दागिने आणि स्त्रिया याचं नातं म्हणजे कधीही न तुटणारं. दागिन्यांच्या डिझाइन्स पाहताना वेळ कसा जातो हेच कळत नाही. दागिन्यांच्या डिझाइन्स आपल्या माहितीप्रमाणे अधिक म्हणजे किती असतील तर शंभर म्हणजे खूप झाल्या. पण यापेक्षा अधिक डिझाइन्स दागिन्यांमध्ये असतात बरं का.. काही लाखांमध्ये असलेल्या या डिझाइन्स पाहताना डोळ्याचं पारणं फिटतं. नुकत्याच मुंबईमध्ये झालेल्या आयआयजेडब्ल्यू या सोहळ्यात दागिन्यांचे वैविध्यपूर्ण डिझाइन्स पाहायला मिळाले.
दागिन्यांची परंपरा आपल्याकडे फार पूर्वापार चालत आलेली आहे. प्रत्येक समाजात काही खास दागिने घालण्याचीही परंपरा आपल्याला नवीन नाही. धर्मागणिक दागिन्यांची निवड ही बदलते हा ट्रेंड तर अगदी प्रत्येकाला माहीत आहे. दागिने घेताना प्रत्येक स्त्री त्यामध्ये आलेली नवीन डिझाइन्सना अधिक प्राधान्य देते. अलीकडे जुनी बोरमाळ ही पुन्हा इन डिझाइन असल्याने केवळ साडीवर एखादी बोरमाळ असली की बास. बिंदीही इन फॅशन आहे. या बिंदीमध्ये झुमक्यासारखी असणारी डिझाइन आणि त्याला घुंगरू ही फार मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळेल. कंबरेचा पट्टा, नथ, वाक यासारख्या कित्येक डिझाइन्स बाजारात नव्या पाहायला मिळतील. केसातल्या भांगेमध्ये सोन्याचा सरडा या फॅशन शोमध्ये पाहायला मिळाला. आदिवासी लोकांच्या या परंपरेला इंडिया ज्वेलरी फॅशन वीकमध्ये स्थान मिळाले होते. अंगठीमध्ये आलेल्या नवनवीन डिझाइन्सनेही लक्ष वेधून घेतले. अंगठीचा वापर केवळ एकाच बोटात घालण्यासाठी होतो. परंतु यावर असलेली डिझाइन तुम्ही दोन बोटात अंगठी घातल्यासारखी वाटते. अशा विविध स्टोन्समधील अंगठय़ा. गळ्यातील हार त्यावर केलेली कलाकुसर या विविध गोष्टी नव्याने आपल्याला पाहायला मिळतील. हातातील कंगनमध्येही व्हरायटी असलेली पाहायला मिळेल. यामध्ये या कंगनलाच जोडून असलेली साखळी आपलं लक्ष वेधून घेते. या साखळीला काही वेळा घुंगरांची जोडी अगदी खुलून दिसते. साखळीच्या टोकाशी आपल्या नावाचे आद्याक्षरही सोन्यात घडवून घेता येऊ शकते. मोराला आपल्या गळ्यातील दागिन्यांमध्ये फार पूर्वीपासून स्थान आहे. परंतु या मोराच्या आकारामध्येही बदल करून तो आता बांगडीमध्येही पाहायला मिळेल. कंबरपट्टय़ामधील डिझाइन्समध्ये केवळ साखळी किंवा त्याला अनुसरून इतर अनेक डिझाइन्सही पाहण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने फुलांची डिझाइन इन आहे. कानामध्ये द्राक्षाची वेल आणि त्याच पद्धतीमधील कानातले पण याचे रंग मात्र नानाविध आपल्याला पाहायला मिळू शकतात. मोती आणि हिरा यांचे कॉम्बिनेशन साधून उत्तम तयार केलेल्या डिझाइन्सही या शोमध्ये पाहायला मिळाल्या. मोती आणि हिऱ्याचे कॉम्बिनेशन साधून केवळ गळ्यातील सेट नाही तर हातातील बांगडय़ांमध्येही वैविध्य पाहायला मिळाले. साडीचा ब्रोच किती वेगळ्या पद्धतीने डिझाइन होऊ शकतो याची उत्तम कल्पना या शोमार्फत आली. या ब्रोचमध्ये अनेक प्रकारचे पक्षी आणि प्राण्यांचे ब्रोच आकर्षणाचा भाग ठरली. तसेच साडी किंवा ड्रेसवर जास्वंदीच्या फुलाचा ब्रोच आणि त्याच आकाराची अंगठी हे कॉम्बिनेशन थोडं हटके आणि वेगळंच होतं. सोन्याच्या जाडसर सरीमध्ये एक मोठा लाल खडा ही एक नवीन डिझाइन अनेकांना भावली. यामध्ये केवळ एका बाजूला असलेल्या या खडय़ाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
दागिन्यांमध्ये असलेली ही कलाकुसर पाहताना डोळे दीपून गेले. नानाविध डिझाइन्समधील कुठलं सर्वात उत्तम होतं हे मात्र एक कोडंच होतं.

Story img Loader