कोलकाता शहरातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर, लाखभर चाहत्यांच्या उपस्थितीत विश्वचषकाचा अंतिम सामना खेळण्याचा अनुभव घेण्यासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया इंग्लंडचा धडाकेबाज सलामीवर जेसन रॉयने व्यक्त केली. ट्वेन्टी-२० कारकीर्दीतील पहिलेवहिले अर्धशतक झळकावताना रॉयने इंग्लंडला दिमाखदार विजय मिळवून दिला. या विजयासह इंग्लंडने विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली.
‘अंतिम फेरी गाठल्याची भावना सुखावणारी आहे. सलामीच्या लढतीत अनपेक्षित पराभवानंतर आम्ही हे यश मिळवले आहे. प्रचंड मेहनतीच्या जोरावर हे शक्य झाले आहे, त्यामुळे अधिक आनंद झाला आहे’, असे रॉयने सांगितले. निर्णायक खेळीविषयी विचारले असता रॉय म्हणाला, ‘ही माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी आहे. संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून देणारी खेळी संस्मरणीय आहे. माझ्याइतकेच गोलंदाजांचे योगदान महत्त्वाचे आहे. शेवटच्या पाच षटकांमध्ये त्यांनी भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या धावगतीला वेसण घातली आणि त्याने सामन्याचे पारडे फिरले.
विश्वचषकासाठी हा योग्य संघ नाही अशी सातत्याने टीका इंग्लंड संघाबाबत होत आहे. त्याविषयी विचारले असता रॉय म्हणाला, ‘असंख्य व्यक्तींनी संघावर टीका केली आहे. मात्र आता आम्ही विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाले आहोत. सातत्यपूर्ण कामगिरीशिवाय हे शक्य झालेले नाही. चाहत्यांनी आम्हाला वेळोवळी मोलाचा पाठिंबा दिला आहे. टीकाकारांना त्यांचे उत्तर मिळाले आहे. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यागणिक आमचा खेळ सुधारत आहे. ईडन गार्डन्सवर खेळण्याचा अनुभव अविस्मरणीय असणार आहे. आमच्या कामगिरीत चढउतार राहिले आहेत, मात्र स्पर्धेतील शेवटच्या लढतीत सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा आमचा निर्धार आहे.

Story img Loader