‘‘थोडी सी थंडी जगह होनी चाहिए, जहाँ पे इतना गरम मॅच हो,’’ अशा शब्दांत भारत-पाकिस्तानचा सामना धरमशाला येथे का खेळवण्यात यावा, याचे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी स्पष्टीकरण दिले होते. पाकिस्तानने धरमशालामध्ये खेळण्यास असहमती दर्शवल्यानंतर आयसीसीच्या मान्यतेने बीसीसीआयने हा मान ईडन गार्डन्सला दिला. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली या सामन्याची तयारी सुरू आहे. २०११च्या विश्वचषकात भारत-इंग्लंड सामना ईडन गार्डन्सवर होणार होता. मात्र स्टेडियम आयसीसीच्या सामन्यासाठी सज्ज नसल्याचा ठपका ठेवता हा सामना त्यांच्याकडून हिसकावण्यात आला होता. तेव्हा समस्त बंगालवासीयांना याचे अतीव दु:ख झाले होते. त्याची भरपाई म्हणूनच भारत-पाकिस्तान सामना कोलकातामध्ये आला, अशी त्यांची मानसिकता आहे. ईडन गार्डन्सच्या इतिहासाकडे नजर टाकल्यास तीन घटना प्रकर्षांने समोर येतात.
१३ मार्च १९९६
१९९६च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेची उपांत्य फेरी ही क्रिकेट इतिहासात अजरामर झाली आहे. श्रीलंकेचे २५२ धावांचे लक्ष्य पेलताना सचिन तेंडुलकर (६५) बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि ८ बाद १२० अशी केविलवाणी अवस्था झाली. हे वास्तव सहन न झाल्यामुळे कोलकातावासीयांनी हुल्लडबाजी करीत मैदानावर बाटल्या फेकल्या आणि स्टँडला आगी लावल्या. भारताला विजयासाठी १५.५ षटकांत १३२ धावांची आवश्यकता होती आणि त्यांचे दोन फलंदाज बाकी होते. अखेर आयसीसीचे सामनाधिकारी क्लाइव्ह लॉइड यांनी हा सामना श्रीलंकेला बहाल केला.
२० फेब्रुवारी १९९९
१९९९मध्ये अनेक वादविवादांना मागे सारत पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. ईडन गार्डन्सवरील कसोटी सामन्यात भारताचा सचिन तेंडुलकर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरची धडक बसल्यामुळे धावचीत झाला. खरे तर हे अपघाताने घडले होते. परंतु शोएबने जाणीवपूर्वक सचिनला धक्का मारला असा समज करून क्रिकेटरसिकांनी दंगा केला. तेव्हा सारे स्टेडियम लष्कराच्या ताब्यात द्यावे लागले होते. सचिनने स्वत: स्टेडियममध्ये फेरी मारून प्रेक्षकांना शांततेचे आवाहन केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर प्रेक्षकांना हुसकावून बाहेर काढत स्टेडियम रिक्त केले आणि रिकाम्या खुच्र्याच्या साक्षीने उर्वरित सामना खेळवण्यात आला.
८ ऑक्टोबर २०१५
गेल्या वर्षी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-२० सामना ईडन गार्डन्सवर होणार होता. दक्षिण आफ्रिकेने आधीचे दोन्ही सामने जिंकल्यामुळे भारताला प्रतिष्ठा टिकवण्यासाठी किमान अखेरचा सामना जिंकायचा होता. मात्र ओलसर मैदानामुळे सामना रद्द करण्याची पाळी आली. आदल्या दिवशी रात्री आणि दुपारी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी कोणतीही व्यवस्था मदानावर नसल्यामुळे ही समस्या उद्भवली होती.
नको नको रे धिंगाणा..
‘‘थोडी सी थंडी जगह होनी चाहिए, जहाँ पे इतना गरम मॅच हो,’’
Written by प्रशांत केणी
First published on: 19-03-2016 at 04:49 IST
मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs pakistan icc world t 0