‘‘विश्वचषकापूर्वी आम्ही कुणाच्या खिजगणतीमध्ये नव्हतो. २०१२साली विश्वचषक जिंकूनही आम्हाला सन्मान मिळत नव्हता, पण तरीही आम्ही या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलो आहोत. हे सारे फक्त आणि फक्त कामगिरीच्या जोरावरच झाले आहे. दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. पराभवाची आम्हाला तमा नाही, कारण आमचा पराभव फक्त आम्हीच करू शकतो,’’ असे मत वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीने व्यक्त केले.

संघाबाबत सॅमी म्हणाला की, ‘‘विश्वचषकाला येण्यापूर्वी परिस्थिती काहीशी वेगळी होती, ती तुम्हा साऱ्यांनाच माहितीच आहे. पण संघात सर्वानाच एकमेकांबद्दल आदर आहे. एकमेकांवर विश्वास आहे आणि प्रत्येक खेळाडूच्या यशामध्ये आम्ही आमचा आनंद शोधत आहोत.’’

अंतिम फेरीबाबत उत्सुक इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन म्हणाला, ‘‘संघातील साऱ्याच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. पण माझ्याकडून अजूनही लौकिकाला साजेशी कामगिरी पाहायला मिळाली नाही, ती कामगिरी अंतिम फेरीत व्हावी, अशी माझी इच्छा आहे.’’

संघाच्या कामगिरीबाबत मॉर्गन म्हणाला की, ‘‘जो रुट, जोस बटलर आणि जेसन रॉय यांनी फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. बेन स्टोक्स हा गोलंदाजीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. न्यूझीलंडसारख्या गटातील अव्वल संघाला पराभूत केल्यामुळे आमचे मनोबल कमालीचे उंचावलेले आहे.’’

Story img Loader