अफगाणिस्तान म्हटले की आपल्या डोळ्यासमोर तालिबान अतिरेक्यांच्या कारवायांनी पोखरलेल्या देशाचेच चित्र दिसते. मात्र आमच्याकडेही आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट क्षेत्रात चमक दाखविण्याची गुणवत्ता आहे याचाच प्रत्यय या देशाच्या खेळाडूंनी भारतात सुरू असलेल्या विश्वचषक ट्वेन्टी२० स्पर्धेत घडविला आहे.
अफगाणिस्तान संघाने या स्पर्धेच्या मुख्य फेरीत अतिशय दिमाखात प्रवेश केला होता. त्यांनी पात्रता फेरीत झिम्बाब्वे संघास पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे झिम्बाब्वे संघ विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. झिम्बाब्वे संघाच्या खेळाडूंनी हा पराभव कधी अपेक्षितही केला नसेल. अफगाणिस्तान संघाच्या खेळाडूंनी मुख्य फेरीत श्रीलंका व दक्षिण आफ्रिका यांना दिलेली लढत पाहता आणखी तीन-चार वर्षांमध्ये हा संघ दखल घेण्याजोगा प्रतिस्पर्धी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
झिम्बाब्वे संघातील खेळाडू एरवी अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धामध्ये सहभागी होत असतात. साहजिकच अफगाणिस्तानविरुद्ध त्यांचे पारडे जड मानले जात होते. मात्र अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी त्यांचा सपशेल पाडाव केला. झिम्बाब्वे संघाचे सर्व गडी बाद करीत त्यांनी हम किसीसे कम नही याचाच प्रत्यय घडविला. याच स्पर्धेत त्यांनी स्कॉटलंडला पराभूत केले. खरंतर स्कॉटलंडचे खेळाडू इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत सातत्याने खेळत असतात. त्यांच्यासाठीही अफगाणिस्तानचे खेळाडू शिरजोर ठरले.
श्रीलंका व आफ्रिका यांच्याविरुद्धच्या लढतीत अफगाणिस्तानला पराभव स्वीकारावा लागला, मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांच्या खेळाडूंनी दिलेली लढत खरोखरीच कौतुकास्पद आहे. आफ्रिकेविरुद्ध महंमद शहजाद याने केलेली आक्रमक खेळी आफ्रिकेचे गोलंदाज सतत स्मरणात ठेवतील. त्याने ठोकलेले पाचही षटकार त्याच्याकडे असलेल्या आत्मविश्वासाचे प्रतीक होते. फलंदाजीत असगर स्टानिकझाई, समीउल्ला शेनवारी, नूर अली यांनीही या स्पर्धेत सातत्याने चमक दाखविली आहे. गोलंदाजीत त्यांच्या रशीद खान याने प्रभावी कामगिरी केली आहे.
अफगाणिस्तानचे खेळाडू अनुभवाबाबत कमी पडले आहेत. मुळातच त्यांचा संघ उभा राहिला आहे हीच मोठी वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. अतिरेकी कारवायांमुळे त्यांच्या देशातील लोकांवर सतत टांगती तलवार असते. असे असूनही त्यांचा संघ उभा राहिला आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम उल हक यांनी या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. अफगाणिस्तानचे खेळाडू गोलंदाजी व फलंदाजी या दोन आघाडय़ांवर समाधानकारक कामगिरी करीत आहेत, मात्र क्षेत्ररक्षणात ते कमी पडतात. गोलंदाजांच्या शैलीनुसार क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करण्यात त्यांचा कमकुवतपणा दिसून आला आहे.
अनुभवाच्या अभावीच त्यांच्या खेळाबाबत मर्यादा आल्या आहेत. जर त्यांच्या खेळाडूंना आयपीएल, बांगलादेश लीग, कौंटी लीग आदी स्पर्धामध्ये खेळण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे त्यांच्या कामगिरीत सुधारणा होईल. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आदी कसोटी खेळणाऱ्या देशांमधील खेळाडू वर्षांतील बाराही महिने क्रिकेट खेळत असतात असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. त्यांच्या तुलनेत अफगाणिस्तानचे खेळाडू खूपच अपरिपक्व आहेत. सामन्यातील सांघिक कौशल्याबाबतही ते कमी पडत आहेत. जर हे दोष त्यांनी दूर केले तरच निश्चितपणे त्यांच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिकही प्राप्त होईल. जिद्द, चिकाटी, शेवटपर्यंत लढत देण्याची सकारात्मक वृत्ती हे गुण अफगाणिस्तानच्या खेळाडूंकडे आहेत. या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांचा अनुभव मिळाला तर आपोआपच अफगाणिस्तानच्या खेळाडूंना कसोटी दर्जा मिळेल व त्यांच्या देशासही क्रिकेटमध्ये लक्षात घेण्याजोगा संघ म्हणून स्थान मिळू शकेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा