वेस्ट इंडिज विरुद्धच्या वानखेडेवरील लढतीसाठी सोशल मीडियावर सध्या गेल विरुद्ध कोहली अशी जोरदार चर्चा सुरू आहे. कोहलीने आपल्या सर्वोत्तम खेळीने भारतासाठी सामने खेचून आणले आहेत, तर ख्रिस गेलने याच वानखेडेवर काही दिवसांपूर्वी ४८ चेंडूत तुफान शतकी खेळी साकारली. त्यामुळे या सामन्याचे कोहली आणि गेल हे दोघं केंद्रस्थान झाले आहेत. पण कोहली इतकाच गुणवान आणि ‘क्लिन हिटिंग’चा बादशहा ज्याला म्हणता येईल असा रोहित शर्मा भारताला मिळालेले वरदान आहे. मात्र, या विश्वचषकात काही रोहितची बॅट तळपलेली नाही. मुंबईकर रोहित शर्माला उपांत्य फेरीच्या निमित्ताने आपल्या होम ग्राऊंडवर खेळण्याची संधी चालून आलीय. हीच वेळ आहे रोहित तुला आपले मखमली फटके या क्रिकेट जगताला दाखवून देण्याची. तूझं अचूक टायमिंग.. कव्हर्सच्या दिशेने बंदुकीच्या गोळीच्या वेगात चेंडू जाणारा तूझा तो अप्रतिम फटका.. हे सगळं आम्ही या विश्वचषकात खूप मिस केलयं..
एकदिवसीय सामन्यात एक नाही तर दोनवेळा रोहितने दोनशेचा धावांचा पल्ला पार केलायं..हे विसरून चालणार नाही. मुंबई इंडियन्सकडून खेळताना वानखेडेच्या मैदानात संघासाठी जसे तू एकहाती सामने खेचून आणलेले आम्हील पाहिलं.. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना अनुभवता येऊ दे.. झाल्या गेल्या टीकांची भरपाई म्हणून तूझ्या धावांचा रतीब आम्हाला आज पुन्हा एकदा पाहू दे.. घरच्या मैदानात आज पुन्हा एकदा रोहित…रोहित… आवाज घूमू दे..
– मोरेश्वर येरम