शांता गोखले – shantagokhale@gmail.com
‘‘मी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये तात्पुरत्या जागेवर शिकवत होते. याचं श्रेय मं. वि. राजाध्यक्ष यांना जातं. त्यांनी विचारलं. मी नोकरीच्या शोधात होतेच. हो म्हणाले आणि छाती ताठ करून, खोल श्वास घेऊन वर्गात प्रवेश केला. चार लोकांत बोलायची धिटाई माझ्यात कधीच नव्हती. त्यामुळे पोटात गलबला. शंभरेक मुलांचे डोळे माझ्यावर रोखलेले. पण नवलात नवल म्हणजे वर्गात पाय ठेवला मात्र आणि मला वाचा फुटली. बाहेर राजाकाका चिंतेने येरझाऱ्या घालतायेत. डोळ्याच्या कोपऱ्यातून मला दिसतायत. मनात त्यांना मी सांगत होते काळजी नका करू. तुम्ही मला माझा पेशा मिळवून दिलायेत. किती आभार मानू तुमचे?’’
रस्त्यावर लंगडी, टीक्री, आबादुबी, डबा ऐस्पाइस खेळायचं, ते नेहमी जोडीने. मी आणि निर्मल. निर्मल आणि मी. अशा जोडय़ांनी शेजार भरला होता. विजू-पमू, ज्योत्स्ना-शोभा, विजया-रजनी, शांता-निर्मल. मुलगेही होते, रवी, मधु, सदू वगैरे. अधूनमधून निर्मल त्यांच्यात गोटय़ा खेळायची. पण नाहीतर आम्ही एकत्र. भाऊ नाही. मला भाऊ हवासा वाटायचा. पण एकदा मी विणत असलेला स्वेटर माझ्या मामेभावाने उसवला तेव्हा भाऊ नाही ते बरं आहे असं वाटू लागलं. आई-वडिलांना मुलगा नसल्याचं दु:खं कधी झाल्याचं स्मरत नाही. नाही म्हणायला वडील निर्मलला बाळ्या म्हणायचे आणि आजोबा राहायला आले की मला शांताराम म्हणायचे. महत्त्वाचं म्हणजे आम्ही बाळ्या-शांताराम असल्यासारख्याच वाढलो.
संध्याकाळच्या वेळी घरात राहायचं नाही हा नियम. त्यामुळे लहानपण भरपूर खेळण्यात गेलं. कॉलेजमध्येही खेळत राहिलो. निर्मल खो-खो, बास्केटबॉल, टेबल टेनिस इत्यादी. मी बॅडमिंटन. गाणं शिका, नृत्य शिका हे त्याबरोबर चालूच. श्रीमंती नव्हती, पण सुस्थिती होती. मोकळीक होती, पण शिस्तही होती. अभ्यासात इतके किंवा तितके गुण मिळालेच पाहिजेत असा आग्रह नव्हता; पण करत असलेल्या कामात सर्वस्व ओतून ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे हा होता. आमच्या व्यक्तिमत्त्वाला जितके पैलू पडतील तितके पडू देण्यासाठी जे करता येईल ते करायचं हा आई-वडिलांचा सततचा प्रयत्न. पण ते करीत असताना आम्हाला पैशांची जाणही करून दिली गेली. आई-वडील महिन्याचं अंदाजपत्रक लिहायला बसले आणि आम्ही आजूबाजूला असलो की आम्हालाही घरखर्च किती आणि कसा होतो हे समजावून सांगण्यात यायचं. त्यामुळे फालतू खर्च करायचा नाही ही सवय अंगवळणी पडली. दिवसाचा खर्च लिहिण्याचीही सवय तिथपासूनची. आमच्या घरात रोजची मीठमिरची सोडून जो जादा खर्च होत असे तो पौष्टिक आहारावर, पुस्तकांवर आणि प्रवासावर. घरात दागदागिने बाद होते. आई मंगळसूत्र, एकेक बांगडी आणि कुडय़ा घालायची तेवढंच सोनं आणि तितकेच मोती.
आमचं शाळा शिक्षण इंग्रजीत आणि आजूबाजूची आणि घरात बोलण्याची भाषा मराठी. त्यामुळे आम्ही दोघी द्विभाषक झालो. माझ्या आयुष्यात याचा फारच मोठा फायदा झाला. आम्हाला वडिलांनी जेव्हा इंग्लंडला पाठवलं (का आणि कसं ते इथे सांगण्याचा मी प्रयत्नही करणार नाही, कारण ती गोष्ट फार लांब आहे) तेव्हा माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण लागलं. यानंतर शांता-निर्मल ही जोडगोळी फुटली. इथून आमचा प्रवास वेगवेगळ्या दिशांनी झाला. निर्मल इंग्लंडहून दोन वर्षांनी परत आली. मी सहा वर्ष राहिले. पण महत्त्वाची गोष्ट सांगायची ती ही की गेले तेव्हा माझं वय १६ वर्ष दहा महिने होतं. त्या वयात मला शेजारी बसवून वडील म्हणाले, ‘‘आम्ही तुझ्या शिक्षणावर इतके पैसे खर्च करण्याचं कारण की ते तुला आयुष्यभर भांडवल म्हणून पुरेल. तुझ्या लग्नासाठी आम्ही जोडे झिजवणार नाही. तुला लग्न करायचं असेल तर तुझा तू साथीदार शोध. उत्तम शिक्षण देत आहोत. हुंडा-दागिने मिळणार नाहीत.’’ मनात म्हटलं दागिने हव्येत कोणाला? उगीच गळ्याला, हातांना उकाडा. आणि लग्न कोणाला हवंय वेगळीच कोणीतरी व्हायला? नंतर दोन लग्नं केली. पहिलं स्वत:च्या खर्चाने. दुसरं बिनखर्चाचं. दोन्ही बिनसली. पण जे नाव घेऊन जन्माला आले ते नाव नाही बदललं. गोखले नाव उज्ज्वल केलं की नाही माहीत नाही. पण ती ओळख कायम राखली. (काय आचरटपणा करतात नाही या स्त्रीवादी बायका!)
इंग्लंडला जाण्याआधी पोळ्या लाटतालाटता आई म्हणाली, ‘‘इंग्रजी साहित्य घेऊन बी.ए. होणार त्याचा आपल्या देशाला काय फायदा?’’
‘‘शिकवेन.’’
‘‘तेवढय़ाने काय होणार? आपल्याकडे उत्तम साहित्य आहे त्याचं भाषांतर करता आलं तर बघ. दुप्पट उपयोग होईल.’’
परत आल्यावर पहिलं भाषांतर केलं ते मला एका वेगळ्या जगाची ओळख करून देणाऱ्या गोदूताई परुळेकरांच्या ‘जेव्हा माणूस जागा होतो’ या प्रेरक पुस्तकाचं. गोदूताई आणि त्यांचे यजमान शामराव यांची आमच्याकडे ये-जा होती. गोदूताईंच्यात आणि माझ्यात एक वेगळंच सख्य होतं. त्यांच्या पुस्तकाचं भाषांतर दुसऱ्या कोणीतरी केलं होतं, पण ते त्यांना विशेष पसंत नव्हतं. मी नव्याने करून दिलं. अर्थात ते माझ्या नावाने छापलं गेलं नाही ही वेगळी गोष्ट. तीही मी इथे सांगत बसणार नाही. खुलासा एवढाच करेन की त्यात माझ्या प्रिय गोदूताईंचा काहीही दोष नव्हता.
दुसरं भाषांतर केलं ते माझा मित्र सत्यदेव दुबे यांच्या हुकमावरून. ते होतं चिं. त्र्य. खानोलकर यांच्या ‘अवध्य’ या नाटकाचं. इथून माझ्या भाषांतरांना जी सुरुवात झाली ती अजून संपलेली नाही. आईच्या इच्छेप्रमाणे माझ्या हातून मराठीतील काही महत्त्वाच्या ग्रंथांची भाषांतरे झाली आहेत. त्यात ‘धग’, ‘माझा प्रवास’ आणि ‘स्मृतिचित्रे’ यांचा समावेश आहे. अजून दोन करायची बाकी आहेत, ती समोर ओळीने उभी आहेत — ‘ब्राह्मणकन्या’ आणि ‘श्यामची आई’. ती एक-दोन वर्षांत होतील.
माझ्या पत्रकारितेचं श्रेय एका अर्थी वडिलांना जातं. ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये साहाय्यक संपादक होते तेव्हा त्यांचे सहकारी एम.व्ही. मॅथ्यू यांच्या उत्तेजनामुळे माझा पहिला लेख छापला गेला. वडील अशा गोष्टींच्या अत्यंत विरुद्ध होते. ज्या वृत्तपत्रात आपण काम करतो त्यात आपल्या मुलीचा लेख छापून येणं हे सपशेल अनैतिक होतं. पण मॅथ्यू यांनी त्यांना गप्प केलं. तो लेख खरं तर घरी लिहिलेलं पत्र होतं. वडिलांनी अभिमानाने ते मॅथ्यू यांना वाचायला दिलं ही त्यांची चूक. ते जसंच्या तसं छापल्यावरच त्यांच्या हाती परत आलं.
त्यानंतर माझ्या ललित लेखनाला उधाण आलं. लिहिलं की मॅथ्यूंना पाठवलं असं चाललं होतं. शेवटी मॅथ्यू म्हणाले, ‘‘इतर वृत्तपत्रही आहेत जगात.’’ पण माझा स्वभाव भिडस्त. मी कसली कोणाकडे लेख पाठवणार? शेवटी आईने आणि मी चाकणला जाऊन तावूनसुलाखून विकत घेतलेल्या म्हशीबद्दलचा माझा लेख मॅथ्यूंनीच आपणहून रस्किन बाँड हे संपादित करीत असलेल्या ‘इंप्रिंट’ नावाच्या मासिकाकडे पाठवला. तिथे तो छापून आला. काही वर्षांनी तो संक्षिप्त स्वरूपात ‘रिडर्स डायजेस्ट’मध्ये छापून आला. मुद्दा हा की माझ्या आयुष्याच्या श्रेयावलीत आई-वडिलांनंतर एम.व्ही. मॅथ्यू यांचं नाव आहे. आणि त्यांच्यानंतर वर नमूद केल्याप्रमाणे सत्यदेव दुबे यांचं. भाषांतराचा हुकूम निघायच्या आधीच, म्हणजे १९६२ मध्ये मी इंग्लंडहून परत आले तेव्हाची गोष्ट. ही गोष्ट मी अनेकांना, अनेक वेळा सांगितलेली आहे, पण इथे परत सांगते.
मी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये तात्पुरत्या जागेवर शिकवत होते. याचं श्रेय मं. वि. राजाध्यक्ष यांना जातं. ते वडिलांचे मित्र. आम्ही बहिणी त्यांना राजाकाका म्हणत असू. तर त्यांचा फोन आला, एक लेक्चरर बाळंतपणासाठी सुट्टीवर आहे. तिच्या जागी काही दिवसांसाठी शिकवायला येशील का? मी नोकरीच्या शोधात होतेच. हो म्हणाले आणि छाती ताठ करून, खोल श्वास घेऊन वर्गात प्रवेश केला. चार लोकांत बोलायची धिटाई माझ्यात कधीच नव्हती. त्यामुळे पोटात गलबला. शंभरेक मुलांचे डोळे माझ्यावर रोखलेले. पण नवलात नवल म्हणजे वर्गात पाय ठेवला मात्र आणि मला वाचा फुटली. बाहेर राजाकाका चिंतेने येरझाऱ्या घालतायेत. डोळ्याच्या कोपऱ्यातून मला दिसतायत. मनात त्यांना मी सांगत होते, ‘काळजी नका करू. तुम्ही मला माझा पेशा मिळवून दिलायेत. किती आभार मानू तुमचे?’
तर कॉलेजमधून एक दिवशी परस्पर चित्रा टॉकीजला पोचले. तिथे उत्तम युरोपिअन चित्रपट दाखवत असत. हातात तिकीट. मी काहीशी वेंधळी. तिकीट हातातून पडलं. एक भरपूर केसांचं न विंचरलेलं डोकं मागून कुठूनतरी येऊन खाली झुकलं. तिकीट उचलून माझ्या हाती देत म्हणालं, ‘‘तू शांता गोखले. मी सत्यदेव दुबे. तू माझ्या नाटकात काम करशील का?’’ दुबेचं नाव मी ऐकून होते. मराठी नाटक असतं तर काम केलंही असतं. पण हिंदी? अबब. नाही म्हटलं. पण तिथपासून दुबेची आणि माझी गट्टी झाली आणि मुंबईच्या समांतर रंगभूमीच्या वर्तुळात माझा प्रवेश झाला. माझं नाटक ‘अविनाश’ त्याने कोणतीही काटछाट न करता दिग्दर्शित केलं. अशा गोष्टीसाठी नशीब लागतं ते माझ्यापाशी होतं.
पहिलं लग्न लेफ्टनंट कमांडर विजयकुमार शहाणे यांच्याशी झालं. ते श्री. मो. ज्ञा. शहाणे यांचे सुपुत्र. मला खूप आवडले. सतत वाचन करणारा, कोणालाही न दुखावणारा भला माणूस. त्याच्या समवेत भारतीय नौसेनेचं एक नवीन जग पाहायला मिळालं. विंचवाचं घर पाठीवर हा प्रकार काय असतो ते सतत होणाऱ्या बदल्यांमुळे प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. पुष्कळ मैत्र्या झाल्या. दोन सोन्यासारखी मुलं झाली. पण शेवटी परस्पर संमतीने आम्ही एकमेकांपासून विभक्त झालो. जे सुख हातून निसटलं होतं त्यात कोणाचाही दोष नव्हता आणि त्याचं दु:खं विजूला जितकं झालं तितकंच मलाही झालं.
आम्ही विशाखापट्टणममध्ये राहात असताना, माझ्या भाषांतरांना सुरुवात झाली. आणि तिथे असतानाच निसीम इझिकेल यांनी मला एक वेगळी वाट दाखवली. काही कारणास्तव आमचा पत्रव्यवहार झाला, त्यात त्यांनी मला विचारलं, तू मराठीत का लिहीत नाहीस? आपल्या मनाच्या एका महत्त्वाच्या कोपऱ्यावर कोणीतरी जादूची कांडी फिरवावी असा तो अनुभव होता. निसीमचं पत्र वाचलं मात्र आणि एकामागाहून एक अशा तीन कथा लिहिल्या. वडिलांचे बरेच मित्र साहित्यिक. मी निर्लज्जपणे माझ्या कथा पु. आ. चित्रे यांना पाठवल्या. तेही चित्रे काकाच अन् काय. त्यांनी दोन कथा ‘अभिरुची’त छापल्या आणि एक श्री. पु. भागवत यांना पाठवली. तीही ‘सत्यकथे’त छापून आली. मराठी लेखन तिथे थांबलं ते एकदम ‘रिटा वेलीणकर’मध्ये प्रकट झालं.
त्या माझ्या पहिल्या कादंबरीची कथा अशी आहे. प्रथम ती मी ‘ग्रंथाली’ला दिली. दिनकर गांगल यांना ती खूप आवडली. पण प्रसिद्ध काही होईना. दोन वर्ष लोटली. एक दिवशी श्री. पु. भागवतांचा फोन आला. तेही वडिलांच्या वर्तुळातले. सर्वानाच ते अहो-जाहो करायचे, त्याप्रमाणे मलाही. ‘‘तुम्ही कादंबरी लिहिली आहे असं ऐकतो.’’
‘‘हो.’’
‘‘मग कुठे आहे ती?’’
‘‘ग्रंथालीकडे.’’
‘‘मला वाचायला मिळेल का?’’
मी भारावून गेल्यामुळे वाचा बंद.
‘‘म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर.’’
शब्द सापडले एकदाचे. ‘‘हरकत कसली? उद्याच पाठवते.’’
दोन दिवसांनी श्रीपुंचा फोन. ‘‘मला कादंबरी आवडली. तुमची हरकत नसेल तर आम्ही छापू इच्छितो.’’
मी गार. कादंबरी एका वर्षांत प्रसिद्ध. त्यानंतर काही वर्ष लोटली. मग पुन्हा श्रीपुंचा फोन. ‘‘दुसरी कादंबरी लिहिताय न?’’ नियमितपणे दोन-चार दोन-चार महिन्यांनी असेच फोन. कादंबरी डोक्यात होती. पण लिहायला वेळ मिळत नव्हता. शेवटी श्री. पु. जायच्या आधी दोन महिने ‘‘त्या वर्षी’’ ही माझी दुसरी कादंबरी लिहून झाली. श्रीपुंनी ती दोन वेळा डोळ्याखालून घातली. एकेक चूक टिपून काढली. मग ते गेले. त्यानंतर मी कादंबरी लिहिली नाही.
‘रिटा वेलीणकर’ लिहिली तोपर्यंत माझं दुसरं लग्न झालं होतं. अरुण खोपकर या नामांकित चित्रपट दिग्दर्शकाशी. त्या काळात मी खळखळून हसले, चित्रपट निर्मितीच्या दुनियेत आनंदाने विहार केला, अनेक पटकथा लिहिल्या, पुष्कळ शिकले, पण शेवटी धाय मोकलून रडले आणि दुसऱ्या विवाहालाही रामराम ठोकला. असो. माझ्या आयुष्यात तरीही अरुणला मोठं श्रेयस्थान होतं आणि आहे. पण त्याने स्वत:चा फ्लॅट घेतल्यावरच आमचं घर शांत झालं. ते तसं झालं म्हणून त्यानंतरच्या या १८ वर्षांत माझ्या हातून भरपूर काम झालं. आमच्या घराच्या प्रसन्नतेत माझा मुलगा आणि सून यांच्या व्यतिरिक्त दोन इतर व्यक्तींचा मोठा वाटा आहे. अलका धुळप आणि संजय पाष्टे.
अलका १३ वर्षांची असताना आमच्याकडे तिची आई सीता हिच्याबरोबर येऊ लागली. सीता आमच्याकडे धुणी-भांडी करीत असे. नंतर अलका स्वतंत्रपणे वरच्या कामासाठी येऊ लागली. आमच्या आईच्या हाताखाली निगुतीने काम करायला शिकली. बघून बघून स्वयंपाकही शिकली. आज तिने पन्नासाव्वं वर्ष ओलांडलं आहे. ती सकाळी ११.३०च्या ठोक्याला येते आणि ७.३०च्या सुमारास जाते. दुपारी थोडा वेळ पेपर वाचते. इतर वेळ अत्यंत शांतपणे, हसतमुखाने कुठेही कसर न सोडता स्वयंपाकघर सांभाळते. मऊसूत पोळ्या करते. काही पाश्चात्त्य प्रकारही करते. या वर्षी गणेश चतुर्थीला मी घरी नव्हते तेव्हा तिने मोदकसुद्धा केले. तिच्या हाताला उत्तम चव आहे आणि हातात कला आहे. वर्षांतून तीन आठवडे गावाला जाते. ठरल्या दिवशी जाते. ठरल्या दिवशी परत येते. इतर सुट्टय़ा अगदी क्वचित. माझ्यापाशी असा उजवा हात असताना मी भरपूर काम नाही केलं तर मीच कुचकामी ठरणार.
संजय पाष्टे. आमच्याकडे १५व्या वर्षी अरुणच्या कामासाठी मदतनीस म्हणून आला. आज तो दोन मोठय़ा मुलांचा बाप आहे. माझ्याकडे सकाळी काम करतो, बाकी दिवसभर अरुणकडे. आमची सर्व बाहेरची कामं तो करतो. शिवाय घरातली. हसतमुख आणि हरहुन्नरी आहे. ‘संजय, हा बल्ब असा काय करतोय रे?’ ‘मी बघतो ताई.’ संजय बघतो आणि बल्ब ठीक होतो. छोटंमोठं सुतारकाम, प्लम्बिंग आणि अशी कितीतरी कामं तो हौसेने करतो. अरुण जेव्हा चित्रपट बनवत होता तेव्हा संजयने निर्मितीचं सर्व काम शिकून घेतलं होतं. साने गुरुजी शाळेतून दहावी पास झाल्यावर शिक्षण बंद करून उदरनिर्वाहाच्या मागे लागलेला, चायनीज हॉटेलात दिवसभर काम करून रात्री तिथेच टेबलावर झोपणारा हा मुलगा शेवटी आमच्याकडे स्थिर झाला. त्याच्याकडे पाहून गळा दाटून येतो. त्याचा सदा प्रसन्न चेहरा, इमान, कुटुंबाची, कामाची जबाबदारी, समंजसपणा हे सगळं कुठून आलं? अलकाप्रमाणे संजयदेखील ठरलेल्या दिवशी गावी जातो आणि ठरलेल्या दिवशी परत येतो. अतुल पेठे नेहमी म्हणतो, ‘बाई तुम्ही किती काम करता.’ करीत असेन तर त्याचं कारण, मेरे पास अलका और संजय है!
माझ्या स्तंभलेखानाचं श्रेय पूर्णत: बची कर्कारिया या माझ्या जिवलग मैत्रिणीला जातं. मी ‘टाइम्स’च्या कला संपादकाची नोकरी सोडली ती माझं मराठी रंगभूमीवरचं पुस्तक लिहिण्यासाठी. बची तेव्हा ‘टाइम्स’च्या रविवारच्या आवृत्तीची संपादक होती. तिने मला सांस्कृतिक स्तंभ लिहिण्यासाठी आमंत्रित केलं. नंतर ती जेव्हा ‘मिड-डे’ला गेली तेव्हा म्हणाली, ‘मी सोडलेल्या पेपरसाठी काय स्तंभ लिहितेस? आमच्यासाठी लिही.’ तेव्हा मी ‘मीड-डे’साठी स्तंभ लिहू लागले. चार वर्षांनी बची पुन्हा ‘टाइम्स’ला परतली. तेव्हा मीनल बघेल या तिच्या ‘मिड-डे’मधील सहकारिणीची ‘टाइम्स’ने सुरू केलेल्या नवीन पेपरवर संपादक म्हणून नियुक्ती झाली. लगेच बचीने तिला माझी आठवण करून दिली. मीनलने मग मला स्तंभ लिहिण्यासाठी आमंत्रित केलं. तेव्हा आयुष्यभर मी अशा आतल्या वर्तुळांतल्या व्यक्तींच्या कृपेची लाभार्थी ठरले आहे. मॅथ्यू, राजा काका, चित्रे काका, श्री. पु. भागवत, बची कर्कारिया.
‘मुंबई मिरर’साठी मी बारा वर्ष सांस्कृतिक स्तंभ लिहिला. ७९ वर्षे पूर्ण झाली आणि त्या आठवडय़ाच्या बंधनातून मी स्वत:ला मुक्त करून घेतलं. मीनल मला म्हणाली, ‘‘७९? पण तू तर अजून किती तरी तुर्तुरीत आहेस आणि चुरचुरीत लिहितेस. मग स्तंभ का सोडत्येस?’’ म्हटलं, ‘‘इतर खूप गोष्टी करायच्या राहिल्या आहेत म्हणून.’’ पण तुर्तुरीतपणाचं म्हणाल तर त्याचं काही अंशी तरी कारण माझे दोन नातू, शौर्यमन आणि सत्येंद्र आहेत. त्यांच्याबरोबर वेळ घालवणं म्हणजे एकेक वर्षांने तरुण होणं.
पण या सर्व आनंदात काही गोष्टींचं दु:ख आहेच. वैयक्तिक नाही. देशाबद्दल. आपण सहिष्णू का नाही? आपण अजूनही अंधश्रद्धाळू का आहोत? आपण आपल्यांनाच आपलं का मानत नाही? उदारमतवादी राष्ट्रद्रोही कसे झाले? राष्ट्राची काळजी करणारे ते द्रोही. राष्ट्राची खोटी प्रतिमा तयार करून विकणारे ते राष्ट्रप्रेमी. आपल्या लोकांचं हित विसरून भलत्याच्या मागे धावणारे ते देशभक्त. जपानमध्ये बुलेट ट्रेन आहे म्हणून आपल्याकडे आलीच पाहिजे. पण जपानमध्ये अर्धभुकेले लोक मरतायेत का? आपण प्रथम आपल्या लोकांची पोटं भरायची की जपानी पैशांवर बुलेट ट्रेन चालवून परदेशी लोकांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करायचा? खोटं बोलायचं तरी किती? झालेल्या इतिहासाला सामोरं जाण्याचं नैतिक बळ आपल्यात का नाही? इतिहास बदलून त्या खोटय़ा इतिहासाबद्दल गर्व मानायचा हा कसला पळपुटेपणा? या सर्व प्रश्नांनी मन उद्विग्न होतं तेव्हा काळ वर्तुळाकारी आहे या विचाराने मनातली आशा जागृत ठेवावी. शिवाय देशाच्या कानाकोपऱ्यात याही परिस्थितीत विचारी, विवेकी, बुद्धिनिष्ठ माणसं आहेत आणि ती देशाला प्रगल्भ करण्याच्या कामात, न्याय्य समाज घडवण्याच्या कार्यात अखंड गुंतलेली आहेत हा विचार मन खुलवतो. उदाहरणार्थ अरुणा रॉय. उदाहरणार्थ कैलाश सत्यार्थी. उदाहरणार्थ गूंज संस्थेचे अनशू गुप्ता. उदाहरणार्थ विल्सन बेझवाडा. उदाहरणार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती. असे किती तरी. या सर्वाच्यामुळे फरक पडणार हे नक्की. आपल्या आयुष्यात नाही तर आपल्या नातवंडांच्या. तर अशी माझी ही श्रेयस-प्रेयस कथा!
chaturang@expressindia.com