ट्वेन्टी-२० विश्वचषक म्हणजे जगातील अव्वल दहा संघांमध्ये रंगणारे द्वंद्व. त्यापैकी ठरलेले प्रमुख संघ अंतिम फेरीपर्यंत धडक मारतील, याचा अंदाजही अनेकदा अचूक ठरतो. तसा याही वेळेला ठरला. न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि यजमान भारत यांनी अंतिम चौघांत प्रवेश मिळवला. न्यूझीलंड वगळता इतर तीन संघांनी अडखळत इथवर मजल मारली. पण या संघांपेक्षा अफगाणिस्तानने विश्वचषकावर छाप पाडली. क्रिकेटचा पूर्वेतिहास नसताना आणि पुरेसे पाठबळ नसताना या संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत केलेली कामगिरी कौतुकास पात्र आहे. त्यांनी अंतिम चारमध्ये धडक मारली नसली तरी स्पध्रेतील त्यांची कामगिरी ही बांगलादेश आणि झिम्बाब्वे या प्रदीर्घ काळापासून क्रिकेट खेळणाऱ्या देशांना विचार करायला लावणारी आहे. ज्या देशात सतत हत्या, बॉम्बस्फोट आणि दहशतीचे वातावरण आहे, जिथे बंदुकांच्या गोळ्या फटाक्यांच्या आतषबाजीसारख्या उडतात, अशा अफगाणिस्तानने अल्प कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे बिगूल वाजल्यापासून कोणते दोन संघ दुसऱ्या गटात प्रवेश करण्यात यशस्वी होतील, याची खरमरीत चर्चा रंगली होती. त्यात बांगलादेश आणि झिम्बाब्वे या देशांचे नाव आघाडीवर होते, परंतु अफगाणिस्तानने झिम्बाब्वेला बाजूला सारून प्रमुख संघांना टक्कर देण्याचे शिवधनुष्य उचलले. केवळ उचलले नाही, तर काही अंशी पेललेही. अफगाणिस्तानने दुसऱ्या फेरीतील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या श्रीलंकेला अक्षरश: विजयासाठी रडवले. त्यांचा अनुभवी फलंदाज तिलकरत्ने दिलशान टिकून राहिला नसता, तर ऐतिहासिक विजय निश्चित होता. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिका व इंग्लंड संघांच्या गोलंदाजांची त्रेधातारिपीट उडवत अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी प्रतिस्पध्र्याचा घाम काढला. केवळ अनुभवाच्या कमतरतेमुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विजयरथावर आरूढ झालेल्या वेस्ट इंडिजला त्यांनी अखेरच्या साखळी सामन्यात नमवून तर इतिहास घडविला. पाकिस्तानचा माजी कर्णधार इन्झमाम उल हक याच्या मार्गदर्शनाखाली संघाने कामगिरीचा आलेख उंचावला आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर संघाची कामगिरी उल्लेखनीय झाली. प्रतिस्पर्धी कितीही अनुभवी, ताकदवान असला तरी त्याचा धाडसाने सामना करण्याची वृत्ती संघातील प्रत्येक खेळाडूचे वैशिष्टय़. मोहम्मद शहजाद, नूर अली झाद्रान, असघर स्टॅनिकझाई, गुलबदीन नायब, मोहम्मद नबी, समिउल्लाह शेनवारी ही आक्रमक फलंदाजांची फौज आणि आमीर हमझा, दवलत झाद्रान, शपूर झाद्रान, नबी, शेनवारी आणि रशिद खान हे अचूक व प्रभावी मारा करणारे गोलंदाज या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने जगाला सापडले. कोण जाणे यापैकी एखादा खेळाडू भविष्यात बिग बॅश, इंडियन प्रीमिअर लीग, पाकिस्तान प्रीमिअर लीग, बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये आपली छाप सोडताना दिसेल. पुरेसा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव मिळाल्यास अफगाणिस्तान संघ आणखी ऐतिहासिक विजय नोंदवील हे निश्चित. फक्त या हिऱ्यांना पैलू पाडण्याची गरज आहे.
स्टम्प व्हिजन : हिऱ्यांना पैलू पाडण्याची गरज
अफगाणिस्तानने दुसऱ्या फेरीतील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या श्रीलंकेला अक्षरश: विजयासाठी रडवले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 30-03-2016 at 05:02 IST
मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afghanistan impress in icc t20 world cup