डी’व्हिलियर्स आणि दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान
वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या वादळापुढे इंग्लंडला पहिल्या सामन्यात लोटांगण घालायला लागले होते. पहिला सामना गमावल्यामुळे आता त्यांना यापुढील सर्वच सामन्यांमध्ये विजय मिळवणे अनिवार्य आहे. शुक्रवारी इंग्लंडपुढे दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान असून हा सामना गमावल्यावर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. पहिल्या सामन्यात गेल आणि या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसह धडाकेबाज फलंदाज ए बी डी’व्हिलियर्स या बलाढय़ आव्हानांचा त्यांना सामना करावा लागणार आहे.
गेलने फक्त ४७ चेंडूंमध्ये शतक झळकावत इंग्लंडच्या गोलंदाजीचा पालापाचोळा केला होता. तब्बल ११ षटकार लगावत त्याने इंग्लंडच्या गोलंदाजीची पिसे काढली होती. त्यामुळे या सामन्यापूर्वी गोलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. या सामन्यात डी’व्हिलियर्सला झटपट बाद करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे असेल. फलंदाजीमध्ये जो रुट, बेन स्टोक्स आणि कर्णधार इऑन मॉर्गन यांनी दमदार फलंदाजी केली होती. पण अन्य फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी पाहायला मिळालेली नाही.
दक्षिण आफ्रिकेचा संघ ‘डार्क हॉर्स’ असल्याचे म्हटले जात आहे. फलंदाजीमध्ये डी’व्हिलियर्स हा त्यांचा हुकमी एक्का असेल. जलद अर्धशतक, शतक आणि दीडशे धावांचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. सराव सामन्यात दमदार फलंदाजी करत त्याने आपण या विश्वचषकात धडाकेबाज कामगिरी करायला सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. त्याचबरोबर संघात डेव्हिड मिलर, कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस, क्विंटन डी’कॉक, हशिम अमला आणि जे पी डय़ुमिनीसारखे धुरंधर फलंदाज आहेत. डेल स्टेनसारखा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज दक्षिण आफ्रिकेकडे असून त्याला कागिसो रबाडाची चांगली साथ मिळू शकेल. फिरकीपटू इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर या वेळी साऱ्यांच्याच नजरा असतील.

दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), डेव्हिड मिलर, क्विंटन डी’कॉक, हशिम अमला, जे पी डय़ुमिनी, ए बी डी’व्हिलियर्स, इम्रान ताहिर, ख्रिस मॉरीस, आरोन फँगिसो, कागिसो रबाडा, रिली रोसोव, डेल स्टेन आणि डेव्हिड विस.
इंग्लंड : इऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जेम्स व्हिन्स, अ‍ॅलेक्स हेल्स, जो रुट, मोइन अली, जोस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, लायम प्लंकेट, रीस टॉप्ले, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद.

स्थळ :वानखेडे स्टेडियम
वेळ : सायं. ७.३० वा.पासून