साधारणत: दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर विमानविद्येत विलक्षण वेगाने प्रगती होऊ लागली. वाहतूक करणारी प्रचंड आकाराची मालवाहू विमाने, प्रवासी विमाने आणि ध्वनीपेक्षा जास्त वेगाने झेपावणारी लढाऊ विमाने यांसारखे विमानांचे तीन प्रकार अस्तित्वात आले. बोईंग स्कायस्टार, राईट एअर डेव्हलपमेंट सेंटर, डग्लस मॅकेनॉन डिपार्टमेंट एअरबस यांसारख्या जागतिक दर्जाच्या नामवंत संस्था अनेकविध स्वरूपांचे संशोधन करून नवनवीन संकल्पना अस्तित्वात आणू लागल्या.
विशेष करून विमानदलातील लढाऊ विमानांच्या उड्डाणात अपघातांचे किंवा वैमानिकांचे प्राण जाण्याचे प्रमाण जास्त असते. ध्वनीपेक्षा जास्त वेगाने झेपावणारी फायटर्स, बाँबर्स प्रकारची विमाने अक्षरश: आकाशाला चिरत क्षणाक्षणाला मृत्यूशी झुंज देत असतात. मिग, सुखोई यासारख्या लढाऊ विमानामध्ये जास्तीत जास्त दोन वैमानिक एका मागोमाग बसतात. त्या विमानांची लांबी जास्तीत जास्त तीस पस्तीस फूट असते. तासाला आठशे ते हजार किमी वेगाने आणि पाच सहा हजार फूट उंचीवरून वीज कडाडल्यासारखी ध्वनीनिर्मिती करीत फायटर्स दृष्टीआड होतात.
अॅटोमॅटिक, कंट्रोलच्या सहाय्याने विमानांतून बाँब फेकणे, फायरिंग करणे आणि सुरक्षितपणे शत्रूच्या प्रदेशांतून दूर झेपावणे यासारखे फ्लाईंग करण्यात वैमानिकाचे कौशल्य असते. साधारणत: पन्नास ते पंचावन्न मिनिटे उड्डाण करून आपले कार्य उरकणाऱ्या प्रकाराला विमानदलाच्या पारिभाषिक भाषेत ‘सॉर्टी’ असे म्हणतात.
नकाशाच्या सहाय्याने शत्रूच्या एखाद्या महत्त्वाच्या केंद्रावर अचूक बाँबफेक करणे, शत्रूच्या रडारवर धूळफेक करून नेम साधणे, विमानविरोधी तोफांचा मारा चुकवत आपले कार्य, अचूकपणे कमीत कमी वेळात उरकणे यामध्ये वैमानिकाचे कौशल्य पणाला लागते.
अशा स्वरूपाच्या यशस्वी हल्ल्यांची संख्या जास्त असणे हे कोणत्याही नामवंत विमानदलाचे प्राथमिक लक्षण असते. या प्रकारच्या हल्ल्यात अपघातांचे प्रमाण आणि वैमानिकांचे प्रशिक्षण आणि त्याची वृद्धिंगत होणारी क्षमता यासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च असतो.
मालवाहू किंवा मोठय़ा आकाराच्या प्रवासी विमानांमध्ये अपघाताचे प्रमाण खूप कमी असते. समजा एखाद्या प्रसंगी विमान अपघातात सापडल्यास अनुभवी पायलट आपले कौशल्या पणाला लावून विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवू शकतो. यालाच ‘इर्मजन्सी लँडिंग’ असे संबोधतात.
परंतु लढाऊ विमानांचा वेग, त्यांच्यात असलेले इंधन विमानाला झालेला आघात आणि वैमानिकाचे प्राण वाचण्यासाठीचा वेळ यांचा ताळमेळ अचूकपणे साधावा लागतो. अशावेळी आपल्या सीटसह वैमानिक विमानाबाहेर फेकला जाणे आणि प्राण वाचणे याला ‘इजेक्शन सीट’ प्रकार म्हणतात.
दुसऱ्या महायुद्धातील एक निष्णात वैमानिक कॅप्टन ऑडी मर्फी याने वैमानिकाचे प्राण वाचविण्याची प्रणाली तयार करण्यात यश मिळविले. निवृत्ती झाल्यानंतर मर्फीने ओहायो येथील राईट एअर डेव्हलपमेंट सेंटर नावाच्या कंपनीत संचालक म्हणून कामाला सुरुवात केली. त्याचे समवेत जॉन पॉल स्टॉप क्लिफोर्ड वाँग, जॉर्ज निकोल्स इत्यादी तंत्रज्ञांनी निर्मिती प्रक्रियेत भाग घेतला.
प्रथम त्यांनी अॅक्सिलोमिटरची निर्मिती केली. गुरुत्वाकर्षण शक्ती विरुद्ध पृथ्वीपासून आकाशाकडे झेपावणारी खुर्ची मॅकडोनल्ड डग्लस स्पेस सिस्टिम कारखान्यातून तयार करून घेतली. पायलटची खुर्ची दीड सेकंदात, ताशी एक हजार किमी वेगाने जमिनीवरून आकाशात फेकली जाईल, अशी यंत्रणा प्रस्थापित केली. खुर्चीत तीन प्रकारचे पट्टे वैमानिकाभोवती आवळलेले असल्याने त्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहचत नाही. वैमानिकाच्या डोक्यावरील छत क्षणार्धात बाजूला होते आणि खुर्चीसकट वैमानिक आकाशात भिरकावला जातो. साधारणत: त्या दणक्याने वैमानिक विमानापासून चारशे ते पाचशे फूट उंचीवर फेकला जातो.
सर्वोच्च बिंदूवर गेल्यानंतर खुर्चीच्या मागील बाजूस असलेली हवाईछत्री उघडते आणि वैमानिक संथपणे तरंगू लागतो. हवाई छत्रीवर ताबा ठेवत वैमानिक हळूहळू जमिनीवर पोहचतो. आणि त्याचे प्राण वाचतात. अर्थात अशा प्रकारच्या इजेक्शन मूव्हमेंटमध्ये भरपूर सराव करावा लागतो. ऑडी मर्फी याने अशा प्रकारच्या प्राण वाचविण्याच्या प्रयत्नामध्ये भरपूर संशोधन केले आणि अनेक प्रसंगात लढाऊ वैमानिकांचे प्राण वाचू शकले आहेत. ऑडी मर्फीने दुसऱ्या महायुद्धाच्या पाश्र्वभूमीवर काही चित्रपट काढले. त्यात भूमिका केल्या . ते चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा