मी देवाचा माणूस आहे, देवाने मला तुमच्यासाठी पाठवले आहे, असे म्हणत तो दारोदारी फिरायचा. ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठीच आपला जन्म झाल्याचे त्याला वाटायचे. त्याच्यावर बरीच संकटे आली, पण त्या वेळी देवाचा धावा सुरू करून तो संकटांना सामोरे जायचा. काही वर्षांपूर्वीची एक गोष्ट. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि खेळाडूंमध्ये मानधनाच्या मुद्दय़ावरून वाद सुरू झाला होता. ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, किरॉन पोलार्डसारखे खेळाडू मंडळाच्या विरोधात शड्डू ठोकून उभे होते. त्या वेळी मंडळाने अनुभवी खेळाडूंना दूर सारून त्याला संघाचे कर्णधारपद दिले. त्यामुळे सर्वच खेळाडूंचा त्याच्यावर रोष होता. वेस्ट इंडिजचे क्रिकेट होरपळून निघत होते, त्यावेळी हा क्रिकेट मंडळाचा माणूस आहे, असे म्हणत खेळाडू त्याला पाण्यातच पाहायचे. त्याच्यावर तसूभरही विश्वास ठेवायला कुणी तयार नव्हते. अशी परिस्थिती असूनही तो डगमगला नाही. प्रामाणिकपणे तो सर्वाशी वागत होता. खेळाडूंबरोबर विजयाची रणनीती आखत होता. सुरुवातीला खेळाडू त्याला हिणवत होते, त्याला कोणताच प्रतिसाद देत नव्हते. कालांतराने सारे काही बदलले. सध्याची परिस्थिती अशी आहे की, संघात तोच कर्ता-करविता आहे. ही गोष्ट आहे विंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमीची.
वेस्ट इंडिज संघाच्या उपस्थितीनेच प्रतिस्पर्धी संघाला एकेकाळी धडकी भरायची, पण कालांतराने त्यांनी आपली पत गमावली. २०१२मध्ये पुन्हा एकदा विंडीजमध्ये विश्वविजयाचे सूर घुमले. श्रीलंकेतील ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद त्यांनी पटकावले, त्यावेळी कर्णधार होता सॅमी. खेळाडूंचा विश्वास कमावल्यावर काय घडू शकते, याची प्रचीती या जेतेपदाने दिली. सध्याच्या घडीला विंडीजचा संघ सॅमीवरच अवलंबून आहे. त्याचे निर्णय मानले जातात, त्याचा आदर केला जातो, त्याला श्रेयही दिले जाते. संघातील अनुभवी खेळाडूंचा रागही आता शमला आहे. सॅमी आता ३२ वर्षांचा आहे, हा त्याचा अखेरचा विश्वचषक असल्याची जाणीव त्यालाही आहे. याबाबत बोलताना सॅमी भावुक झाला होता. ‘‘विंडीजकडून क्रिकेट खेळता आल्याचा आनंद आहेच. या वर्षभरात आम्ही एकही ट्वेन्टी-२० सामना खेळलो नव्हतो. आमच्या संघाला सन्मान मिळत नव्हता. पण त्यानंतरही आम्ही उपांत्य फेरीत पोहोचलो आहोत. आतापर्यंत कोणत्याही संघाला दोनदा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकता आलेला नाही, त्यामुळे विश्वविजय हेच सध्या माझे ध्येय आहे. कारकीर्दीमध्ये बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आहेत. काही गोष्टी मला आठवायच्या नाहीत. जे काही होते ते चांगल्यासाठीच होते,’’ असे सॅमी म्हणाला.
वेस्ट इंडिजचे खेळाडू म्हणजे नाच आलाच, संघातील तो सर्वोत्तम नर्तक आहे. बाहेरख्यालीपणा त्याला सर्वस्वी त्याज्य. कुटुंबच माझ्यासाठी महत्त्वाचे असल्याचे तो सांगतो. या देवभोळ्या सॅमीला फक्त क्रिकेटचे व्यसन आहे. त्यामध्येच रममाण व्हायला त्याला आवडते. त्यामुळेच निवृत्तीनंतर तो क्रिकेटशी निगडित गोष्टींवर भर देणार की पुन्हा देवाचा प्रसार करायला भटकणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा