शहराकडून उच्च मध्यमवर्गाच्या असलेल्या अपेक्षा पुरवण्यासाठी आणि शहरांचा ‘कायापालट’ वगैरे करण्यासाठी जे काही उपाय योजले जातात, त्यातून कामगारवर्ग आणि शहर यांच्या नात्यावर मात्र घाव बसत राहातात. ते घावही या शब्दामधून कळले, तर त्याचा अर्थ नीट कळेल.. तशी उदाहरणं जगभर आहेतच..
एखाद्या शहरात आपुलकीने फिरण्याची प्रत्येकाची कारणं,मार्ग वा प्रयत्नही वेगवेगळे असतातच. पण तरी ‘पर्यटकांसाठी’ म्हणूनही काही खास जागा असतात. दिल्लीच्याच बाबतीत बोलायचं झालं तर वर्षांनुवष्रे कुतुबमिनार, लालकिल्ला, जंतर-मंतर, इंडिया गेट, अक्षरधाम अशा ठरलेल्या नावांमध्ये काही नव्या, ‘हट के’ नावांची- जागांची भर गेल्या काही वर्षांत पडली आहे. गुरगावमधले प्रचंड मॉल्स किंवा निदान साकेतचा ‘सिलेक्ट सिटी वॉक’, ‘दिल्ली हाट’, ‘खिरकी व्हिलेज’ आणि ‘हौज खास व्हिलेज’ सारखी ठिकाणं जवळ जवळ ‘मस्ट व्हिजिट’ झाली आहेत! १९९०च्या दशकात दक्षिण दिल्लीने ‘कात टाकायला’ सुरुवात केली आणि शेतीवर अवलंबून असणारया निवांत खेड्यांमध्ये ‘रिअल इस्टेट’ येऊ लागली, गुरगावमध्ये ‘सíव्हस सेक्टर’ स्थिरावू लागला त्या स्थित्यंतरामधली ‘सुंदर, कलात्मक’ भरभराट (!) हौज खास मध्ये पाहायला मिळते. सुरुवातीला बिना रामाणींचं ‘बूटिक’ आलं तिथे एका गोठय़ामध्ये- अर्थात गोठय़ाचा पूर्ण कायापालट झाल्यावरच. पाठोपाठ ‘बिस्त्रो’ सारखी उंची रेस्तराँ, आर्ट स्टुडिओज, हुक्का पार्लर्स, कॉफी शॉप्स, नामवंत ब्रँड्सची खास विकाने यांची रीघच लागली. उदार आश्रयदात्यांची वर्दळही नेहेमीची झाली. बघता बघता एका निवांत अवकाशाचं रूपांतर ‘कल्ट हब’मध्ये होऊन गेलं. दिल्लीच्या परिघावर वसलेल्या हौज खास नावाच्या खेडय़ाचं आपलं म्हणून जे अस्तित्व होतं, शेतीवर आधारित असे आíथक-सांस्कृतिक व्यवहार होते, ते व्यवहार सामावून घेणारी घर-अंगण-गाडीवाटा-छोटे छोटे चौक हा जो सामाजिक अवकाश होता ,त्याच्याशी कोणतही भावनिक नातं नसणारया एका वेगळ्या अर्थव्यवहाराने हौज खासचं ‘गावपण’ गिळून घेत एका ‘मार्केटलक्ष्यी’ अवकाशाला- ‘अर्बन व्हिलेज’ला जन्म दिला आहे. हौज खासमधले रहिवासी या अर्थव्यवहाराचे लाभार्थी आहेतच, पसा त्यांच्याही हातात खुळखुळतोय भक्कम पण एक ‘आयडेंटिटी क्रायसिस’ त्यांच्यासमोर लख्ख उभा आहे.
‘खिरकी’ किंवा ‘खिडम्की’ नावाचं गावही दक्षिण दिल्लीतच आहे. साकेतमधील ‘सिलेक्ट सिटी वाक’ नावाच्या मॉलसमोरच असलेल्या या गावात एक पुरातन मशीद आहे, १३ व्या शतकातली ! गावातले जुने-जाणते सर्वधर्मीय लोक आजही ही मशीदच गावाची खरी ओळख मानतात, एक प्रकारची आत्मीयता दाटून देते त्यांच्या बोलण्यात मशिदीबद्दल बोलताना.. मात्र असे आत्मीयतेने बोलणारे लोक फार उरले नाहीत गावात. साकेतसारखा भाग जेव्हा नव्याने विकसित केला जाऊ लागला, जेव्हा मॉल, मल्टीप्लेक्स आणि चेन रेस्तराँ इथे येऊ लागली तेव्हा अनेक स्थलांतरित मजूर कामाच्या शोधात इथे आले, राहू लागले. खिरकीमधले अति-निम्न अर्थस्तरातील स्थानिकही रोजगार मिळवू लागले या कामांतून. मात्र विकासकाम पूर्ण होत असतानाच हळू हळू इथल्या जमिनींचे दर वाढू लागले, बडय़ा गुंतवणूकदारांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक सुरू केली. साकेतमधला सामाजिक स्तर बदलू लागला. निम्न, अतिनिम्न स्तरातील लोकांना तगून राहण्यासाठी आवश्यक लवचिकता या स्तरामध्ये नव्हती. रोजच्या जगण्यातल्या भाजीपाला वा किराण्यापासून, शालेय शिक्षण वा आरोग्यसेवांपर्यंत सगळ्याच गोष्टी आवाक्याबाहेर जात चालल्या तसा हा वर्ग खिरकी गाव सोडून आणखी लांब राहायला गेला. त्यांची जागा घेणारा एक नवा वर्ग, उच्च मध्यमवर्ग इथे राहायला आला. त्याच्या सांस्कृतिक गरजा, सामाजिक-सांस्कृतिक अवकाश, वर्ग म्हणून स्वतला व्यक्त करण्याची पद्धत खिरकीमध्ये राहणाऱ्या एका मोठय़ा वर्गापेक्षा वेगळी होती.. ती भली जुनी मशीद त्याच्या आयडेंटिटीचा भाग नव्हती. वाचताना एकरेषीय वाटणाऱ्या या घुसळणीमध्ये हे विसरता कामा नये की यामध्ये खिरकी गावात पिढय़ानपिढय़ा राहिलेला एक वर्ग स्थलांतरित झाला आहे कारण तो जगू शकेल- तगू शकेल असा अवकाश त्याच्यापासून हिरावूनच घेण्यात आला आहे.
दिल्लीबद्दल बोलतोय खरे; पण मुंबईचं उदाहरण वेगळं आहे का ? गिरण्यांचं, गिरणी कामगारांचं विश्व पसरलेला लालबाग-परळ-ताडदेव-भायखळा इथला गिरणी कामगार किंवा निम्न मध्यमवर्गीय ‘लोअर परेल’चं ‘अप्पर वरळी’ होतानाच बाहेर फेकला गेला आहे. वांद्रय़ामधील टुमदार पाखाडय़ा आणि अवती भवती वसलेले म्हातरपाखाडीसारखे जुने भाग ज्याप्रकारे ‘हेरीटेज व्हिलेज’ म्हणून विकसित होताहेत ती नष्टप्राय झालेल्या सांस्कृतिक अवकाशाचीच कथा आहे.
खरं तर हाच क्रम, स्थानिक संदर्भासहित बार्सलिोनाच्या ‘पाब्लो नाऊ’ मध्ये, लंडनच्या कॅनरी व्हार्फमध्ये, आर्यलडचं डब्लिन, ग्रीक थेसालोनिकी वा ब्राझिलियन साओ पावलो वा दक्षिण कोरियन सेउलमध्ये घडलेला आहे, घडत आहे. शहरांचा, शहरीकरणाचा अभ्यास करणाऱ्या ज्ञानशाखा या सामाजिक बदलाचं वर्णन ‘जेंट्रिफिकेशन’ (Gentrification) असं करतात. अवघड वाटणारा शब्द खरा; पण थोडं समजावून घेतलं तर त्यामागची दाहकता लक्षात येईल..
मुळात ‘जेन्ट्री’ हा फ्रेंचमधून, इंग्रजीत आलेला, रुळलेला आणि एका विशिष्ट वर्गाचा निर्देश करणारा शब्द. मध्ययुगीन समाजव्यवस्थेचे संदर्भ आहेत त्याला पण सोप्प्या भाषेत : जमीन-जुमला बाळगणारा, सामाजिक वजन असणारा, उच्चकुलीन, स्वत सरदार नसला तरी सरदार-दरकदारांशी, राजघराण्याशी संबंध असणारा वर्ग म्हणजे ‘जेन्ट्री’. आधुनिक अर्थाने पाहिलं तर जन्मामुळे, पशांमुळे समाजात स्थान कमावलेला वर्ग म्हणजे ‘जेन्ट्री’. आपल्याकडील गुंतागुंतीच्या, जाती-पातीवर आधारित सामाजिक व्यवस्थेचे काही रंग त्यावर चढवले तर जेन्ट्री हा वर्ग म्हणून किती ‘प्रभावशाली’ ठरू शकतो ते लक्षात येईल. शहरांमध्ये कष्टकरी वर्ग, श्रमिक वर्ग आपला म्हणून एक अवकाश घडवत असतो- मग त्या राहण्याच्या, खेळण्याच्या जागा असतील वा मनोरंजनाची ठिकाणं असतील वा निर्हेतुक निवांत वेळ काढण्याजोग्या सार्वजनिक जागाही. ‘उच्च अभिरुचीला साजेसे पुनíनर्माण’ वा ‘चेहरा-मोहरा बदलणे’, ‘कायापालट’ अशा कित्येक कारणांनी ‘जेन्ट्री’ किंवा प्रभावशाली वर्ग निम्नवर्गाचा, श्रमिकांचा हा अवकाश बदलवू पाहतो. ‘आपल्या’ अस्तित्वाला पूरक-पोषक असे बदल तिथे घडवून आणतो आणि या घुसळणीमध्ये , झपाटय़ाने बदलत्या सामाजिक-सांस्कृतिक-आíथक वातावरणामध्ये तिथे टिकून राहणं आवाक्याबाहेर गेल्यामुळे श्रमिक वा मध्यमवर्ग तिथून स्थलांतरित होतो, त्याचं अस्तित्व तिथून पुसलं जातं. त्याच्या राहण्याच्या जागा, मनोरंजनाच्या जागा शरीररूपाने तशाच राहतात पण त्यांचा पुनर्वापर वेगळ्या कारणांसाठी, वेगळ्या स्वरूपात केला जातो. वरकरणी ‘पुनíनर्माण’ वाटणारं हे जे ‘भीषण सुंदर’ आक्रमण आहे ते ‘जेन्ट्रिफिकेशन’ आहे. स्थलांतर हा जसा त्याचा एक दृश्य परिणाम आहे, तसं सांस्कृतिक-सामाजिक अवकाश विरून जाणं, समूहांच्या समूहांची ‘ओळख’ जितेपणी नष्ट होणं, राहत्या अवकाशात बेदखल होणं हे ही त्याचे बहुआयामी अमूर्त परिणाम आहेत.
१९६० च्या दशकातल्या इंग्लंडमध्ये केन्सच्या तत्त्वांवर चालणाऱ्या ब्रिटिश अर्थव्यवस्थेला जेव्हा तडे जाऊ लागले होते आणि मार्गारेट थॅचर यांचा काळ यायचा होता तेव्हा लंडनने मोठय़ा प्रमाणात हे ‘जेन्ट्रिफिकेशन’ अनुभवले. पुढील काही वर्षांतच नवउदार अर्थनीती विलक्षण वेगाने उदयाला येणार होती. जुन्या लंडनमधल्या श्रमिकांच्या वस्त्या, मजली-दुमजली घर नोकरदार मध्यमवर्ग खरेदी करू लागला होता आणि श्रमिक वर्ग दूरवर स्थलांतरित होत होता. जुन्या भागांची ओळख पुसत चालली होती. रूथ ग्लासने जेव्हा ही सामाजिक प्रक्रिया पहिल्यांदा अभ्यासली तेव्हा तो प्रकार वैयक्तिक पातळीपुरताच मर्यादित होता मात्र नील स्मिथसारख्या विचारवंताने जेन्ट्रिफिकेशन हे टप्प्याटप्प्याने सऱ्या जगाला कवेत घेतंय ही मांडणी केली. १९८० च्या दशकात थॅचर-रेगन जोडगोळीच्या आíथक धोरणांनी जगाचे अर्थव्यवहार बदलून टाकले, ही नवउदार अर्थनीती (निओलिबरलिझम) रुजून फोफावत असताना श्रमिक वर्गाची शहरांच्या मुख्य केंद्रांपासून परिघाकडे वाटचाल झपाटय़ाने सुरू झाली. हा दुसरा टप्पा युरोप-अमेरिकेतल्या शहरांबाबत मर्यादित होता. १९९० नंतर मात्र तो जगभरात , विशेषत तिसऱ्या जगातील देशांमध्ये पसरला. अनेक क्षेत्रांमधून शासनाचं प्रभावी अस्तित्व कमी कमी होत जागतिक बाजारपेठेचं अस्तित्व वाढत जाण्याच्या या काळात जेन्ट्रिफिकेशन वाढलं; कारण उदारीकरणाच्या या टप्प्यावर पुन्हा एकदा जागतिक भांडवल राष्ट्र-राज्यांच्या भौगोलिक सीमा ओलांडून शहरांमध्ये खेळू लागलं होतं.
युरोपात वा अमेरिकेत ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने बघता आली तरी भारतात वा अन्य आशियाई राष्ट्रांमध्ये हे टप्पे स्वतंत्रपणे न येता एकत्रपणे आलेले, भयावह वेगाने आपल्या शहरांवर कोसळत राहिलेले आढळतात. कारण १९९० च्या दशकात भारतानं स्वीकारलेलं नवं आíथक धोरण आणि तत्त्वत स्थिरावलेल्या नवउदार अर्थनीतीची जागतिक भांडवलाची घोडदौड आपल्याकडे एकत्र आली. जगभरातील अनुभवानंतर बदनाम झालेला ‘जेन्ट्रिफिकेशन’ हा शब्द ‘अर्बन रिन्यूअल’, ‘अर्बन रीजनरेशन’ आदी नव्या अर्थछटांसह शहरांच्या विकासधोरणात वारंवार डोकावताना दिसतो त्याबद्दल लवकरच बोलू.
लेखक एका नगरनियोजन अभ्यासगटात कार्यरत आहेत. ईमेल : mayuresh.bhadsavle@gmail.com