१९६० पासून अंतराळ संशोधनाचा श्रीगणेशा झाला. रशिया आणि अमेरिका या दोन अतिप्रगत राष्ट्रांनी आपली अस्मिता वृद्धींगत करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च करून संशोधकांसमोर भव्य आव्हानांचे दालन खुले केले. १९५६ मध्ये रशियाने पहिला स्पुटनिक (कृत्रिम उपग्रह) प्रथम पाठवून अंतराळ स्पर्धेत प्रारंभीच आघाडी घेतली.त्यानंतर काही वर्षांत रशियाने लायका नावाची कुत्री पृथ्वी प्रदक्षिणेसाठी यशस्वीपणे पाठविली. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या पलीकडे आणि वजनविरहित अवस्थेत भ्रमण करणारी ती सर्वप्रथम सजीव ठरली.
१९६९ जुलै महिन्यात अमेरिकेचा नील ऑर्मस्ट्राँग यशस्वीपणे चंद्र पृष्ठभागावर उतरला आणि मानवी इतिहासात विलक्षण पराक्रम नोंदला गेला. तेव्हापासून अंतराळ संशोधनाला प्रामुख्याने वेग आला. चंद्र, मंगळ, शुक्र आणि अतिदूर अंतराळाची अनेकविध निरीक्षणे नोंदविण्यास सुरुवात झाली. पृथ्वीबाहेर सजीवसृष्टी आहे काय? मानवापेक्षा प्रगत मानवसृष्टी परग्रहांवर अस्तित्वात आहे काय? चंद्र किंवा इतर ग्रहांवर अंतराळात प्रयोगशाळा, वस्तिस्थाने उभारणे शक्य आहे का? उपग्रहांवर कोणती खनिज संपत्ती किती प्रमाणात उपलब्ध आहे. अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शास्त्रज्ञ कार्यरत होते. खर्चाचा प्रचंड पसारा वाढत गेल्याने राष्ट्रांमधील संशोधन स्पर्धा कमी होऊन सहकार्याने संशोधनाचा टप्पा सुरू झाला.
चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह सर्वात जवळील अंतरावरचा. त्यामुळे त्याच्या संदर्भात जास्तीत जास्त माहिती संकलित करण्यास सुरुवात झाली. चंद्रावरील सर्व घटकांची उपलब्धता प्रमाण आणि अचूक माहिती गोळा करण्यासाठी अनेक प्रकारचे मानवविरहीत उपग्रह चंद्राभोवती आणि अंतराळात भ्रमण करू लागले. अत्याधुनिक यंत्रणा, रिमोट सेन्सिंग यांच्यामार्फत पृथ्वीवरील प्रयोगशाळेत संशोधकांना प्रचंड स्वरुपाची माहिती मिळू लागली. त्या माहितीचे संकलन करून भविष्यातील योजना ठरू लागल्या.
चंद्रावर पाणी, हवा, ऑक्सिजन इत्यादी घटक उपलब्ध नसले तरी तेथे मानवी वसाहत शक्य आहे किंवा नाही याचा पाठपुरावा संशोधक कसोशीने करीत आहेत. .चंद्राभोवती भ्रमण करणाऱ्या असंख्य उपग्रहांच्या बाबतीत एक समस्या सातत्याने त्रस्त करते. ते उपग्रह चंद्राच्या पृष्ठभागांवर आदळल्यास नील ऑर्मस्ट्राँगच्या पदभ्रमणाचे ठसे (पहिल्या मानवी पावलांचे चंद्रावरील ठसे) अनादी अनंत काळापर्यंत जसेच्या तसे रहावेत असा सामंजस्य करार अमेरिका आणि इतर राष्ट्रांमध्ये झालेला आहे. ते नष्ट होऊ नयेत अशी अपेक्षा आहे.
अमेरिकेने २०११ च्या सप्टेंबर मध्ये एब आणि फ्लो नामकरण असलेल्या दोन शासकीय उपग्रहांना चंद्राच्या कक्षेत पाठविले. चंद्राभोवती ठराविक अंतरावरून भ्रमणकक्षा ६ मैलांवर घेण्यात आली. त्या भ्रमणात त्या उपग्रहांमार्फत असंख्य छायाचित्रे आणि गुरुत्वाकर्षण शक्तीच्या नोंदी पृथ्वीवर पाठविण्यात आल्या. १५ डिसेंबर २०१२ रोजी त्या दोन्ही उपग्रहांची कार्यक्षमता संपली. त्यांची भ्रमणकक्षा खालावत जाऊन ते चंद्रपृष्ठभागावर आदळणार अशी परिस्थिती निर्माण झाली. पृथ्वीला सुरुवातीच्या कालखंडात चंद्रासारखेच दोन उपग्रह होते आणि त्यातील एकमेकांवर आदळल्याने एक पूर्णपणे नष्ट झाला आणि सध्याच्या चंद्रावर जी विवरे, खोलगट भाग शिल्लक आहेत त्याबद्दल निरीक्षणे संकलीत केली आहेत. २२ डिसेंबरला ते दोन्ही उपग्रह, चंद्राच्या मागील भागांवर कृत्रिम पद्धतीने आदळून नष्ट करण्यास अमेरिकेच्या ‘नासा’ संस्थेला यश प्राप्त झाले आहे.