सामना जिंकायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे फक्त गुणवत्ता असून चालत नाही तर खंबीर मानसिकताही असावी लागते. विश्वचषकामध्ये खेळत असलेल्या श्रीलंकेच्या संघात गुणवत्ता तर आहे; पण ते मानसिकदृष्टय़ा हरवलेले दिसतात. याचे मुख्य कारण संघाचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज असल्याचे प्रकर्षांने जाणवते. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी मॅथ्यूज म्हणाला होता की, ‘‘लसिथ मलिंगा खेळणार नसल्याने माझ्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली खरी; पण मी त्यासाठी मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त नाही. पण देशाच्या संघासाठी मला ही जबाबदारी पार पाडावी लागेल.’’ पहिली गोष्ट कोणत्याही कर्णधारासाठी हे वक्तव्य अयोग्यच. जर एक कर्णधार म्हणून तुम्ही मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त नसाल तर तुम्ही संघाला विजयासाठी प्रेरणा देणार कुठून? दुसरीकडे जर आपण कर्णधारपद स्वीकारण्यासाठी सक्षम नाही, हे समजल्यावर ते स्वीकारणेही निर्थक. ही बाब जर त्याने निवड समितीला सांगितली असेल आणि तरीही जर त्यांनी त्याच्याच डोक्यावर हा काटेरी मुकुट बसवला असेल तर ती त्यांची चूकच. कारण त्यांच्याकडे दिनेश चंडिमलसारखा दुसरा पर्याय उपलब्ध होता, त्याचा विचार त्यांना करता आला असता. पण आता मॅथ्यूजच्या गळ्यात कर्णधारपदाचे लोढणे बांधल्याचे परिणाम सर्वानाच दिसत आहेत.
श्रीलंकेचा पहिलाच सामना अफगाणिस्तानबरोबर होता, तो त्यांनी जिंकलाही. पण संघाची देहबोली ही विजेत्यासारखी नव्हती. तिलकरत्ने दिलशानने एकहाती हा सामना जिंकून दिला. पण जर तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यासारखा झटपट बाद झाला असता तर विश्वचषकातील मोठा धक्का पाहायला मिळाला असता. वेस्ट इंडिजने हेच हेरले. त्यांनी ख्रिस गेलशिवाय विंडीजने श्रीलंकेला पराभूत करण्याची किमया दाखवली खरी, पण त्यांचेही प्रयत्न कमीच पडत होते. सलामीवीर आंद्रे फ्लेचर खेळपट्टीवर उभा राहिला आणि भरकटलेल्या श्रीलंकेने बऱ्याच चुका केल्या, त्याचीच परिणती वेस्ट इंडिजच्या विजयात झाली.
आपण गतविश्वविजेते आहोत, हा आविर्भाव कुठेच श्रीलंकेच्या संघात दिसत नाही. कुमार संगकारा, महेला जयवर्धने आणि मलिंगा यांच्याविना खेळणाऱ्या श्रीलंकेच्या संघात गुणवत्ता नाही, असे नाही. पण संघाचा कर्णधारच जर मानसिकदृष्टय़ा आजारी असेल, तर त्याचा फटका संघाला बसणार, हे नक्की. विश्वचषकासाठी कर्णधार कसा असायला हवा, याचे उत्तम उदाहरण क्लाइव्ह लॉइड, कपिल देव, इम्रान खान, स्टीव्ह वॉ, अर्जुन रणतुंगा, रिकी पॉन्टिंग आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनी यांनी दाखवून दिले आहे, त्यांच्या पंक्तीत मॅथ्यूज कुठेही बसताना दिसत नाही. संघाचा प्रेरणास्रोत हा कर्णधार असतो, पण जर त्यानेच खांदे पाडले तर काय होईल, हे आपण श्रीलंकेकडे पाहून बघू शकतो. आपल्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीची जाणीव मॅथ्यूजला कुणी तरी करून देण्याची गरज आहे. दुखापतींमुळे तो खंगला असेलही, पण विश्वचषकात कर्णधारपद भूषवण्याची संधी सर्वानाच मिळत नाही. मॅथ्यूजने या गोष्टीचा विचार करायला हवा, तेच त्याच्यासाठी श्रीलंकेसाठी हिताचे असेल.

Story img Loader