शहरांचा जिवंतपणाकशामुळे ठरत जातो, यावर शहर-समाजशास्त्रज्ञांनी मांडलेले विचार आपल्या अनुभवांशीही जुळतात.. अपरिचित असूनही नेहमीचेचेहरे दिसण्याच्या शक्यता, सार्वजनिक आणि सामूहिक अवकाश, हे सारं शहराबद्दलची आपुलकी वाढवणारं संचित ठरतं..

मुंबई, दिल्ली वा कोलकाता यांच्याइतकं नाही कदाचित; पण बेंगळुरू हे नक्कीच एक जिवंत, रंगीबेरंगी शहर आहे – सुरत, हैदराबाद वा थोडय़ा फार प्रमाणात पुणेही जसं वाटू शकतं तसं! अर्थव्यवस्थेच्या एका वळणावर ‘सेवाक्षेत्र उद्योगा’चं दोन्ही हात पसरून स्वागत करतानाही परंपरा जपण्याची कर्मठ असोशी आणि नावीन्याचा सोस यांच्यामध्ये हिंदकळताना या शहरांची मजेशीर धांदल उडालेली दिसते. मोठ्ठाले मॉल, हॉटेलं, बांधकाम सुरू असणारी भव्य गृहसंकुलं बघत जीवघेण्या ट्रॅफिकमधून यशवंतपूरच्या परिघावरून बेंगळुरूच्या गाभ्याकडे सरकताना आपण मल्लेश्वरममध्ये येऊन पोहोचतो तेव्हा मल्लेश्वरम आपल्याला एक धक्का देऊन जातं. टुमदार घरं, इमारतींमध्ये विसावलेली अनेक देवळं, छोटीछोटी ‘शाकाहारी उपाहारगृहं’, मागरेसा रोड वा संपिगे रोडसारखे आखीव रस्ते; मात्र ऐन फुटपाथवर भाजीपाला/ उदबत्त्या/ फुलं/ वर्तमानपत्रं विक्रेत्यांपासून केमिस्टच्या दुकानांपर्यंत, हेअर कटिंग सलून्सपर्यंत पसरलेलं मार्केट.. रमत-गमत जाणारे, कधी विंडो शॉपिंग करणारे, पेपरवाल्याची किंवा नेहमीच्या दुकानदाराची विचारपूस करणारे, रिक्षाच्या रांगेत वा बसस्टॉपवर ताटकळणारे वेगवेगळ्या वयोगटांतले लोक, भाजीवालीशी सौदा करणाऱ्या महिला, एखाद्या चौकात कॉफी पिता पिता खळखळून हसणारे, टाळ्या पिटणारे ज्येष्ठ नागरिक.. शहर तगवून धरणारे घटक कडकडून भेटतात ते इथे. मल्लेश्वरम पार करून आलिशान संकी रोडवरच्या सदाशिवनगरात किंवा इंद्रनगरात गेलं की मात्र चित्र बदललेलं दिसतं. आखीवरेखीव रस्ते, दुतर्फा राखलेले वृक्ष, मध्येच डोकावणारी उद्यानं, ठरावीक अंतरावर हटकून आढळणारी सीसीडी वा बरिस्ता आऊटलेट्स आणि आपापल्या कार/ बाइकवरून भुर्रकन ये-जा करणारे नागरिक. फेरीवाले, रस्त्यावर विक्री करणारे विक्रेते यांना अर्थातच (अनधिकृत) मज्जाव!

आता काही निरीक्षणे नोंदवायला हवीत. मल्लेश्वरम आणि सदाशिवनगर हे दोन्ही विभाग नियोजनपूर्वकच उभारण्यात आले आहेत. मात्र आधीची रचना सामावून घेत मल्लेश्वरमची पुनर्रचना करण्यात आली; तर सदाशिवनगर पूर्णपणे नव्याने बांधण्यात आले. सदाशिवनगर हा बहुतांशी वसाहती भाग (रेसिडेन्शियल झोन) म्हणून विकसित करण्यात आला आहे तर मल्लेश्वरममध्ये मात्र वसाहती आणि व्यावसायिक भाग एकत्रच (मिक्स्ड लॅण्ड-यूज) विकसित झाले आहेत. बेंगळुरूमध्ये रात्री वर्दळ तशीही लवकरच थंडावते; पण मल्लेश्वरममधून जाताना एक उबदारपणा वाटतो. रस्त्यावर कोणीही नसेल तरी आजूबाजूला माणसांचे अस्तित्व जाणवत राहते, सदाशिवनगर मात्र कमालीचे थंड वा क्वचित भीतिदायकही वाटते रात्री. एकाच शहरात साधारणपणे जवळपासच असणाऱ्या या दोन्ही विभागांत हिंडताना सामाजिक पोत कमालीचा वेगवेगळा आढळतो. महापालिकेच्या निवडणुकांत मतदानांची टक्केवारी वेगवेगळी आढळते. बेंगळुरू उदाहरण म्हणून घेतलं तरी हा अनुभव मुंबईपासून साताऱ्यासारख्या छोटय़ा शहरार्प्यत प्रत्येक ठिकाणी आलेला आढळेल, अर्थात कमी-अधिक प्रमाणात.

या अनुभवांकडे विश्लेषक दृष्टीने पाहायचे झाले तर, जेन जेकब्सच्या ‘आइज ऑन द स्ट्रीट’ या संकल्पनेइतकी दुसरी समर्पक संकल्पना नाही. अमेरिकन शहरांमधील आपल्या वास्तव्यावर आधारित निरीक्षणे मांडत, ‘अर्बन स्टडीज’ या विषयाला समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून वेगळी दिशा देणाऱ्या या विदुषीचे एक वाक्य फार प्रसिद्ध आहे – ‘महान म्हणून गणली जाणारी शहरे महान असतात कारण ती छोटय़ा शहरांपेक्षा वा खास वसवलेल्या उपनगरापेक्षा कित्येक जास्त प्रमाणात अनोळखी लोकांनी भरून गेलेली असतात.’ जरा सविस्तर बघू याकडे – शहरातल्या प्रत्येकाचे आपले असे एक विश्व असते. त्याच्या गाभ्याशी एक खासगी जग असते – कुटुंबीय, मित्रपरिवार, नातेवाईक यांनी भरून गेलेले. त्यापलीकडे एक अ-खासगी जग असते. आपले दैनंदिन व्यवहार ज्यांच्या अस्तित्वाशी निगडित आहेत असे आपल्या घराजवळचे, ऑफिसजवळचे लोक, दूधवाले, फेरीवाले, पेपरवाले घरकामांत साह्य़ करणारे मदतनीस, आपला ठरलेला वाणी, शिंपी, न्हावी यांचा समावेश त्यात होतो. अनेकदा त्यांची आपली ओळख असतेच असे नाही पण त्यांच्या असण्याची सवय झालेली असते. जेन जेकब्स त्यांना ‘परिचित झालेले अपरिचित’ म्हणते (फॅमिलिअर स्ट्रेंजर्स). रे ओल्डेनबर्ग नावाच्या विचारवंताने हा परीघ आणखीनच विस्तृत केला आहे. त्याच्या मते आपले घर वा कामाच्या जागा यांव्यतिरिक्त आपल्यासाठी महत्त्वाचा असतो परिचितांसोबत इकडे-तिकडे घालवलेला वेळ.. चहाची टपरी, खाऊगल्लीतल्या गाडय़ा, आपापले पान-सुट्टा ठेले इथपासून ते आपली जिम, क्लब, पब्ज, सिनेमागृहे, नाटय़गृहे येथील आपला वावर आपल्याला ‘अखासगी’ जगाचा एक विस्तारित अनुभव देतो, तिसरा अवकाश देतो. यानंतर एक ‘सार्वजनिक जग’ आपल्या विश्वात असते, जिथे आपल्या संपर्कात लक्षातही राहणार नाहीत असे अपरिचित येत-जात राहतात. रेल्वेस्थानके, बँका, बसस्टॉप, रुग्णालये, मिरवणुका/ जाहीर सभा, सार्वजनिक उद्याने, चौक इथे भेटणारे सारेच सार्वजनिक जीवनाचे संकेत मनात बाळगत जगत असतात. प्रत्येक शहरवासीयाची ही खासगी, अखासगी आणि सार्वजनिक विश्वे प्रत्येक क्षणी एकमेकांशी भिडत राहतात. कधी वाढत तर कधी आक्रसतही राहतात. या सर्वाची सगळ्यात जास्त सरमिसळ होते ती एखाद्या गजबजलेल्या रस्त्यावर किंवा बाजारपेठेत. जसजसा अशा ठिकाणांमधला आपला वावर वाढायला लागतो तसे तसे आपण मानसिकदृष्टय़ा आश्वस्त होत जातो, तिथल्या ‘परिचित-अपरिचितां’शी आपली नजरानजर होत राहते, क्वचित आपण एकमेकांकडे बघून हसतो-हात हलवतो आणि ‘रस्त्यांवरच्या या नजरा’ (आइज ऑन द स्ट्रीट) आपल्याला त्या अवकाशाशी नकळत बांधून टाकतात. अपरिचितांना सहन करण्याची, आपल्या अवकाशात सामावून घेण्याची क्षमता वाढत जाते. या अशा अमूर्त आदानप्रदानामधून आपण ‘शहरवासीय’ म्हणून एकत्र येत असतो, आपले सामाजिक संचित (सोशल कॅपिटल) निर्माण होत असते. शहराच्या प्रशासनात, नियोजनात सहभाग नोंदवावासा वाटतो, महापालिकेच्या निवडणुकीत मतदानासाठी पुढे यावेसे वाटते किंवा नगरसेवकाला जाब विचारावा वाटतो, तोही या सामाजिक संचितापोटीच. एका व्यापक अर्थाने या साऱ्यामधून आपल्याला एक राजकीय-सामाजिक भान येत राहते. कैरोमधला तहरीर स्क्वेअर असो, लंडनच्या हाइड पार्कमधील ‘स्पीकर्स कॉर्नर’ असो किंवा मुंबईचा हुतात्मा चौक वा आझाद मैदान-  ही ठिकाणे आपल्या सामूहिक अभिव्यक्तीची साधने बनतात; ती या सामाजिक संचित आणि सामाजिक अवकाश यांच्या एकत्र येण्यामधूनच.

नवउदार अर्थनीती शहरांना आकार देऊ  लागल्यापासून, मार्केटचे -बाजारपेठेचे आक्रमण झाल्यापासून मात्र हा अवकाश विरत जाताना दिसतो. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटरच्या जगात आपले खासगी विश्व अधिक आभासी- वरकरणी विस्तारलेले, मात्र प्रत्यक्षात संकोचाची परिसीमा गाठताना- दिसत आहे. शहराच्या भागांत विखुरलेपणामुळे लोकांची हालचाल घडवून आणणारी रेस्तराँ, कपडे-लत्त्यांची वा अन्य दुकाने यांची जागा एका छताखाली गोष्टी उपलब्ध करून देणाऱ्या ‘मॉल’ने घेतली आहे, रोजचा भाजीपाला, फळे वा अन्य किराणामाल सुपरमार्केटमधून घरपोच येऊ शकतो, रिक्षा-टॅक्सी-बस अशा सार्वजनिक वाहतुकीऐवजी खासगी गाडय़ांमधून वावरणाऱ्या लोकांमुळे रस्त्यांवरचे पादचारी कमी आणि पार्किंग लॉट्स जास्त झाले आहेत. दाटीवाटीने वसलेल्या मुख्य शहरांत मिक्स्ड लँड यूज टाळून, केवळ व्यावसायिक वा निवासी जमीन वापराकडे जाणाऱ्या शहर नियोजनातून उगवलेली, उपनगरांमध्ये पसरलेली ‘सर्वसोयीयुक्त’ गृहसंकुले, अथवा फेरीवाले- विक्रेते-आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक यांचा वावर मर्यादित करणाऱ्या ‘गेटेड कम्युनिटीज’ आपल्या सामाजिक अभिसरणावर प्रचंड मोठ्ठी टाच आणत आहेत. अपरिचितांना सामावून घेण्याची सहनशीलता आणि सहिष्णुताही कमी होत चालल्यामुळे अनेक वेळा राजकीय -सांस्कृतिक संघर्ष उद्भवताना दिसतात. कधी ते ‘परप्रातीयांना’ हाकलून लावण्याचे असतात, कधी ‘झोपडपट्टी’वासीयांना. यामागचे मोठे चित्र अधिक समंजसपणे समजून घ्यायला हवे.

नवउदार अर्थनीती ज्या प्रकारे आपल्या सामाजिक अवकाशाचा कब्जा घेत चालली आहे त्याचा थेट परिणाम आपल्या शहरांमधली आपली भावनिक गुंतवणूक नाहीशी होत जाण्यामध्ये, आपले सामाजिक संचित विरून जाण्यामध्ये होतो आहे. शहरे घडतात ही लोकांच्या सहभागातून, त्यांना चेहरा मिळतो तो लोकांच्या सामूहिक कृतींमधून.. हा चेहरा घडवण्यासाठी असणारा अवकाश जितका संकोचत जाईल, तितकी आपली शहरे बेजान, आत्मा हरवलेली आणि विघटनाकडे वाटचाल करणारी ठरतील. दाटीवाटी असूनही जिवंत वाटणारे मल्लेश्वरम आणि सुटसुटीत पण निस्तेज, फिक्कट वाटणारे सदाशिवनगर यांच्यामधले अंतर कदाचित आता समजू शकेल.

 

मयूरेश भडसावळे
ईमेल :  mayuresh.bhadsavle@gmail.com
लेखक एका नगरनियोजन अभ्यासगटात कार्यरत आहेत.