भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवल्यामुळे क्रिकेटरसिकांना चिंता वाटते आहे. यात हा सामना ईडन गार्डन्सवर असल्यामुळे या चिंतेत आणखी भर पडते आहे. परंतु पावसाचे आव्हान पेलण्यासाठी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (कॅब) पूर्णत: सज्ज आहे, असे मत ईडन गार्डन्सचे क्युरेटर सुजन मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या वर्षी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-२० सामना ओलसर मैदानामुळे रद्द करण्यात आला होता. आदल्या दिवशी रात्री आणि दुपारी पडलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था मदानावर नसल्यामुळे ही समस्या उद्भवली होती. २०११च्या विश्वचषकात मोहालीला भारत-पाकिस्तान सामना झाला होता. या सामन्याच्या पूर्वसंध्येलासुद्धा पाऊस पडला होता. पण तरीही सामन्याच्या दिवशी मात्र वरुणराजाने कृपादृष्टी दाखवल्यामुळे सामना होऊ शकला.

खेळपट्टी आणि मैदानावरील परिसर (आऊटफिल्ड) झाकण्यासाठी आम्ही ७२ लाख रुपये खर्च करून परदेशातून कव्हर्स आणले आहेत. ही वजनाने हलकी असून, हाताळण्यासाठी वेळसुद्धा कमी लागतो.
– सुजन मुखर्जी, क्युरेटर