मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंगला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पुढील सामन्यांना मुकावे लागणार आहे. युवराज सिंगच्या जागी मनिष पांडे याचा संघात समावेश करण्यात आला आहे. ( Full coverage || Fixtures || Photos)
युवराजच्या दुखापतीनंतर संघात कोणाची वर्णी लागणार याकडे साऱयांचे लक्ष होते. युवराजच्या जागी अजिंक्य रहाणेचा समावेश होण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, मनिष पांडे याला भारतीय संघ व्यवस्थापनेने मुंबईत बोलावून घेतल्याने नेमके संघात कोणाला स्थान दिले जाणार याची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू होती. मनिष आणि रहाणे यांच्यासह युवा खेळाडू पवन नेगी याचेही नाव चर्चेत होते. अखेर मनिष पांडे याच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

२६ वर्षीय मनिष पांडे याने याआधी आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे दोन सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या वर्षी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताकडून खेळण्याची त्याला संधी मिळाली होती. तसेच चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने देखील पांडे खेळला आहे.

युवराजची दुखापत चिंताजनक

रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात संघाच्या डावाला विराट स्थैर्य मिळवून देत असताना युवराजने उत्तम साथ दिली. पण सामन्यादरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली. विराटच्या साथीने एकेरी-दुहेरी धाव घेताना त्याला कठीण जात होते. त्याच्या खेळीदरम्यान दोनदा फिजियोला मैदानावर धाव घ्यावी लागली होती. मात्र तो हिमतीने खेळला. सोमवारी सकाळी भारतीय संघ चंदिगढहून मुंबईत दाखल झाला. मात्र चंदिगढ विमानतळावर मुळातच उशिरा पोहोचलेला युवी चालताना डावा पाय हळुवार टाकण्यावर भर देत होता. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यासाठी युवराजच्या खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती.

Story img Loader