पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने भारताला एकहाती विजय मिळवून दिले. त्यानंतर कोहलीच भारतासाठी विजयवीर असल्याचे म्हटले जाऊ लागले. पण वेस्ट इंडिजचा तडफदार सलामीवीर ख्रिस गेल याला मात्र तसे वाटत नाही. भारतीय संघात बरेच विजयवीर असून फक्त विराटवर लक्ष ठेवून चालणार नाही, असे मत गेलने व्यक्त केले आहे.
ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये मंगळवारी वेस्ट इंडिजच्या संघाने सराव केला, त्या वेळी गेल म्हणाला, ‘‘विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर सलग तीन विजय मिळवीत भारताने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. या विजयांमुळे त्यांचे मनोबल नक्कीच उंचावलेले असेल आणि या गोष्टींचा त्यांना उपांत्य फेरीतील लढतीच्या वेळी नक्कीच फायदा होईल. भारताच्या कोण्या एका खेळाडूवर लक्ष ठेवून आम्हाला चालणार नाही. कारण भारताच्या संघात बरेच विजयवीर आहे, बरेच अष्टपैलू खेळाडू आहेत व त्यांचे क्षेत्ररक्षणही चांगले होत आहे. त्यामुळेच भारतीय संघ हा विश्वचषकाचा प्रबळ दावेदार समजला जात आहे.’’

सध्याच्या घडीला विराट अव्वल फलंदाज
‘‘विराटच्या खेळींचे मला आश्चर्य वाटले नाही, कारण सध्याच्या घडीला तो क्रिकेट जगतातील अव्वल फलंदाज आहे. या वर्षी त्याची फलंदाजी अप्रतिम होत आहे. तो चांगल्या फॉर्मात आहे आणि वानखेडेसारख्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर चांगली खेळी उभारता येऊ शकते. सध्याच्या घडीला विराट दमदार फलंदाजी करीत असला तरी त्याने आमच्याविरुद्ध जास्त धावा केलेल्या नाहीत. मला अशी आशा आहे की, तो या सामन्यात जास्त चमकणार नाही आणि आमच्या पराभवाचे कारण ठरणार नाही,’’ असे गेलने सांगितले.

 

Story img Loader