टी२० विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारताच्या आशा न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यावर आहेत. त्यामुळेच भारतात सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांपासून अगदी सेलिब्रेटींपर्यंत सर्वांचंच लक्ष या लढतीवर आहे. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही या सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांसाठी एक ट्वीट केलंय. यात त्यांनी टी२० विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाच्या यशाविषयी चाहत्यांना काही आठवणी करून दिल्यात. सध्या गट २ मध्ये पाकिस्तानसोबत भारतही आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्वीट क्रमांक ४०८८ मध्ये म्हटलं, “टी२० विश्वचषकातील न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याचा निकाल काहीही असेना, भारताने यंदाच्या विश्वचषकातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या केली, के. एल. राहुलने सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केलं आणि भारताने विरोधी संघाला विक्रमी ६(+) षटकांमध्ये पराभूत केलं.”

हेही वाचा : ख्रिस गेलनं मैदानावरच डेविड वॉर्नरच्या खिशात हात घातला, फोटो व्हायरल, नेमकं काय घडलं?

गुणतालिकेचा विचार करता दुसऱ्या गटामध्ये पाकिस्तान ८ अकांसह सर्वात वरच्या स्थानावर आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. पण दुसऱ्या स्थानासाठी खरी रस्सीखेच आहे. सध्या न्यूझीलंड ६ गुण आणि १.२७७ च्या नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारत ४ सामन्यांमध्ये ४ गुणांसह १.६१९ नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. आणि अफगाणिस्तान ४ सामन्यांमध्ये ४ गुणांसह १.४८१ नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे.

जर न्यूझीलंडचा संघ जिंकला तर…

पण खरी गोम या आकडेवारीमध्येच आहे. जर आजच्या सामन्यात न्यूझीलंडनं विजय मिळवला, तर न्यूझीलंड ८ गुणांसह थेट सेमीफायनलमध्ये पोहोचेल. भारताला न्यूझीलंडचा पराभव हवा आहे जेणेकरून त्यांचे गुण सहाच राहतील आणि नामिबियाविरुद्धच्या सामन्यात जिंकून भारताला त्यांच्या गुणांशी बरोबरी करता येईल.

जर अफगाणिस्तानचा संघ जिंकला तर..

अफगाणिस्तानचा विजय झाल्यास न्यूझीलंडचे गुण सहाच राहतील. त्यामुळे सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातून ज्या संघाचा नेट रनरेट जास्त असेल, तो संघ यशस्वी ठरेल.

जर अफगाणिस्ताननं मोठ्या फरकानं सामना जिंकला तर..

पण या सगळ्या आकडेमोडीमध्ये जर अफगाणिस्ताननं आजचा सामना मोठ्या फरकानं जिंकला, तर मात्र भारतासाठी ती डोकेदुखी ठरेल. कारण भारत आणि अफगाणिस्तान यांच्या नेट रनरेटमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे अफगाणिस्ताननं आज मोठा विजय मिळवत नेट रनरेट वाढवला, तर भारताला सोमवारी नामिबियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याहून मोठा विजय मिळवावा लागेल. तेव्हा कुठे आपले गुण अफगाणिस्तानएवढेच असले, तरी नेट रनरेटच्या जोरावर भारत सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.

मात्र, आज अफगाणिस्ताननं मोठ्या फरकाने विजय मिळवला आणि सोमवारी नामिबियाविरुद्ध भारत पराभूत झाल्यास किंवा विजय मिळवूनही नेट रनरेटच्या बाबतीत अफगाणिस्तानपेक्षा कमी पडल्यास मात्र भारताऐवजी अफगाणिस्तान सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकतो!

Story img Loader