भारत-पाकिस्तान सामन्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनचा आश्चर्यकारक निर्णय
भारतातील सर्वाधिक प्रेक्षक क्षमतेचे क्रिकेट स्टेडियम म्हणून कोलकाताच्या ईडन गार्डन्सची ख्याती आहे. जागतिक क्रिकेट नकाशावर आपल्या अभिजात इतिहासाने अजरामर ठसा उमटवणाऱ्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये सध्या ६६,३४९ क्रिकेटरसिकांना सामावण्याची क्षमता आहे. त्यामुळे धरमशालाला वगळल्यानंतर भारत-पाकिस्तान या क्रिकेटरसिकांच्या सर्वात जास्त पसंतीच्या सामन्यासाठी ईडन गार्डन्सची निवड करण्यात आली. परंतु या अवाढव्य स्टेडियममधील फक्त सहा हजार तिकिटेच ऑनलाइन पद्धतीने सर्वसामान्य क्रिकेटरसिकांच्या वाटय़ाला आल्याचे वास्तव समोर येत आहे.
भारतात १९८७ मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या आकडेवारीनुसार, ईडन गार्डन्सची प्रेक्षक क्षमता एक लाख २० हजारांपर्यंत होती. त्यानंतर ती एक लाखापर्यंत खाली आली. २०११मध्ये विश्वचषकासाठी झालेल्या नूतनीकरणाच्या वेळी प्रेक्षकसंख्या जवळपास ३५ हजारांनी कमी झाली. मात्र आयसीसी आणि बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या स्वर्गवासी जगमोहन दालमिया यांच्या ईडन गार्डन्सला कोणत्याही स्पर्धा आणि मालिकांमध्ये योग्य स्थान दिले जायचे. आता भारत-पाकिस्तान सामन्यासाठीसुद्धा चाहत्यांच्या ईडन गार्डन्सकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वापरलेल्या ऑनलाइन लॉटरी नोंदणी पद्धतीसाठी पाच लाखांहून अधिक चाहत्यांनी नावे नोंदवली होती. मात्र क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या (कॅब) या तिकीट वाटपामुळे समस्त क्रिकेटरसिकांची नाराजी त्यांनी ओढवली आहे.
क्रिकेट असोसिएशन बंगालमध्ये पूर्ण सदस्यत्व असलेले १२१ क्लब्स याशिवाय प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि जिल्हा संघ या सर्वाकरिता २५ हजार तिकिटे देण्यात आली आहेत. संघटनेचे आजीवन सभासद असणाऱ्या व्यक्तींसाठी २५ हजार तिकिटांचे वाटप करण्यात आले आहे. याचप्रमाणे आयसीसीसाठी ५०००, बीसीसीआयवर पूर्ण सदस्यत्व असणाऱ्या नॅशनल क्रिकेट क्लबची २७०० आणि भारतीय संघासाठी ५०० तिकीटे देण्यात आली आहेत. तसेच लष्कर, अग्निशमन दल, पोलीस, आमदार, खासदार आदी मान्यवरांसाठीसुद्धा तिकिटे देण्यात आली आहेत. या वाटपामुळे सर्वसामान्यांना फक्त सहा हजारच तिकिटे उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती ‘कॅब’च्या सूत्रांनी दिली आहे. दीड हजार, एक हजार आणि पाचशे रुपये असे तिकिटांचे दर ठेवण्यात आले आहेत. ‘कॅब’चे तिकीटवाटपाचे समीकरण आणि ऑनलाइन तिकीट विक्रीची आयसीसीची योजना कार्यरत असली तरीही काही उत्साही क्रिकेटरसिकांनी तिकीट खरेदी करण्याच्या आशेने ईडन गार्डन्स परिसर गाठून खातरजमा केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा