भारत-पाकिस्तान लढतीकडे क्रिकेट जगताचे लक्ष
कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर अतिशय ‘डेंजर’ वारा सुटलाय.. भारत-पाकिस्तान सामन्याच्या निमित्ताने दोन्ही देशांची अस्मिता पणाला लागली आहे.. धरमशालामधील सामना हलवल्यामुळे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर आणि हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्यातील वादाचा वणवा अजूनही धुमसतो आहे.. अँटि टेररिस्ट फ्रंट ऑफ इंडियाने हा सामना कोलकातामध्ये न खेळवण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.. पाकिस्तानचा संघनायक शाहिद आफ्रिदीने कोलकातामध्ये येताच गायलेल्या भारतीय चाहत्यांच्या गोडव्यामुळे पाकिस्तानातील अनेक जण दुखावलेले आहेत.. याचप्रमाणे फक्त सहा हजार तिकिटे सर्वसामान्यांच्या वाटय़ाला ठेवणाऱ्या क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालवर क्रिकेटरसिक नाराज आहेत.. त्यामुळेच ट्वेन्टी-२० विश्वचषकातील हा निव्वळ एक क्रिकेटचा सामना नसून, दोन्ही देशांमधील नागरिकांच्या भावनासुद्धा त्याच्याशी निगडित आहेत.
‘‘भारत-पाकिस्तान यांच्यातील हाडवैर खूप मोठे आहे. कदाचित अॅशेस मालिकेपेक्षाही हे वैर मोठे आहे. भारत आणि पाकिस्तानमधील नागरिक फक्त एक क्रिकेटचा सामना म्हणून याकडे पाहात नाही. याला सीमारेषेवरील वातावरणाचीही किनार आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील नागरिकांच्या भावना या सामन्याशी जुळलेल्या असतात. एक खेळाडू म्हणून ही भावनिकता बाजूला ठेवून आपला सर्वोत्तम खेळ दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू,’’ असा विश्वास भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने सामन्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केला. हे हाडवैर मान्य करताना पाकिस्तानचे प्रशिक्षक वकार युनूस म्हणाले, ‘‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट आणि सांस्कृतिक वैराला ५० वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. संपूर्ण क्रिकेटविश्वाला या सामन्याची उत्सुकता असते. मात्र या वेळी आम्ही इतिहास बदलणार आहोत.’’
Watch: India vs Pakistan Match Preview
क्रिकेटच्या इतिहासाकडे पाहिल्यास दोघांनाही समान संधी आहे. विश्वचषकात भारत पाकिस्तानकडून कधीच हरलेला नाही. एकदिवसीय प्रकारातील सहा आणि ट्वेन्टी-२० प्रकारातील चार असे दहापैकी दहा सामने भारताने जिंकले आहेत. मागील चार वर्षांतील तीन विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये विराट कोहली भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. त्यामुळे विराटला रोखणे, हे पाकिस्तानपुढे आव्हान असेल. मात्र ईडन गार्डन्सवर आतापर्यंत झालेले चारही एकदिवसीय सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. त्यामुळे विश्वचषकाचा इतिहास बदलण्याची ही सर्वोत्तम संधी पाकिस्तानपुढे आहे, असा दावा युनूसने केला आहे.
जामठाच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजीच्या बळावर विजयी सलामी नोंदवण्याचे भारताचे मनसुबे न्यूझीलंडने हाणून पाडले. ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी, मिचेल मॅक्लॅघन यांच्यासारख्या अव्वल दर्जाच्या वेगवान गोलंदाजांना विश्रांती देऊन न्यूझीलंडने मिचेल सँटनर, इश सोधी आणि नॅथन मॅक्क्युलम या तीन फिरकी गोलंदाजांच्या बळावर विजयाध्याय लिहिला. फिरकीला पूर्णत: अनुकूल खेळपट्टीची भारताची योजना पहिल्या सामन्यात पूर्णत: फसली. आता पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मात्र तशा प्रकारची खेळपट्टी नसल्यामुळे क्रिकेटरसिकांना फटकेबाजी अनुभवायला मिळणार आहे.
पाकिस्तानविरुद्धची लढत भारताने गमावल्यास मायदेशात सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताला आव्हान टिकवण्यासाठी नशिबावर विसंबून राहावे लागणार आहे. नागपूरच्या लढतीत विराट कोहली (२३), महेंद्रसिंग धोनी (३०) आणि अश्विन (१०) वगळता एकाही फलंदाजाला दोन आकडय़ांत धावा काढता आल्या नव्हत्या. भारताचा डाव फक्त ७९ धावांत आटोपला होता. त्यामुळेच पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत विजयाप्रमाणेच धावासुद्धा होणे अधिक गरजेचे आहे. मात्र आशियाई क्रिकेट स्पध्रेतील विजेतेपदाची कामगिरी त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी ठरू शकेल. ईडन गार्डन्सवर विक्रमी खेळी साकारणाऱ्या रोहित शर्माकडून आणखी एका लक्षणीय खेळीची चाहत्यांची अपेक्षा आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम खेळाडू गणल्या जाणाऱ्या शाहीद आफ्रिदीने त्या सामन्यात अष्टपैलू चुणूक दाखवली होती. याशिवाय मोहम्मद अमीर, मोहम्मद इरफान आणि वहाब रियाझ असे तीन डावखुरे वेगवान गोलंदाज पाकिस्तानकडे आहेत.
‘कॅब’कडून सत्कार : भारत-पाकिस्तान सामन्याचे औचित्य साधून क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालतर्फे (कॅब) खास सत्काराचे प्रयोजन करण्यात आले आहे. या वेळी चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, लिटिल मास्टर सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग या भारतीयांचा, तर माजी संघनायक इम्रान खान, माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रम, अफगाणिस्तानचे प्रशिक्षक इन्झमाम उल हक आणि प्रशिक्षक वकार युनूस या पाकिस्तानी मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याचे खूप दडपण मला जाणवत नाही. कारण माझ्यासहित संघातील अनेक खेळाडू भारत-पाकिस्तान सामने खेळले आहेत. त्यामुळे हे दडपण असेल, तर ते कसे हाताळायचे याची त्यांना उत्तम माहिती आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकातील प्रत्येक सामना जिंकायचा, याकडेच आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.
– रवीचंद्रन अश्विन, भारताचा फिरकीपटू
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आशीष नेहरा, जसप्रीत बुमराह, अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग, मोहम्मद शमी, पवन नेगी.
पाकिस्तान : शाहिद आफ्रिदी (कर्णधार), अहमद शेहझाद, अन्वर अली, इमाद वसिम, खलिद लतीफ, मोहम्मद अमीर, मोहम्मद हफीझ, मोहम्मद इरफान, मोहम्मद नवाझ, मोहम्मद सामी, सर्फराझ अहमद, शार्जिल खान, शोएब मलिक, उमर अकमल, वहाब रियाझ.
खेळपट्टीचा अंदाज :
ईडन गार्डन्सची खेळपट्टी ही जामठातील खेळपट्टीप्रमाणे फिरकीला पूर्णत: साहाय्यक नसेल. मात्र गोलंदाजांना ती मदत करेल. परंतु ईडन गार्डन्सची खेळपट्टी ही प्रामुख्याने फलंदाजांसाठी वरदान ठरेल.
* स्थळ : ईडन गार्डन
* वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्