शाळेत भूगोलाच्या पुस्तकात आपण अक्षांश (लॅटिटय़ूड)आणि रेखांश (लाँजिटय़ूड) शिकलेलो असतो. पृथ्वीवर आपण आडव्या समांतर रेषा मारल्या तर त्यांना अक्षांश असे म्हणतात. पृथ्वी साधारण गोल आहे म्हणजे ३६० अंश. विषुववृत्त (इक्वेटर) उत्तर आणि दक्षिण गोलार्धाच्या मधून जातं. विषुववृत्त संदर्भ म्हणजे शून्य अंश. विषुववृत्तापासून उत्तरेला अंश उत्तर आणि विषुववृत्तापासून दक्षिणेला अंश दक्षिण असं मोजायचं. म्हणजे उत्तर ध्रुव येणार ९० अंश उत्तर आणि दक्षिण ध्रुव येणार ९० अंश दक्षिण. दोन अक्षांश रेषांमधील अंतर साधारण १११ किलोमीटर आहे.
तसेच पृथ्वीवर आपण उभ्या रेषा मारल्या त्यांना रेखांश असे म्हणतात. उभ्या रेषा एकमेकांना समांतर नाहीत. दोन्ही ध्रुवांवर त्या एकत्र येतात अणि विषुववृत्तावर त्या साधारण १११ किलोमीटर अंतरावर आहेत. महाराष्ट्रात उत्तरेला अंतर आहे १०३ किलोमीटर तर दक्षिणेला आहे १०७ किलोमीटर. ग्रीनविच, इंग्लंड ज्या रेखांशावर आहे त्याच्या पूर्वेला अंश पूर्व आणि पश्चिमेला अंश पश्चिम असं मोजायचं. १८० अंश पूर्व किंवा १८० अंश पश्चिमेला आहे आंतरराष्ट्रीय तारीख रेषा. अंशापुढे मिनिटे आणि सेकंदामध्ये विभाजित केलेल्या असतात. अक्षांश (लॅटिटय़ूड)व रेखांश (लाँजिटय़ूड) यांना मिळून म्हणतात कोऑर्डिनेट्स (निर्देशांक). कोऑर्डिनेट्सचा वापर करून एखाद्या स्थानाची निश्चिती करता येते. उदा. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे कॉओर्डिनेट्स आहेत १८.२३६८ अंश उत्तर व ७३.४४७८ अंश पूर्व किंवा १८ अंश, १४ मिनिट १३ सेकंद उत्तर व ७३ अंश २६ मिनिट, ५२ सेकंद पूर्व(डिग्री, मिनिट्स, सेकंद). जीपीएस किंवा ग्लोबल पोझिशिनग सिस्टीम अशाच कोऑर्डिनेट्सवर आधारित आहे. यामध्ये चार किंवा अधिक जीपीएस उपग्रहांचा वापर करून जीपीएस रिसिव्हरला आपले कोऑर्डिनेट्स कळू शकतात.
आता ट्रेकिंग साठी याचा उपयोग कसा करता येईल ते पाहू. हल्ली बऱ्याच ट्रेकरकडे जीपीएस रिसिव्हर असणारे फोन आणि कॅमेरे असतात. यामध्ये आपण ज्या ठिकाणी आहोत त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला कळू शकतात. एकदा आपली पोझिशन (स्थान) कळली की आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे ती जागा कुठल्या दिशेला आणि किती अंतरावर आहे हे आपल्याला कळू शकते. उदा. समजा तुम्ही रायगड रोपवे ने गडावर आलात. तुमचा जीपीएस रिसिव्हर तिथले कोऑर्डीनेट्स दाखवतो आहे १८.२३२० अंश उत्तर व ७३.४४०६ अंश पूर्व. मघाशी म्हटल्याप्रमाणे महाराजांच्या समाधीचे कोऑर्डिनेट्स आहेत १८.२३६८ अंश उत्तर व ७३.४४७८ अंश पूर्व हे दोन्ही कोऑर्डिनेट्स आलेखात मांडले की आपल्याला कळते की आपले गंतव्य स्थान ईशान्येला आहे.
(अर्थात सवयीने आलेख न मांडतासुद्धा तुम्हाला दिशा कळेल) आणि अंतर आहे ८६० मीटर. ( खालील आकृती पाहा) आता ही क्लिष्ट पद्धत झाली. तुम्हाला फक्त कळण्यासाठी म्हणून हे मांडून दाखवलं. उपलब्ध असणारे सॉफ्टवेअर हे तुम्हाला चुटकीसरशी करून देतील. ट्रेकिंगला जाताना सुरवातीच्या, शेवटच्या आणि मधल्या महत्त्वाच्या लँडमार्क ठिकाणांचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला ठाऊक असायला हवे. ही माहिती तुम्हाला विकिमॅपिया सारख्या साइटवर सहज मिळू शकते.
गुगल मॅप्सवर सारख्या साईटवर काही ट्रेल अगोदरच्या ट्रेकरनी मार्क करून ठेवले आहेत. ते आपण जीपीएस नॅव्हिगेशन सॉफ्टवेअर वापरून उपयोगात आणू शकतो. जीपीएस नॅव्हिगेशनसाठी मात्र डेटा कनेक्टिविटी आवश्यक आहे. सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात ती असेलच असे नाही. गुगल आपणास लोकल मॅप डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा देते. ज्यामुळे डेटा कनेक्टिविटी नसताना मोबाईलवरसुद्धा आपण असा मॅप उघडून आपली पोझिशन (स्थान) बघू शकतो व आपल्या गंतव्य स्थानाकडे जाऊ शकतो. तुम्हीसुद्धा गुगल मॅपमेकरसारखे सॉफ्टवेअर वापरून तुमची ट्रेल मार्क करू शकता जी इतर ट्रेकरना नंतर उपयोगी पडेल. गुगल माय ट्रॅक्स तुम्ही ट्रेक करत असताना तुमचे कोऑर्डिनेट्स ठराविक कालावधीने नोंद करू शकतो. ज्यामुळे तुम्ही नंतर मॅपवर तुमची ट्रेल बघू शकता व इतरांशी शेअर करू शकता.
जीपीएस तुम्हाला आणखी एक महत्त्वाची माहिती पुरवू शकतो ती आहे समुद्रसपाटी पासूनची उंची. गुगल मॅप्सवर टेरेन ऑप्शन सुद्धा ही मीहिती तुम्हाला दाखवतो. ट्रेक करताना या माहितीचासुद्धा उपयोग होतो.
हातात धरता येईल असे जीपीएस युनिट हा सुद्धा एक पर्याय आहे. यामध्ये बेसमॅप असतात. शिवाय तुम्ही तुमचे वे पॉइंट अथवा पॉइंट ऑफ इंटरेस्ट असणारे मॅप यात अपलोड करू शकता. ट्रेक चालू असताना नवीन ‘वे पॉइंट’ तुम्ही यात जोडू शकता. हे सगळे ‘वे पॉइंट’ तुम्हाला ट्रेकमध्ये संदर्भाला घेता येतात. जेणेकरून तुमच्या सध्याच्या पोझिशन पासून वे पॉइंटच अंतर आणि दिशा तुम्हाला जीपीएस युनिट दाखवत राहतं. तुम्ही ट्रेलवर आहात की, भटकलाय हे तुम्हाला कळतं. हातात धरून वापरण्याच्या जीपीएस युनिटमध्ये कंपास, अल्टिमीटरसुद्धा असते. तुम्ही तुमचा अँड्रॉइड फोन ‘जीपीएस इसेन्सियल’ सारखे सॉफ्टवेअर वापरून जीपीएस युनिट म्हणून वापरू शकता.
भारताने आत्ताच जीपीएससाठी वापरण्यात येणारा उपग्रह अवकाशात सोडलाय. अजून बरेच उपग्रह त्या मालिकेत सोडायचे आहेत. जेव्हा रोड नॅव्हिगेशन (दिशादर्शन)प्रमाणे ट्रेक नॅव्हिगेशन सहज उपलब्ध होइल, तो दिवस दूर नाही.
madhukar.dhuri@gmail.com
ट्रेकिंगमध्ये जीपीएसचा वापर
शाळेत भूगोलाच्या पुस्तकात आपण अक्षांश (लॅटिटय़ूड)आणि रेखांश (लाँजिटय़ूड) शिकलेलो असतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-09-2013 at 10:51 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use of gps in trecking