भूकवचातील पदार्थ : खडक
रिश्टर स्केल- भूकंपाची तीव्रता मोजण्याचे रिश्टर स्केल हे परिमाण आहे. १९३५ मध्ये अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स एफ रिश्टर याने हे शोधून काढले, म्हणून त्याच्या नावाने हे परिमाण वापरले जाऊ लागले. रिश्टर हे कॅलिफोर्निया संस्थेत असताना एका वर्षांत २०० भूकंपांची तीव्रता मोजण्याचे सूत्र त्यांनी तयार केले. हेच रिश्टर स्केल नावाने ओळखले जाऊ लागले. भूकंपामुळे किती ऊर्जा फेकली गेली हे रिश्टर स्केल दर्शवते. रिश्टर स्केल
१ आकडय़ापासून सुरू होते आणि ते ९ पर्यंत असते. परंतु प्रत्यक्षात याला कमाल मर्यादा नसते. यातील प्रत्येक स्केल आधीपेक्षा १०ने जास्त असते. २ रिश्टर स्केलपर्यंतचा भूकंप सौम्य मानला जातो.
= मर्केली स्केल- भूकंपमापनाचे मर्केली स्केल हे अमेरिकन मापक आहे. १२ मर्केली तीव्रता भूकंप झाल्यास मानवनिर्मित सर्व गोष्टी जमीनदोस्त होऊन नवा डोंगर, तलाव निर्माण होतात. अमेरिकेत आता या मापकाऐवजी रिश्टर स्केल वापरले जाते.
भूप्रक्षोभ हालचाली (Forces and Landforms)
भूप्रक्षोभ हालचाली : वातावरणाचा प्रभाव आणि भूगर्भातील अत्याधिक तापमान यांमुळे अंतर्गत भागात हालचाली निर्माण होऊन भूपृष्ठावर ताण किंवा दाब पडून भूपृष्ठ अस्ताव्यस्त व त्यात विस्कळीतपणा आणणाऱ्या शक्तींना किंवा प्रक्रियांना ‘भूप्रक्षोभ हालचाली’ असे म्हणतात.
१) अंतर्गत शक्ती (Endogenic Forces)
२) बहिर्गत शक्ती (Exogenic Forces)
= अंतर्गत शक्ती : भूपृष्ठाच्या आतील भागात निर्माण होणाऱ्या हालचालींमुळे भूपृष्ठावर जो बदल होतो, त्याला ‘अंतर्गत शक्ती’ असे म्हणतात. भूकवचात हा बदल होण्याच्या गतीनुसार अंतर्गत शक्तीचे दोन प्रकार पडतात-
= मंद किंवा संथ गतीने कार्य करणाऱ्या शक्ती (Slow Forces) : भूगर्भातील तापमानात बिघाड झाल्यामुळे अंतर्गत शक्ती निर्माण होऊन भूपृष्ठावर ताण किंवा दाब पडून भूपृष्ठाची हालचाल मंद किंवा संथ गतीने होते, या हालचाली दोन प्रकारच्या असतात-
= क्षितिजसमांतर किंवा आडव्या हालचाली (Horizontal Movement)) : भूकवचात क्षितिजसमांतर हालचालींमुळे सर्व दिशांना समान दाब पडतो. यामुळे भूपृष्ठास वेगवेगळ्या प्रकारच्या वळ्या पडतात. भूपृष्ठावर मृदू थरांवर ज्या वळ्या पडतात, याला वलीकरण (Folding) असे म्हणतात.
भूकवचाचे स्वरूप आणि दोन्ही बाजूंकडील येणारा दाब यांवर वळीचे स्वरूप अवलंबून असते. ज्या वेळी दोन्ही बाजूंनी दाब येतो त्या वेळी भूपृष्ठास वळ्या पडतात व भूपृष्ठ खाली-वर होते. भूपृष्ठाचा जो भाग वर उचलला जातो त्या भागास ‘अपनती’ असे म्हणतात. भूपृष्ठाचा जो भाग
खाली गेलेला असतो किंवा दाबला जातो त्या भागास ‘अवनती’ असे म्हणतात.
वळ्यांचे प्रकार (Types Of Folds) :
= समान वळ्या (Symmetrical Folds) : भूकवचावर जेव्हा दोन्ही बाजूंकडील दाब समान व सारखाच असेल अशा वेळी भूकवचास वळी पडून दोन्ही बाजूंकडील उतार सारखाच असतो. या प्रकारच्या वळीस ‘समान वळ्या’ असे म्हणतात. (क्रमश:)
लेखन : डॉ. जी. आर. पाटील