क्रिकेट जगतातला सर्वात व्यावसायिक संघ म्हणून ऑस्ट्रेलियाची गणना केली जाते. वातावरण कसेही असो, खेळपट्टी कुठलीही असो, प्रतिस्पर्धी कुणीही असो आम्ही मैदान मारूनच दाखवू, असे त्यांचे ब्रीदवाक्य असते. पाच वेळा एकदिवसीय विश्वचषक पटकावण्याचा विश्वविक्रमही त्यांच्याच नावावावर. पिढय़ा बदलल्या, खेळाडू बदलले, पण जिंकण्याची ईष्र्या मात्र कायम राहिली. पण प्रत्येक गोष्टीला काही अपवाद असतात, त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाला अजून एकदाही ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकता आला नाही, हे सत्य आहे.
ऑस्ट्रेलियाच्या रक्तातच आक्रमकता आहे. जिंकण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, याची अनेक उदाहरणेही आहेत. पण संघात आक्रमकता असूनही त्यांना ट्वेन्टी-२० विश्वचषकाला गवसणी घालता येऊ नये, हे कुठे तरी मनाला पटत नाही. पण त्यांना विश्वविजेत्यापदाला साजेशी कामगिरी करता आली नाही, हेदेखील तेवढेच खरे आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत एकदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. पण त्या वेळी इंग्लंडने त्यांच्यावर विजय मिळवला आणि जेतेपदाचे स्वप्नच सत्यात उतरायचे राहून गेले. या विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच मातीत नमवण्याचा भीमपराक्रम ऑस्ट्रेलियाने केला होता. पण विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात त्यांना न्यूझीलंडने धक्का दिला. फिरकीसाठी पोषक खेळपट्टीवर त्यांना १४३ धावांचे आव्हानही पेलवता आले नाही. खरे तर हे आव्हान फारसे मोठे नव्हतेही. पण तरीदेखील ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अपयशी ठरले. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला खरा, पण मोठे फटके मारण्याची लालसा त्यांना या वेळीही नडली. उस्मान ख्वाजाने अर्धशतक झळकावत संघासाठी चांगला पाया रचला होता. जिंकण्यासाठी फार कमी धावांची गरज असताना मोठय़ा फटक्याने विजय मिळवण्याची त्यांची मनीषा असावी, पण त्यासाठी त्यांना तीन फलंदाज फुकटात गमावले. यामध्ये मॅक्सवेलसारख्या फलंदाजाचाही समावेश होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलियाचा संघ लौकिकाला साजेसा खेळला. स्मिथने कर्णधाराला साजेशी खेळी साकारली, त्याला मॅक्सवेल आणि वॉटसन यांची साथ मिळाली. फॉकनरने पाच बळी मिळवण्याची किमयाही साधली. भारताविरुद्ध त्यांचा निर्णायक सामना होता. भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाचे पारडे जड समजले जात होते. तशी बेधडक सुरुवातही त्यांच्या सलामीवीरांनी केली, पण त्याला साजेशी मोठी धावसंख्या त्यांना उभारता आली नाही. पण मोहालीच्या संथ खेळपट्टीवर ही धावसंख्या आव्हानात्मक नक्कीच होती. विराट कोहलीला स्थिरस्थावर करून द्यायची घोडचूक त्यांनी केली. पण एका बाजूने वॉटसन तिखट मारा करत होताच. कोहली आणि धोनी वाऱ्याच्या वेगाने दुहेरी धावा घेत असताना त्यांचे क्षेत्ररक्षण उघडय़ावर पडले. विराट कोहलीने तर एकहाती सामना खेचून आणला. अखेरच्या षटकांमध्ये भेदक मारा करण्यात पटाईत असलेल्या फॉकनरवर जिथे कोहलीने हल्ला चढवला तिथेच त्यांच्या हातून सामना निसटला आणि त्यांचे परतीचे तिकीट निश्चित झाले. या वेळी विश्वविजेतेपद त्यांच्या हाती लागले नाही. वॉटसनसारखा अव्वल अष्टपैलू आता त्यांच्या संघाचा निरोप घेईल. त्याची जागा भरून काढणे तितके सोपे नाही. या विश्वचषकातून त्यांना काही गवसले असेल तर ख्वाजासारखा धडाकेबाज सलामीवीर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा