‘इस्लामविरोधी लिखाण केले म्हणून बांगलादेशातल्या तीन लेखकांना मारिले!’.. ‘मुस्लीम मुली शाळेत जाऊ लागल्या म्हणून त्यांना पाकिस्तानी कर्मठांनी गोळ्या घातल्या!’.. ‘काबुलमध्ये प्रेमी युगुलास दगडांनी ठेचले!’ आमच्या देशभक्त संस्थेत काल आम्ही इस्लामी दहशतवाद्यांच्या कार्याचा आढावा घेत होतो. इस्लामी कर्मठांचे हे कार्य खचितच नोंद घेण्यासारखे आहे. अर्थात वरील सर्व घटना वाईटच. पण किती ते धर्मप्रेम! हे असे धर्मप्रेम आमच्या बांधवांमध्ये कधी जागृत होणार? आम्ही याच प्रश्नाचा ऊहापोह करण्यास जमलो होतो. कुणी सुधारणा करायचं म्हटलं तेव्हा आम्ही हिंदूंनी सुधारणा होऊ दिल्या, आमची प्राचीन उज्ज्वल कर्मकांडे सोडून दिली.. असे नाही नाही ते प्रकार आमच्या हातून घडले. मैत्रीने लोक जोडले जातात; पण त्यापेक्षा अधिक भीतीने जोडले जातात, हे या दहशतवाद्यांनी सिद्ध केले आहे. आज जगभरातून त्यांच्या कार्याची घेतली जाणारी दखल अनेकांना त्यांच्याकडे आकर्षित करीत आहे.
आणि आमच्याकडे आकर्षित होत आहेत फक्त आमचे टीकाकार! आजकाल जो उठतो तो हिंदूविरोधी मत व्यक्त करतो. तेव्हा त्यांना खरे तर उठूच देऊ नये असे मत काहींनी मांडले. त्यावर जो बसतो तोही हिंदूविरोधी मत मांडतो, असे शेजारच्या तात्यांनी निदर्शनास आणून दिले. काही माणसे झोपेतही हिंदू धर्मास नावे ठेवत असतात असेही दिसून आले. त्यामुळे नक्की कोणत्या शारीरिक अवस्थेतील मनुष्य हिंदू धर्माचा अपमान करणार नाही, याबद्दल आमचा थोडा गोंधळ उडाला.
आणि त्या गोंधळातही बाहेरून ‘अल्ला हो अकबर’ची आरोळी ऐकू आली! आमच्या पलीकडच्या मोहल्ल्यातून आवाज येत होता. आमची पहिली प्रतिक्रिया पटकन् हॉलमधील टेबल-खुच्र्याखाली ठेवलेल्या काठय़ा हातात घेण्याकडे झाली! वाक्य पूर्ण होऊ द्या, उगीच कुत्सित हास्य नको.
अखेर आम्ही काही सुदृढ माणसे काय झाले ते पाहण्यासाठी तिकडे गेलो. जाताना अर्थातच पुण्यातील मोदी गणपतीचे स्मरण करण्यास विसरलो नाही. त्याच्याइतका जागृत गणपती आज नाही!
तिथे पोचता पोचता ती आरोळी नसून आक्रोश आहे हे लक्षात आले. आणि शब्द ‘अल्ला हो अकबर’ नसून ‘गेल्ला हो अकबर’ आहेत हे स्पष्ट झाले. आता अकबर जाऊन तर चार-पाचशे वर्षे झाली. आजच त्याबद्दल शोक का, हे कळेना. त्यावर- हा अकबर म्हणजे त्या मोहल्ल्यातला वीस वर्षांचा पोरगा होता असे कळले. ‘इसिस’ या विश्व मुस्लीम सेवा संघात सेवक म्हणून जात असता त्याला पोलिसांनी पकडला. म्हणून ‘गेला हो अकबर’ असा आक्रोश चालू होता!
त्यांचे दु:ख आम्ही त्यांच्यासारखेच धर्माभिमानी म्हणून समजू शकतो. धर्मासाठी इतरांना वेचून मारण्याआधी स्वत:च पोलिसांकडून वेचले जाणे म्हणजे तारुण्य नासण्यातलाच प्रकार. ज्या मुस्लिमांनी त्याच्या अटकेचे स्वागत केले त्यांच्याविरुद्ध लागलीच फतवा काढून त्यांना बांगलादेश व अफगाणिस्तान येथे पाठवून देण्याची शिफारस करण्यात आली.
एकूण इस्लामविषयी आम्हास विशेष उत्सुकता होती. चार-चार लग्ने, अनेक अपत्ये, फतवे, जिहाद हे विविध गुणदर्शन घडवणारे कार्यक्रम जाणून घेण्यास आम्ही केव्हाचे उत्सुक होतो. आता या अकबरच्या निमित्ताने त्या मोहल्ल्यातील धर्मवेत्त्यांबरोबर आमचा संवाद झाला. त्यातून एक वेगळाच इस्लाम आमच्यासमोर आला.
चार बायका करण्याची मुभा याचे इतरधर्मीयांना खूप आकर्षण. पण खरंच विचार करा, ते आकर्षक आहे का? एक बायको नाकी नऊ आणत असता अजून तीन गळ्यात बांधून घेणे ही मौज? त्या वृद्ध मुल्लाचा हा सवाल ऐकला आणि आमचा अगदी पिंपळाखालचा बुद्ध झाला! खरंच, चार बायका करणे म्हणजे मौज करणे नसून, हा प्रखर हटयोगाचाच प्रकार म्हणायचा. जगाच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त बायका स्वत:वर ओढवून घेऊन इतर पुरुषांस दिलासा देण्याचे हे कृत्य नोबेल शांती पुरस्काराच्या शर्यतीत प्रवेश करणारे आहे. त्याला जोडून येणारा अनेक अपत्यांचा मुद्दाही सहजी निकालात निघाला. ‘अपत्य’ आणि ‘आपत्ती’ या शब्दांतील साधम्र्य आपल्या पूर्वजांनी मुद्दामच योजून ठेवले आहे. एका अपत्याचा खर्च व ब्रॉडबॅंडचा पासवर्ड त्याच्या हातात पडू नये म्हणून करावा लागणारा खटाटोप- ही चेष्टा नव्हे. तर मोठे लेंढार किती त्रासदायक असेल?
इस्लामचे एकमेव गाइड म्हणजे कुराण. प्रश्नपत्रिकेत अवघड प्रश्न आले, की लगेच कुराण उघडून ते कॉपी करतात! मोठे धोरणी धोरण आहे हे. उगीच नवनवीन पुस्तके रचा, समाजाकडून ती पाठ करवून घ्या, २१ अपेक्षित प्रश्नसंच बनवा.. कशाला? त्याने माणसे उगीचच विचार करू लागतात. मग त्यांचे विचार ऐकण्यासाठी टीव्हीचा शोध लावावा लागतो, चर्चाचे कार्यक्रम करावे लागतात, रिमोटवरून भांडणे होतात. किती वेळ आणि ऊर्जेचा अपव्यय! त्यापेक्षा आजही चौदाशे वर्षांपूर्वीचे पुस्तक रिफर करावे; समस्या सोडवणे सोपे होते. शिवाय एकच पुस्तक निघाल्याने व शिक्षणास फाटा दिल्यामुळे कागदबचत होऊन ‘आपला धर्म इकोफ्रेंडली आहे’ असेही म्हणता येते.
आम्हा हिंदूंचा हा एक मोठा तोटा आहे, की आम्हाला एकच गाइड नेमून दिलेले नाही. अनेक आहेत. त्यामुळेच आमच्यात एकी नाही. शेजारच्याचे चोरून बघून लिहिण्यातही अर्थ नसतो. कारण परीक्षक कोणते गाइड वापरून पेपर तपासणार हे माहीत नसते. वाल्मिकींनी लिहावे- पूल वानर आर्किटेक्टनी बांधला, तर तुलसीने लिहावे- रामनामामुळे दगड तरंगू लागले! विश्वास ठेवावा कोणावर? अशावेळी ज्या गोष्टीत कष्ट कमी अशा गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवतो. दुपारी ताक पिऊन वामकुक्षी करण्याऐवजी बांधकाम करण्याच्या माकडचेष्टा प्रमोट करणारी गोष्ट दूर ठेवतो आणि चमत्कारावर विश्वास ठेवतो. म्हणून उगीच नव्या युगानुसार वगैरे चालण्याचे कष्ट करण्यात अर्थ नसतो. मुळात नवे युग फार खर्चीक असते. बाकी प्रगती वगैरे गोष्टी मानण्यावर आहेत.
आमचे अंत:करण हेलावले ते जिहादविषयक गैरसमजाने. मुळात त्यांच्याकडे दिवाळी नाही. त्यामुळे रोषणाई वगैरे त्या गरीबांना कधी करायला मिळत नाही. ती उणीव ते असे स्फोट वगैरे करून मिटवतात. आणि त्यासाठी त्यांना अश्विन अमावास्याच लागते असे नाही. कुठल्याही दिवशी, दिवसाउजेडीसुद्धा ते दिवाळी साजरी करून हिंदूंचाच सण अधिक व्यापक करू पाहत आहेत. आता आपल्याकडेही फटाक्यांनी अपघात होऊन माणसे मरतातच की! मग त्यांच्या बॉम्बांमुळे काही लोकं मेली, तर एवढे हरकत घेण्याचे काय कारण?
अजून एक शक्यता.. चार-चार बायकांच्या कलकलाटामुळे मुस्लीम पुरुष गांजून जाई. हा जन्म संपून स्वर्गात गेल्यावरच सुख लाभेल, या अपेक्षेने तो जीवन संपवी. पुढे काहींनी तर इतरांनाही ते सुख मिळावे म्हणून स्वत:बरोबर अनेक लोकांना संपवण्याचा घाट घातला व आजच्या आत्मघातकी दहशतवाद्यांचा जन्म झाला. एकच समस्या आहे की, ज्या स्त्रियांना कातावून ते आत्महत्या करू लागले, त्याच स्त्रिया त्यांना स्वर्गात हव्या असतात! मुल्लांना हा मुद्दा पटला. लवकरच त्याचेही समर्थन आम्ही शोधू असे आश्वासन त्यांनी दिले.
अतिरेकी ही जपानी ‘रेकी’ या पद्धतीची पुढील पायरी आहे. दहशतवादी असे कोणीही नसून, खरे तर दहशतवाद्द्य या अरबी वाद्द्याचे क्लासेस घेणारी माणसे आहेत, ही अजून काही स्पष्टीकरणे आम्हाला मिळाली. आता हे ‘इसिस’वाले महिलांची खरेदी-विक्री करू लागले आहेत. अशा रीतीने मुस्लीम पुरुष बायकांना किंमत देत नाहीत, हा आरोप त्यांनी खोडून काढला! शिवाय ‘इसिस’मध्ये महिलांशी अत्यंत ‘तसे’ वागण्याची चळवळ सुरू झाली आहे. हा एक अत्यंत नवा विचार आहे असे त्या मुल्लांचे मत पडले. केवळ लैंगिक-शिक्षण हेतूने ते प्रकार केले जातात याची ग्वाही त्यांनी दिली. शिवाय, त्या मुलींची अब्रू पुढे कधी लुटली जाऊन त्यांना लज्जास्पद आयुष्य जगायला लागू नये म्हणून आधीच त्यांची अब्रू लुटून ठेवलेली बरी, हा आजपर्यंत कुणालाही न सुचलेला प्रीव्हेन्टिव्ह उपाय त्यांनी समस्त स्त्रीजातीला बहाल केला आहे! काही कोवळे तरुण स्वत:च्या अब्रूची पर्वा न करता त्या कार्याला वाहून घेतात, हे ऐकून आम्ही सद्गदित झालो. हा अकबरही त्याच कार्याला स्वयंसेवक म्हणून जात होता, तो बिचारा पकडला गेला. आता काय त्याच्या नरदेहाचा उपयोग?
आमचा सनातन धर्म याच ‘इसिस’ किंवा तालिबानमार्गे न्यावा म्हणून काहींनी तशी वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्या प्रयोगांकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. आता मधेच परत आमच्या त्या सुधारक, समंजस, सदसद्विवेकबुद्धीने डोके वर काढले नाही म्हणजे मिळवली. अरे हो, या सदसद्विवेकबुद्धीवर काही जडीबुटी आहे का, हे त्या मुल्लाला विचारायचे विसरलो.. त्यांच्याकडे नक्कीच असणार!
n lokrang@expressindia.com
गेल्ला हो अकबर!
आम्हा हिंदूंचा हा एक मोठा तोटा आहे, की आम्हाला एकच गाइड नेमून दिलेले नाही. अनेक आहेत.
Written by परेश मोकाशी
First published on: 03-04-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व सुदाम्याचे ऑरगॅनिक पोहे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Religion and conflict