वानखेडेवर वेस्ट इंडिजला हरवून अंतिम फेरी गाठण्याचा भारताचा निर्धार
जगज्जेतेपदाचे स्वप्न बघता बघता पुन्हा चालून आले आहे. ते फक्त आता दोन पावलांवर येऊन ठेपले आहे. वानखेडेवर वेस्ट इंडिजविरुद्धचा उपांत्य सामना आणि मग ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर अंतिम फेरी. हे स्वप्न पाहताना जशा २००७ च्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपदाच्या आठवणी रुंजी घालतात, तशाच याच वानखेडे स्टेडियमच्या साक्षीने २०११ मध्ये मिळवलेले एकदिवसीय क्रिकेटचे विश्वविजेतेपद चित्रपटातील ‘फ्लॅशबॅक’प्रमाणे डोळ्यांसमोर उभे राहते. तब्बल २८ वर्षांनी विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब करताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने लाँगऑनला मारलेला षटकार आणि त्यानंतरचा भावनिक जल्लोष.. हा सारा काही आता एक सुवर्णइतिहास झाला आहे. गुरुवारी होणाऱ्या उपांत्य फेरीला सामोरे जाताना म्हणूनच तमाम भारतीय क्रिकेटरसिकांना जणू हे स्वप्नच जगत असल्याचा आभास होत आहे.
मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचे विजयात रूपांतर करणाऱ्या विराट कोहलीच्या अविस्मरणीय खेळीचे कवित्व अजूनही टिकून आहे. पण भारतीय संघातील फक्त कोहलीलाच लक्ष्य करून चालणार नाही, तर त्यांच्याकडे अनेक विजयवीर खेळाडू आहेत, अशी ग्वाही दस्तुरखुद्द ख्रिस गेलनेच दिली होती. भारताशी भारतात झुंजण्याचे आव्हान वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीनेही स्वीकारले आहे. ‘‘उपांत्य लढतीत वेस्ट इंडिजचे १५ खेळाडू विरुद्ध स्टेडियममधील हजारो पाठीराखे, शिवाय अब्जावधी भारतीय असा हा सामना असेल. भारताशी त्यांच्या मायभूमीवर लढणे कठीण असले तरी आम्ही या आव्हानासाठी सज्ज आहोत. आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू,’’ असे तो म्हणाला.
वानखेडेवर दोन आठवडय़ांपूर्वी ख्रिस गेलने वादळी खेळी साकारली होती. याचप्रमाणे त्याने भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांत ५१.३३ च्या सरासरीने १५४ धावा केल्या आहेत. त्यामुळे गेलच्या फलंदाजीला वेसण घालण्यासाठी भारताला अचूक चक्रव्यूह रचावा लागणार आहे. याशिवाय वेस्ट इंडिजचा संघ हा अतिशय धोकादायक असल्याची कबुली भारताचे संघ संचालक रवी शास्त्री यांनीही दिली आहे.
भारत आणि विंडीज यांच्यात ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारात आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांपैकी उभय संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. मात्र ट्वेन्टी-२० विश्वचषकातील तीन सामन्यांपैकी विंडीजची कामगिरी २-१ अशी सरस आहे. अगदी वानखेडेवरील गेल्या काही वर्षांचा वेध घेतल्यास २०११ मध्ये भारत-विंडीज कसोटी अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरली होती. २०१३ मध्ये विंडीजविरुद्धच्या निकाली सामन्याद्वारे सचिन तेंडुलकरने मुंबईकरांच्या साक्षीने अलविदा केले होते. जामठात न्यूझीलंडविरुद्ध रचलेल्या फिरकीच्या जाळ्यात भारत स्वत:च फसला आणि हरला. मग कोलकातामध्ये आणि मोहालीत विराटच्या अद्वितीय खेळींच्या बळावर भारताने अनुक्रमे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासारख्या प्रतिस्पध्र्याना हरवले. बंगळुरूत बांगलादेशविरुद्ध अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार भारताने जिंकला. आता फक्त विराटच्याच कामगिरीवर विसंबून राहणे भारताला चालणार नाही, अशी जाणीव धोनीलासुद्धा झाली आहे. याबाबत शास्त्री म्हणाला, ‘‘आता उपांत्य फेरीची लढत असल्यामुळे एखाद्दुसऱ्या खेळाडूच्या कामगिरीवर अवलंबून राहता येणार नाही. किमान सहा-सात खेळाडूंची कामगिरी बहरणे आवश्यक आहे.’’
दुसरीकडे विंडीजच्या संघाने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांना हरवून उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला आहे. गेलच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धची साखळीतील अखेरची लढत विंडीजने गमावली होती, पण गेलव्यतिरिक्त ड्वेन ब्राव्हो आणि डॅरेन सॅमी हे भारतीय वातावरणाला सरावलेले आणखी दोन खेळाडू विंडीजकडे आहेत. आंद्रे फ्लेचरने दुखापतीमुळे माघार घेतली असली तरी मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळणारा लेंडन सिमन्सचा संघात झालेला समावेश विंडीजसाठी फायदेशीर ठरू शकेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा