विश्वविजेपदाची हॅट्ट्रिक साजरी केल्यानंतर मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा महिला संघ चौथ्यांदा विश्वचषकाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाला आहे. ईडन गार्डन्सवर होणाऱ्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियापुढे वेस्ट इंडिजचे कडवे आव्हान असेल.

कर्णधार लॅनिंगने या विश्वचषकात संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत, त्यामुळे तिच्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी अवलंबून असेल. वेगवान गोलंदाजीमध्ये मॅगन शट आणि रेने फॅरेल यांची कामगिरी पाहण्यासारखी असेल. फिरकीपटूंना मदत मिळाल्यास क्रिस्टन बीएम्स आणि जोन जोनासेस यांची कामगिरी पाहण्यासारखी असेल.

वेस्ट इंडिजने आतापर्यंत स्पर्धेत दमदार कामगिरी केली असून पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कर्णधार स्टेफनी टेलर दमदार अष्टपैलू कामगिरी करत संघापुढे चांगला आदर्श ठेवत आहे. त्याचबरोबर दिनेंद्रा डॉटिनसारखी सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू वेस्ट इंडिजकडे आहे. गेल्या सामन्यात ब्रिटनी कूपरने धडाकेबाज अर्धशतक झळकावले होते, तिच्याकडून अशाच मोठय़ा खेळीची अपेक्षा संघाला असेल.

संघ

ऑस्ट्रेलिया : मेग लॅनिंग (कर्णधार), अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल, क्रिस्टन बीएम्स, लाऊरेन चेट्ले, रेने फॅरेल, अलिसा हिली, बेथ मूनी, इलिस पेरी, इलिस व्हिलानी, निकोला कॅरे, सराह कोयटे, हॉली फेर्लिग, जेस जोनासेन, इरिन ओसबॉर्न, मेगान शट.

वेस्ट इंडिज : स्टेफनी टेलर (कर्णधार), शकिरा सेलमन, मारिसा अग्युलेरिया, शेमाईन कॅम्पबेल, शमिला कॉनेल, ब्रिटनी कूपर, दिनेंद्रा डॉटिन, अ‍ॅफी फ्लेचर, स्टॅसी अ‍ॅन-किंग, किसीया नाइट, किशोना नाइट, हॅयले मॅथ्यूज, अनिसा मोहम्मद, शकुना क्विंटिन, ट्रेमायने स्मार्ट.

  • वेळ :  दुपारी २.३० वाजल्यापासून.
  •  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर.

Story img Loader