निवृत्ती लांबणीवर टाकण्याचा निर्णय
विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने कर्णधारपदाचा त्याग केला आहे, मात्र यापुढेही खेळत राहणार असल्याचे त्याने ‘ट्विटर’द्वारे स्पष्ट केले आहे.
विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे त्याने संकेत दिले होते. मात्र आपल्या सेवेची पाकिस्तानला गरज असल्यामुळे आपण यापुढेही खेळत राहणार आहोत, असे त्याने म्हटले आहे. आफ्रिदीने यापूर्वीही अनेक वेळा निवृत्ती जाहीर केली होती व क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. त्यामुळे त्याचा हा निर्णय आश्चर्यजनक नाही. आफ्रिदीने २०१०पासून ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले आहे.
‘‘मी स्वत:हूनच पाकिस्तानच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडत आहे. कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना मी नेहमीच संघाचाच विचार केला आहे. माझ्या कारकीर्दीत मी नेहमीच प्रामाणिक वृत्तीने देशासाठी खेळण्यास प्राधान्य दिले होते. क्रिकेटच्या तीनही स्वरूपांच्या सामन्यांमध्ये मला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली हे माझे खूप भाग्यच होते. त्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरीयार खान यांचा मी ऋणी आहे. मी अजूनही देशासाठी तसेच अन्य लीगमध्ये खेळणार आहे,’’ असे आफ्रिदीने सांगितले.
आफ्रिदीने कसोटी कारकीर्दीत २७ सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यामध्ये त्याने १,७१६ धावा केल्या, तर ४८ बळी घेतले. २०१०मध्ये त्याने कसोटी कारकीर्दीला रामराम केला होता. याशिवाय ३९८ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ८,०६४ धावा केल्या आणि ३९५ बळी घेतले. ट्वेन्टी-२०मध्ये त्याने आतापर्यंत ९८ सामन्यांमध्ये १,४०५ धावा केल्या असून ९७ बळी घेतले आहेत.

Story img Loader