डॉ. विजया वाड
लग्नानंतर माझं शिक्षण सुरूच होतं. सासऱ्यांचा विरोध होता, पण बीएडला प्रथम क्रमांक, टाटा मेमोरियल शिष्यवृत्ती, बेस्ट स्टुडंट अॅवॉर्ड, विद्यापीठात मानांकन मिळाले नि सासरे म्हणाले, ‘‘आता माझा विरोध संपला.’’ पुढे मी ‘गोदरेज’मध्ये विज्ञानाची शिक्षिका झाले. तिथे असताना एम.ए., पीएच.डी.ला अत्युच्च गुण आणि गुणांकन असल्याने मराठी विभागाचे प्रमुख झाले. पुढे ‘पोदार’ची प्राचार्य झाले. नंतर ‘विश्वकोश’ आयुष्यात आला. १७, १८,१९, २० वा खंड प्रकाशित झाला. २ कुमारकोश, १ कन्याकोश आला. सध्या मी बारा बालकोशांचे संपादन करीत आहे. दरम्यान, लिखाण तर चालूच होतं. वर्तमानपत्रातल्या लिखाणाबरोबरच पुस्तकं प्रकाशित होत होती. आज माझी १२४ पुस्तके आहेत. सूर्यनारायणाला रोज प्रार्थना करते.. ‘दे तेज तू मजला तुझे, दे तुझी समता मला, श्रेयसाची, प्रेयसाची, नाही इच्छा रे मला, ना क्षणहि जावो व्यर्थ माझा, शब्द व्हावे सारथी..’
‘‘लंगडीच राह्य़चंय का तुला आयुष्यभर?’’ डॉ. बेडेकर मला विचारीत होते.
‘‘आयुष्यभर म्हणजे?’’ मी विचारलं.
‘‘आईएवढी, माझ्याएवढी झालीस तरी!’’
‘‘नाही नाही. मला धावायचंय, पळायचंय. सायकल चालवायचीय.’’
‘‘मग साठ इंजेक्शने घ्यावी लागतील न रडता. मुंगी चावल्यागत वाटेल.’’ माझे वय साडेपाच वर्षांचे होते. आधी वर्षभर माझ्या पायात मांडीपासून टाचेपर्यंत बूट होता. आईने वाचायला शिकविले होते नि मला न हसणारे, न चिडवणारे दोस्त आणून दिले होते- पुस्तकं! तेव्हापासून मला साथ देणारे माझे जिवाभावाचे सोबती.
‘‘मी घेईन. न रडता घेईन.’’
अशी साठ इंजेक्शने या बारक्या, काटकुळ्या पोरीने शूरपणे घेतली, न रडता आणि ती दोन पायांवर उभी राहिली. आईचा हात धरून सातव्या वर्षी एकदम दुसरीच्या वर्गात बसली नि ‘हुश्शार’ म्हणून गोडांबेबाईंची लाडुकली झाली. ती मी. विजया नरसिंह दातीर. माझे बाबा वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी गेले. मी केवळ अकरा वर्षांची होते. बाबा पुण्याचे सिटी मॅजिस्ट्रेट होते. डॉ. अमीन कलेक्टर होते. ते म्हणाले, ‘‘मिसेस दातीर, तुम्हाला पाच मुलं. गृहिणी आहात. दातीरांना पेन्शन बसणार नाही. मी दोन्ही मुलांना नोकरी लावून देतो. घर स्वाभिमानाने चालेल.’’
असे दादा, नाना, बाबांचं तेरावं करून नोकरीवर रुजू झाले. दादाला जेलर म्हणून येरवडय़ाला क्वार्टर्स मिळाल्या. दोन्ही बहिणींनी लग्ने केली सहा महिन्यांत. नाना राहुरीस होता. घर फक्त तिघांचं. मी, दादा, आई. माझ्यात नि भावंडांत फार अंतर होते. आठ, नऊ, तेरा वर्षांचे; पण दादा माझा बाप झाला नि माझे जीवन त्याच्यामुळे फार सुकर झाले.
‘‘कोणी विचारले, बाबा काय करतात तर रडायचे नाही. सांगायचे, जेलर आहेत.’’ इतुके प्रेम-इतुकी माया. माझे बीएस्सीपर्यंतचे शिक्षण, लग्न, बाळंतपण सारे सारे दादा, नाना यांनी केले. आक्काही जबाबदारी उचले.
पण तेव्हा ना, अतिमध्यम परिस्थितीचे काही वाटायचे नाही. आई मला कॉलेजात जाताना स्कर्ट घालू देई, पण घरी आल्यावर साडीच! केमिस्ट्री प्रॅक्टिकल्सला कपडय़ांना भोके पडतात म्हणून स्कर्ट हो! के.जे. सोमैय्यांतून मी बीएस्सी होता होता टेबल टेनिस, बुद्धीबळ या स्पर्धात आंतरकॉलेज स्पर्धात नि बुद्धीबळमध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. मला ‘बेस्ट गर्ल स्टुडंट’चा गौरव ज्युनिअर बीएस्सीला मिळाला; पण या नादात माझा फर्स्ट क्लास गेला. ‘‘आता लग्न करा.’’ आईने आदेश दिला. मी रेल्वे क्लबवर ‘टेटे’ खेळायला जायची. तिथला माझा मित्र दोन दिवस मला घरी सोडायला आला. तेव्हा आईने त्याला दम भरला, ‘‘मी रोज गणपतीला जाते. मला कोणी घरी पोचवायला येत नाही. कळलं का? विजूला सोडायला यायचं नाही. ती फक्त लग्न ज्याच्याशी करेल.. त्याच्याबरोबरच येईल- जाईल.’’ तो इतका घाबरला. मला दुसऱ्या दिवशी म्हणाला, ‘‘बाप रे! तुझा भाऊ जेलर नि आई जगदंबा.’’ पण मला त्याच्याबद्दल काही मृदू वाटत होते. आमचे पासपोर्ट साइज फोटो आम्ही एकमेकांस दिले होते, पण बस्! त्या कोवळिकीचे अॅबॉर्शन हो! रेल्वे क्लब बंद.. बंद!
लग्न ठरले. कॅप्टन विजयकुमार वाडांना मी म्हटलं.. ‘‘असं प्रेम जडलं होतं.’’
‘‘आता नाही ना?’’
‘‘छे हो!’’
‘‘अगं, काफ लव्ह ते. तो फोटो टाकून दे.
माझा ठेव.’’ संपलं. ओझंच उतरलं.
मला एका गोष्टीचे फार दु:ख होई, की माझा नवरा मला बॉर्डरवर नेत नाही. ‘‘मला पीस पोस्टिंग नाही. फिल्ड पोस्टिंगला कसे नेणार?’’ या उत्तराने माझे कधीही समाधान झाले नाही; पण मग दोघी मुलींनी जन्म घेतला चौदा महिन्यांच्या अंतराने आणि मी आयुष्यातला सर्वोच्च आनंद उपभोगला. मुली बापासारख्या नाकेल्या नि सुरेख निपजल्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘मुलगा हवा’ असे ना सासू-सासऱ्यांनी म्हटले ना पतीने. मला पंचविशीत करियर करायची होती, शिकायचे होते, लिहायचे होते. निशूच्या (निशिगंधा वाड) जन्मासोबत माझी पहिली कादंबरी ‘मेनका प्रकाशन’ने प्रकाशित केली होती. ‘स्त्री’, ‘किलरेस्कर’ नि रविवार पुरवण्या यांत माझे लेख जसे येऊ लागले तसे ‘विजया वाड’ या नावाला लोक ओळखू लागले.
अनेक वर्तमानपत्रांच्या संपादकांनी मला सातत्याने लिहायला दिले. लेखन प्रसिद्ध केले. एका वर्तमानपत्रात तर सलग साडेपाच वर्षे मी लिहीत होते. ‘आकाशवाणी’वर मी तेरा तेरा भागांच्या पंधरा बालमालिका लिहिल्या, तर ‘दूरदर्शन’वर आबा देशपांडे यांच्याकडे शालेय चित्रवाणी सतत अकरा वर्षे नि ‘ज्ञानदीप’चे कार्यक्रम खूप केले. एक दिवस अशोक (‘डिंपल प्रकाशन’चा) माझ्याकडे दिलीप वामन काळे यांना घेऊन आला नि सुरू झाला दर चार-पाच महिन्यांनी एका पुस्तकाचा सिलसिला. दिलीपने माझी ३१ पुस्तके दहा-बारा वर्षांत काढली. १२४ पुस्तकांची आई आहे. अजूनही लिहितेच आहे..
मी ‘गोदरेज’मध्ये विज्ञानाची शिक्षिका होते तेव्हा माझी पुस्तके येऊ लागली होती. माझ्या ‘मेनका’मधील कादंबरीतले काही वर्णन थोडे प्रक्षोभक होते. तेवढाच भाग अधोरेखित करून एका शिक्षिकेने डॉ. डी.डी. पंडय़ा या आमच्या मुख्याध्यापकांना दाखवला. ‘‘शोभते का हे उघडेवाघडे लिहिणे एका शिक्षिकेला?’’ त्यांनी पूर्ण कादंबरी वाचायला मागितली. ‘‘रेफरन्ससकट वाचल्यास त्यात अशोभनीय काही नाही.’’ त्यांनी क्लीन चिट दिली. माझे पुस्तक मी जय गोदरेज या संचालिका मॅडमना नियमित देत असल्याने आणि शाळेच्या वेळात ‘लेखन’ करीत नसल्याने एरवी अनवस्था प्रसंग ओढवला नाही.
सासूबाईंनी मला शिकू दिले, पण प्रथम सासऱ्यांचा नकार होता. बीएडला फीचे पैसे देईनात. ‘‘तुझ्या आईने दिलेली चांदीची भांडी मोड नि भर पैसे. त्यावर म्हाताऱ्याचा हक्क नाही.’’ त्या म्हणाल्या. मी ‘आज्ञापालन’ केले, पण बीएडला मला कॉलेजात प्रथम क्रमांक, लायब्ररी अॅवॉर्ड, टाटा मेमोरियल शिष्यवृत्ती, बेस्ट स्टुडंट अॅवॉर्ड, विद्यापीठात मानांकन मिळाले नि सासरे म्हणाले, ‘‘आता माझा विरोध संपला.’’ तरी ते नेहमी म्हणत, ‘‘आमच्या घरात साध्या बायका नाहीत. एक अडाणी नि दुसरी दीड शहाणी.’’ माझे सासरे जुने बीकॉम होते. तैलबुद्धीचे होते.
‘गोदरेज’मध्ये सत्तावीस वर्षे मी इमानेइतबारे नोकरी केली. एम.ए., पीएच.डी.ला अत्युच्च गुण आणि गुणांकन असल्याने सर्व मराठी शिक्षकांना डावलून मला मराठी विभागाचे प्रमुखपद दिले गेले, मी विज्ञानाची शिक्षिका असूनही. नवल गोदरेज यांनी मला मुलाखतीत पहिला प्रश्न विचारला, ‘‘हू आर युवर एनिमिज?’’
‘‘एकही नाही.’’
‘‘का बरे?’’
‘‘मला स्नेहाची नजर आहे.’’
‘‘तर मग मी तुला निवडतो; पण बाळ, तुझ्या सीनियर्सना कधी दुखावू नको. प्रेमाने जिंक. अवघड वळण आहे.’’ केवढा त्या उद्योगपतींचा दूरदर्शीपणा!
पुढे एक दिवस पोदार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका १९९९ मध्ये मला एका ‘पालकसभे’साठी बोलवायला आल्या. मी रीतसर परवानगी घेऊन गेले. ते माझे ‘सुसंवादन’ इतके आवडले पोदारांना की रात्री मला फोन आला. ‘‘मी गणेश पोदार बोलत आहे. मी तुला माझ्या शाळेत प्राचार्य म्हणून बोलावतोय. शाळा- ज्युनिअर कॉलेज देतो ताब्यात. ये, निकाल ‘वर’ काढ. बस्. आज आहे त्यापेक्षा तीन हजार अधिक पगार, गाडी, ड्रायव्हर, केबिन.. सारा थाट! ये फक्त.’’
आणि मी ‘पोदार’ची प्राचार्य झाले. माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण. ज्यासाठी मी वाट बघितली होती नि बाप्पाने मला ते अलगद हाती दिले होते. गणेश पोदारांची मी फार लाडकी होते. अतूट विश्वास! एक दिवस आपली विशेष कागदपत्रे ज्या पेटीत आहेत त्याच्या चाव्या त्यांनी माझ्या हाती सोपवल्या. ‘‘जप.’’ श्रीमती सरोज पोदार नि गणेश पोदार यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्याला पात्र होण्याचा मी अतोनात प्रयत्न केला. शाळेचा निकाल उंचावला. सर खूश होते; पण शिक्षकांना कामाची सवय लागेपर्यंत वेळ गेला. नाराजी सोसली मी त्यांची; पण उंचावलेला निकाल माझ्या निवृत्तीनंतरही त्यांनी जिद्दीने कायम ठेवला. मी कृतज्ञ आहे. त्यांचे चिरंजीव पवन पोदार माझी कष्टाळू जीवनपद्धती बारकाईने बघत होते. निवृत्तीनंतर त्यांनी मला ‘प्रेसिडेंट वूमन कॅपिटल’ हे फार महत्त्वाचे पद बहाल केले. मजवर प्रेम, अधिकार, स्वातंत्र्य यांचा वर्षांव केला नि मीही ‘पोदार विद्या संकुल’साठी माझी जान ओतली.
२००५. ऑक्टोबर महिना. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मला सकाळी नऊला दहा मिनिटांसाठी परिचयपत्रासह भेटायला बोलाविले. कशासाठी? काय हो कल्पना! मी गेले ‘वर्षां’वर.
‘‘भाषाशुद्धीचे तुमचे विविध प्रयोग मी नुकतेच विविध वृत्तपत्रांतून वाचले. मला ते भावले. विश्वकोशाचे अध्यक्षपद एक स्त्रीला मला द्यायचे आहे. काम अडून-पडून आहे. शास्त्रीबुवांचा प्रकल्प झटून काम करून पूर्ण करू शकाल?’’
‘‘विचार करून, माहिती काढून उत्तर दिल्यास चालेल?’’
‘‘अवधी?’’
‘‘आठ दिवस.’’
‘‘दिला.’’
मी तेव्हा ‘बालभारती’चे इयत्ता पाचवीचे पुस्तक करीत होते. श्रीमंत होनराव हे वाईचे चित्रकार मजसोबत होते. विश्वकोशाची त्यांना बारकाईने माहिती होती. त्यांनी मला सांगितली.
मला आठवडय़ाने परत दहा मिनिटे मिळाली.
‘‘सर, तिथली मानव्य विभाग, विज्ञान विभाग यांची मुख्य पदे रिक्त आहेत. प्रमुख संपादक एकटय़ाने काय करणार?’’
‘‘ती मी भरली असे समजा.’’
‘‘मग मी पद घेते. तुमच्या विश्वासास पात्र ठरेन, झटून काम करेन.’’
‘‘गुड.’’
संपली मुलाखत. मग काहीच घडले नाही. माझी नेमणूक झाल्याचे मला वर्तमानपत्रांतूनच समजले अन् इतके दिवस लेखिका, मुख्याध्यापिका, मानव संसाधन विभागाची अध्यक्षा म्हणून मिळालेल्या लौकिकावर टीकास्त्राने काळा बोळा फिरला.
माझे मन घायाळ झाले. ‘मी सुखी आहे शिक्षण क्षेत्रात. नको मला हे पद. ‘आपणाला लोक दूषणे देत आहेत.’ मी फॅक्स पाठवला; पण मला उत्तर आले, तात्काळ. ‘धीराने घ्या. तुमची निवड ‘मी’ केली आहे. चटकन् उठा नि झटकन् कामाला लागा. सिद्ध करा आपली योग्यता.’
विश्वकोशाचे सचिव मला न्यायला ‘पोदार’मध्ये आले. मी निघाले तर महानगरपालिकेच्या समोर कॅमेरे रोखलेले. ‘‘बाई आली? टीकेला न घाबरता?’’ हे अध्यक्षपद इतके ग्लॅमरस असेल याची मला सुतराम कल्पना नव्हती; पण सुरू केले नेटाने काम. भारतीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. गोविंद फडके आणि
डॉ. सु.र. देशपांडे यांची विज्ञान आणि मानव्य विभागासाठी मी मागणी केली नि त्याच दिवशी मुख्यमंत्री विलासरावांनी ती पूर्ण केली.
पण वेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागले. वाईला मी केक कापला.. झाली बातमी! विजूताईंनी केक कापला! कार्यालयात गणपतीची तसबीर लावली! विजूताई दैववादास शरण! अहो, देवाला नाही तर कोणाला माणसे शरण जातात? गणपती ही बुद्धीची देवता ना! पण मी चार मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली विश्वकोशाची परिपूर्ती केली. खंड १७ विलासराव देशमुखांच्या काळात, खंड १८ अशोकराव चव्हाणांच्या काळात, खंड १९ पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात तर २० पूर्वार्ध, उत्तरार्ध देवेंद्र ्रफडणवीसांच्या काळात प्रकाशित झाले.
महाजालकावर तो सीडॅकच्या मदतीने टाकला. त्याला जगातून १५ लाख वाचक १०५ देशांतून मिळवून दिले. विसाव्या खंडाचा पूर्वार्ध झाल्यावर हे आमचे मंडळ बरखास्त करण्यात आले. आता फक्त ४०० नोंदी शिल्लक राहिल्या होत्या. मला अतीव दु:ख झाले; पण तर्कतीर्थाचे पुत्र वासुदेवशास्त्री जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजींना पत्र लिहिले. ‘माझ्या वडिलांचा रखडलेला प्रकल्प विजयाबाईंनी अतीव मेहनतीने पूर्ण करीत आणलाय. त्यांनी घेतलेल्या मेहनतीस न्याय द्यावा. परिपूर्ती बाईंनी करावी, अशी तर्कतीर्थाचा पुत्र म्हणून इच्छा व्यक्त करतो.’ नि ती संधी देवेंद्रजींनी मला दिली. मंडळ पुनरुज्जीवित झाले. सारे विश्वकोश कार्यालय, माझे तरुण सहकारी, जाणते संपादक कामाला लागले. मी वाईतच तळ ठोकला. गोविंदरावांचे निधन झाले होते नि आठ विज्ञान नोंदी तपासणे गरजेचे होते. हात जोडून
डॉ. विजय भटकरांसमोर उभी राहिले. ते ‘हो’ म्हणाले अन् मोहीम फत्ते! २० व्या खंडाचा उतरार्ध पूर्ण झाला. याच कालखंडात कुमारांसाठी दोन कुमारकोश जीवसृष्टी आणि पर्यावरणावर काढले आणि सात नामवंत शास्त्रज्ञांनी ते बोलके केले अंधांसाठी. कन्याकोशाची २७५ स्त्रियांचा चरित्रगौरव सांगणारी २२ तासांची ध्वनिफीत महाराष्ट्र शासनाने दुर्गम भागातही पोहोचविली.
२४ जून २०१५ ला विश्वकोशाची परिपूर्ती देवेंद्रजींनी केली नि मला कृतकृत्य वाटले. ‘विश्वकोशा’ची गाडी सचिवांकडे देऊन माझ्या वाहनाने मी परतले..
‘‘मास्तरीण मी!’ नावाने महाराष्ट्रात १८० ठिकाणी ग्रंथवाचन स्पर्धा घेतल्या. ५००० वस्तींचे शेणगाव ते मुंबई, १८० गावं. विश्वकोशाच्या वेबसाईटला महाराष्ट्र शासनाचा प्लॅटिनम, कॉम्प्युटर सोसायटीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि ‘मंथन’चे आशीर्वाद मानांकन मिळाले. विश्वकोश घराघरांत पोहोचला. इतकी माणसे जोडली गेली ना! मी फार ‘श्रीमंत’ झाले..
माझ्या घराकडे मात्र पती बघत होते. प्राजक्ता-निशिगंधाची अतूट साथ होती. ‘आमचे राजकुमार आम्ही शोधू’ म्हणणाऱ्या या दोन्ही सोनपाकळ्या स्वयंसिद्ध कधी झाल्या? निशिगंधाने दोन पीएच.डी. नि प्राजक्ताने मेडिकल क्षेत्रातल्या तीन पदव्युत्तर पदव्या कधी संपादन केल्या? दोघींनी मला तीन गोडुली नातवंडे पन्नाशीत दिलीसुद्धा. त्यासाठीसुद्धा ही ‘नानी’ राबलीय हो; पण मायेचे अतूट धागे ना, श्रमांच्या मोलापेक्षा फार मोठे, फार चिवट नि पुष्ट असतात. आम्हाला पेन्शन देणाऱ्या दोघी मुली आमचे वज्रकवच नि सुखाचा मूलाचार आहेत.
सध्या २०१५ ते २०१८ मध्ये मी बारा बालकोशांचे संपादन करीत आहे. अहो, केवढे अपार सुख आहे त्यात. ‘नवचैतन्य’, ‘पाणिनी’, ‘डिंपल’ माझी पुस्तके काढतायत. आनंद आनंद आहे. दु:ख दात काढते ना. तो लहानपणी बुटात जखडलेला पाय दुखतो, ठणकतो; पण मी चालत राहाते. पवन पोदार म्हणत असत, ‘‘हाऊ डु यू वॉक विथ धिस लेग? आय गेट वरिड.’’
मी म्हणे, ‘‘सर, विथ धिस ब्रोकन लेग आय हॅव ट्रॅव्हल्ड इन फोर्टीन डिफ्रंट कंट्रीज.’’
माझी तीन भावंडे, जी कधीच हे जग सोडणार नाहीत असे मला वाटत होते.. आक्का, नाना, निरू.. निघून गेली. माय तर रोज उठता-बसता आठवते. मग मी ओजू, अर्जू, इशूत मन रमवते आणि मग नेटाने उभी राहाते. मी किती विद्यार्थ्यांची आई आहे. वाचकांची माय आहे. छोटय़ांची नानी आहे. माझा परिवार घनदाट आहे. माझ्या मुली हेच माझं कनक. सूर्यनारायणास मी रोज सांगते..
‘दे तेज तू मजला तुझे, दे तुझी समता मला
श्रेयसाची, प्रेयसाची, नाही इच्छा रे मला
ना क्षणहि जावो व्यर्थ माझा,
शब्द व्हावे सारथी
त्यांच्याच रे साथीत व्हावी, शेवटाची आरती’
vijayawad@gmail.com
chaturang@expressindia.com