ट्वेन्टी-२० क्रिकेटची गोष्टच वेगळी. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारतापेक्षा वरचढ मानला जातो. मात्र ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कांगारूंचा भारतापुढे निभाव लागणे कठीण असतो. आकडेवारी तरी नेमके हेच सांगते. वर्षांच्या आरंभी भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर त्यांना ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० असे हरवले होते. मात्र ट्वेन्टी-२० क्रिकेटचा इतिहास पाहिल्यास ऑस्ट्रेलियाच्या संघावर सर्वाधिक दहशत जाणवते ती युवराज सिंगची. भारताला २०११चे जगज्जेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या या पंजाबच्या सुपुत्राच्या घरच्या मैदानावर म्हणजेच मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा आगामी सामना होणार आहे. युवी कशी कामगिरी साकारतो, यावर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय विसंबून आहे. मात्र भारतावरसुद्धा डेव्हिड वॉर्नर व शेन वॉटसन यांचे दडपण असणार आहे.
ट्वेन्टी-२० विश्वचषकात आतापर्यंत चार वेळा भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाले. यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन लढती जिंकल्या आहेत. परंतु भारताच्या विजयात जसा युवराजचा दबदबा दिसतो, तसे पराभव टाळण्यासाठीही शर्थीचे प्रयत्न दिसतात. २००७च्या पहिल्यावहिल्या विश्वचषकात दरबानला भारताने उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाला १५ धावांनी हरवले होते. त्या सामन्यात युवराजचीच ७० धावांची खेळी महत्त्वाची ठरली होती. मग २०१०च्या विश्वचषकात बार्बाडोसला झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ४९ धावांनी विजय मिळवला. युवराज (१) फलंदाजीत अपयशी ठरला. मात्र रोहित शर्माने पराभव टाळण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले होते. वॉटसन आणि वॉर्नरचा तडाखा त्यावेळी भारतीय गोलंदाजांनी अनुभवला होता. मात्र युवराजने गोलंदाजीत प्रभाव दाखवताना २० धावांत २ बळी मिळवले होते. २०१२च्या विश्वचषकात कोलंबोत पुन्हा वॉर्नर-वॉटसनच्या धडाकेबाज फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने भारतावर नऊ विकेट्स राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा एकमेव फलंदाज युवीनेच बाद केला होता. युवराजला (८) अपेक्षित धावा मात्र करता आल्या नव्हत्या. २०१४च्या विश्वचषकात कोलंबोला भारताने ऑस्ट्रेलियावर ७३ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. युवराजच्या ६० धावांच्या खेळीमुळे भारताने १५९ धावा उभारल्या होत्या. युवराजने ट्वेन्टी-२० प्रकारात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ९ सामन्यांत ६५.५०च्या धावसरासरीने २६२ धावा केल्या आहेत. इतकेच कशाला २०११च्या एकदिवसीय विश्वचषकात अहमदाबादला विजयाचा अध्यायसुद्धा युवराजनेच लिहिला होता. रिकी पाँटिंगच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने २६० धावा केल्या. मात्र सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर आणि युवराजच्या अर्धशतकांच्या बळावर भारताने हे आव्हान लीलया पेलले होते. युवीने गोलंदाजीत ४४ धावांत २ बळी आणि फलंदाजीत नाबाद ५७ धावा अशी अष्टपैलू कामगिरी बजावत सामनावीर पुरस्कार पटकावला होता. युवराजची कारकीर्द अस्ताकडे वाटचाल करीत आहे. कर्करोगासारख्या दुर्दम्य आजारपणातून सावरत तो मैदानावर पुन्हा परतला. त्याच्या जिद्दीचे समस्त क्रिकेटजगताला अप्रूप वाटते. आता युवराजच्या फलंदाजीत त्याच्या सुवर्णकाळातील अदाकारी जाणवत नसली तरी परिस्थितीनुरूप फलंदाजी करणे, हे त्याचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाशी सामना करताना युवीकडून भारताच्या मोठय़ा अपेक्षा आहेत.

– प्रशांत केणी