पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी न्यूझीलंड सज्ज
विश्वचषकाचा प्रबळ दावेदार समजला जाणाऱ्या भारताला पहिल्याच सामन्यात धूळ चारल्यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का देण्यासाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज झाला आहे. हिमाचल क्रिकेट असोसिएशनच्या मैदानातील खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पोषक समजली जाते. त्यामुळे या दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांमध्ये चांगलेच द्वंद्व पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.
मिचेल सँटर, इश सोढी आणि नॅथम मॅक्क्युलम यांनी भेदक मारा करत भारताच्या फलंदाजांना त्यांच्याच मातीत लोटांगण घालायला भाग पाडले होते. पण या सामन्याची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला पोषक असल्याने या तिघांनाही संधी मिळण्याची शक्यता कमीच दिसते. या सामन्यात टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट, मिचेल मॅक्लेघन आणि अॅडम मिन्ले यांच्या वेगवान माऱ्यावर न्यूझीलंडचा विजय अवलंबून असेल.
न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला भारताविरुद्ध मोठी खेळी साकारता आली नव्हती, त्यामुळे त्यांच्यासाठी फलंदाजी मोठी डोकेदुखी ठरू शकते. कर्णधार केन विल्यमसन, मार्टिन गप्तील, कॉलिन मुन्रो आणि रॉस टेलर या फलंदाजांकडून संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत.
ऑस्ट्रेलियाचा संघ विजयानिशी विश्वचषकाचे अभियान सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार स्टिव्हन स्मिथसारखे नावाजलेले फलंदाज संघात आहे. पण शेन वॉटसन, मिचेल मार्श आणि जेम्स फॉकनर यांची कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलू शकते. फिरकीपटू अॅश्टॉन अॅगरला भारतीय खेळपट्टय़ांचा अनुभव नसल्याने त्याला कोणत्या संघाविरुद्ध खेळवायचे, हा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल. जोश हॅजेलवूड या वेगवान गोलंदाजाच्या कामगिरीवर साऱ्यांचे लक्ष असेल.
संघ
न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्तील, हेन्री निकोल्स, ल्यूक राँची, रॉस टेलर, कॉलिन मुन्रो, मिचेल सँटर, नॅथन मॅक्क्युलम, ग्रॅण्ट एलियट, मिचेल मॅक्लेघन, टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, इश सोढी, कोरे अॅण्डरसन.
ऑस्ट्रेलिया : स्टिव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अॅश्टॉन अॅगर, नॅथन कल्टर-निले, जेम्स फॉकनर, आरोन फिंच, जॉन हॅस्टिंग, जोश हॅझेलवूड, उस्मान वाजा, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, पीटर नेव्हिल, अॅण्ड्रय़ू टाय, शेन वॉटसन आणि अॅडम झाम्पा.
स्थळ :हिमाचल प्रदेश क्रिकेट असो.
वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्