ज्या वानखेडेवर भारताने २०११ साली विश्वचषक उंचावला..त्याच वानखेडेवर गुरूवारी भारतीय संघाला सामोरे जावे लागलेल्या पराभवामुळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एका कटू आठवणीची नोंद झाली. ( Full Coverage || Trending || Photos )
भारताला वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सात विकेट्सने पराभवला सामोरे जावे लागले. भारतीय संघाच्या पराभवाची पाच कारणे…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिमन्सची नाबाद ८२ धावांची खेळी-
वेस्ट इंडिजसमोर १९३ धावांचे आव्हान उभारल्यानंतर बुमराहने विस्फोटक ख्रिस गेलला स्वस्तात माघारी धाडून मोठे यश मिळवून दिले होते. मात्र, विंडीजने आपल्या भात्यात खास गुरूवारच्या सामन्यासाठी लेंडन सिमन्स नावाचे अस्त्र दाखल केले होते. मुंबई इंडियन्सकडून खेळताना सिमन्सने वानखेडेवर चांगल्या धावा कुटल्या होत्या. हाच इतिहास ओळखून विंडीजने सिमन्सला संघात स्थान दिले आणि त्यानेही आपली निवड सार्थ ठरवून ५१ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकार ठोकत नाबाद ८२ धावांची मॅच विनिंग खेळी साकरली.

‘ते’ दोन नो बॉल आणि सिमन्सला जीवनदान-
वेस्ट इंडिजचे दोन फलंदाज स्वस्तात तंबूत दाखल झाले होते. पण लेंडन सिमन्सवर याचा काहीच दबाव दिसून आला नाही. त्याची जोरदार फटकेबाजी सुरू होती. यातच सामन्याच्या सातव्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर जसप्रीत बुमराहने सिमन्सचा अप्रतिम झेल टीपला होता. मात्र अश्विनने टाकलेला चेंडू नो बॉल असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सिमन्सला पहिले जीवनदान मिळाली. तेव्हा सिमन्स केवळ १८ धावांवर खेळत होता. त्यानंतर सामन्याच्या १५ व्या षटकात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर अश्विनने सिमन्सचा झेल टिपला. पण हा चेंडू देखील नो बॉल असल्याचे समोर आल्यावर सिमन्सला दुसरे जीवनदान मिळाले आणि सिमन्सने संधीचे सोने करत संघाला विजयश्री मिळवून दिला.

हार्दिक पंड्या आणि जडेजाकडून निराशा-
सामन्यात हार्दिक पंड्याने खूपच निराशा केली. शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजीवर वेस्ट इंडिजचे फलंदाज चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत असतानाही त्याने गोलंदाजीच कोणताच बदल केला नाही. पंड्याच्या चार षटकांत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी तब्बल ४३ धावा कुटल्या, तर दुसऱयाबाजूने रवींद्र जडेजाच्या चार षटकांत सर्वाधिक ४८ धावा भारताला मोजाव्या लागल्या.

दबाव निर्माण करण्यात अपयश-
ख्रिस गेलसारखा विस्फोटक फलंदाजाला स्वस्तात माघारी धाडूनही भारतीय गोलंदाजांना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात यश आले नाही. गेल आणि सॅम्युअल्स स्वस्तात माघारी परतूनही वेस्ट इंडिजच्या धावसंख्येची सरसरी उत्तम होती आणि अखेरपर्यंत ती सिमन्स आणि रसेलने कायम राखली.

नाणेफेकीचा कौल-
वानखेडेच्या खेळपट्टीची पूर्ण कल्पना दोन्ही संघांना असल्यामुळे विजयाच्या दृष्टीने सामन्याचा नाणेफेक दोघांसाठीही तितकाच महत्त्वाचा होता. पाटा खेळपट्टी असल्यामुळे धावसंख्येचा पाठलाग सहज करता येऊ शकतो असा वानखेडेचा इतिहास आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल आपल्या बाजने लागणे महत्त्वाचे होते. मात्र, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली आणि त्यांनी गोलंदाजीचा अगदी योग्य निर्णय घेतला.

मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc t 20 world cup five reasons for indias defeat against west indies