‘टी-२० वर्ल्डकप’मध्ये रविवारी पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या क्रिकेट सामन्यातील विराटच्या तडाखेबंद खेळीने बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना देखील प्रभावित केले आहे. रविवारी खेळ संपल्यानंतर विराटला टोमणा मारणारा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू एंड्रयू फ्लिंटॉफला अमिताभ बच्चन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. इंग्लंडचा युवा क्रिकेटपटू जो रूट विराटपेक्षा श्रेष्ठ असल्याचा संकेत देणारे टि्वट एंड्रयू फ्लिंटॉफने ऑस्ट्रेलिया-भारताचा सामना संपल्यानंतर पोस्ट केले होते. टि्वटरवरील आपल्या संदेशात तो म्हणतो की, कोहली अशा प्रकारे शानदार प्रदर्शन करत राहिल्यास एक दिवस तो जो रूटच्या बरोबरीला येईल. फायनलमध्ये इंग्लंडचा मुकाबला कोणाशी होईल, याबाबत खात्री नसल्याचेदेखील त्याने टि्वटरवरील संदेशात म्हटले आहे.


अमिताभ बच्चन यांना ही तुलना न आवडल्याने त्यांनी फ्लिंटॉफला टि्वटरच्या माध्यमातून त्याच्याच शब्दात उत्तर दिले. उत्तरादाखल लिहिलेल्या टि्वटमध्ये ते म्हणतात, “कोण रूट, रूटला मुळापासून उखडून देऊ…!!!” भारतीय संघाने रविवारी प्राप्त केलेल्या विजयानंतर अमिताभ बच्चन यांनी विराट कोहलीचे अभिनंदन केले होते. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून खूप काही शिकण्यासारखे असल्याचे सांगत धोनीचा गौरव केला. क्रिकेटचे चाहते असलेल्या अमिताभ यांनी ‘टी-२० वर्ल्डकप’च्या कोलकातामधील भारत-पाकिस्तानदरम्यानच्या क्रिकेट सामनादरम्यान उपस्थिती लावून राष्ट्रगीतदेखील म्हटले होते.

Story img Loader