आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दबाव कसा हाताळावा, याबाबत भारतीय क्रिकेट संघाकडून शिकण्याची गरज असल्याचे पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे. आतापर्यंत कोणत्याही वर्ल्डकपमध्ये भारताविरोधात न जिंकू शकणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा शनिवारी पराभवाचा सामना करावा लागला. हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकवर ६ गडी राखून विजय मिळविला.
विश्वचषक, पाकिस्तान आणि विराट कोहली हे पुन्हा एकदा भारताचे विजयाचे समीकरण ठरले. विश्वचषकाचा इतिहास बदलू, हे पाकिस्तानचे प्रशिक्षक वकार युनूस यांचे बोल त्याने खोटे ठरवले. ईडन गार्डन्सवरील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताला पाकिस्तानविरुद्ध कधीच विजय मिळवता आला नव्हता. तो इतिहास मात्र नक्की बदलला गेला. पाकिस्तानच्या ११८ धावांचा पाठलाग करताना भारताने कोहलीच्या जिगरबाज नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सहा विकेट्सने विजय मिळवला.
भारतीय संघावर दबाव असूनही त्यांनी चांगला खेळ केला. भारतीय फलंदाज परिपक्व झाले आहेत. आपल्यावर दबाव असातानाही कसे खेळावे हे भारताकडून शिकले पाहिजे. कोहलीने अप्रतिम खेळी केली. आम्ही आणखी २५-३० धावा करण्याची गरज होती. आम्ही आता साखळीतील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध होणाऱ्या सामन्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे, असे आफ्रिदी म्हणाला. दरम्यान, टी-२० वर्ल्डकपच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिऴविल्यानंतर भारतात ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र, पाकिस्तानी चाहते आफ्रिदीवर नाराज झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा