला आपण काल्पनिक रेषेने उत्तर दिशेकडे वाढवलं ही रेषा आपल्याला एका ताऱ्याजवळ घेऊन जाते. हा तारा म्हणजे ध्रुवतारा असतो. तसेच पृथ्वी आपल्या अक्षावर परिक्रमा करत असताना तिच्या अक्षाची दिशा बदलत असते, फिरत्या भोवऱ्याच्या अक्षासारखी. तर तुमच्या सारख्या चाणाक्ष वाचकांनी नक्कीच ओळखलं असेल की तसं असेल तर ध्रुवतारा काही नेहमीच उत्तर दिशेला होता किंवा असणार नाही.
पृथ्वीच्या (किंवा कुठल्याही फिरत्या पदार्थाच्या) अक्षाच्या अशाप्रकारे दिशा बदलण्यास परांचन म्हणतात.जवळ जवळ अडीच हजार वर्षांपूर्वी खुद्द खगोलीय उत्तर ध्रुवापासून आपला सध्याचा ध्रुवतारा हा सुमारे ९ अंश दूर होता आणि त्या काळात ज्या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते त्याच दिवशी सूर्याचा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होत होता. म्हणजे एकूण सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी मकर संक्रांत ही २१-२२ डिसेंबर रोजी होत होती. परंतु पृथ्वीचा परांचन गतीमुळे संक्रमणाची तारीख दर सुमारे ७० वर्षांनी एक दिवस पुढे जाते. तर अशाप्रकारे मकर संक्रांतीचा दिवस पुढे पुढे जात सध्या १४ जानेवारीच्या सुमारास होत आहे आणि म्हणून आपण मकर संक्रांत १४ जानेवारी रोजी साजरी करतो. अशाप्रकारे कालांतराने मकर संक्रांत आणि होळी आपण एकाच दिवशी साजरी करू. पण तसं होण्याची शक्यता नाही कारण त्याचपूर्वी जरूर ते बदल दिनदर्शिकेत केले जातील. सुमारे ७० वर्षांपूर्वी प्रसिद्ध शास्त्रज्ञ मेघनाद साहा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय दिनदर्शिकेत बदल सुचवण्याकरिता एका समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीच्या अहवालात मकर संक्रांतीचा पण उल्लेख आहे. समितीच्या अहवालावर चर्चा आपण पुढे कधीतरी करू या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा