खेळाडू आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रतिस्पध्र्याशी सामना करताना घाबरत नाही. पण निवृत्ती या एकाच शब्दाशी सामना करणं त्याला जड जातं. कर्मचाऱ्याच्या निवृत्तीला वयाचं बंधन असतं. परंतु खेळाडूच्या बाबतीत त्याच्या कारकीर्दीचा आलेख खाली झुकला, त्याची संघातील गरज संपली, केवळ त्याचा अनुभव किंवा पूर्वयशाच्या बळावर तो संघात असेल, यापैकी कोणतंही कारण असू द्या. खेळाडूनं नेमकं तिथंच थांबायला हवं. खेळाडू देशापेक्षा आणि संघापेक्षा मोठे होतात आणि नेमकी तिथेच समस्या उद्भवते. सध्या भारताचा मर्यादित षटकांचा संघनायक महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्या निवृत्तीची चर्चा क्रिकेटजगतामध्ये रंगते आहे. वानखेडेवर उपांत्य लढतीत वेस्ट इंडिजकडून भारत पराभूत झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियन पत्रकार सॅम्युएल फेरीसला व्यासपीठावर बोलावून धोनीने त्याच्याकडूनच वदवून घेतलं की, आपण अद्याप यौवनात आहोत, म्हणजेच तंदुरुस्त आणि वेगवान आहोत. त्यामुळे निवृत्तीचा प्रश्नच उद्भवत नाही. भारताला दोनदा विश्वविजेतेपद आणि तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अग्रस्थान मिळवून देणारा कर्णधार हा एक असामान्य इतिहास धोनीच्या गाठीशी आहे. त्याच्या पराक्रमाविषयी भारतीय क्रिकेटरसिकांना आणि प्रसारमाध्यमांनाही कौतुक आहे. पण आपल्याला कुणी तरी थांब सांगतंय, निवृत्तीचा पूर्णविराम कारकीर्दीपुढे दे, असं सांगतंय, हे वास्तव त्याला सहन झालं नाही. परंतु नेतृत्वकुशल धोनीनं असा प्रश्न आला, तर काय करावं, याचा आधीच गृहपाठ केला होता. त्यामुळेच मला हा प्रश्न एखादा भारतीय पत्रकार विचारेल, असं अपेक्षित होतं, हे म्हणायलाही तो कचरला नाही. मग तुझा मुलगा किंवा भाऊ भारतीय संघात यष्टीरक्षण करू शकेल का? अशा फुशारक्याही त्याने मारल्या. अजून तरी आपल्याला पर्याय देशभरात उपलब्ध नाही. मग निवृत्तीचा प्रश्न का विचारता, हेच धोनीला मांडायचं होतं. पण यातून २०१९च्या विश्वचषकापर्यंत मी भारतीय संघातच असेन, पण मला निवृत्तीचा प्रश्न विचाराल, तर याद राखा, हाच इशारा जणू धोनीने  दिला. हाच धोनी बंगळुरूतील थरारक विजयानंतर एका पत्रकाराला म्हणाला होता की, तुम्हाला भारताच्या विजयाबद्दल आनंद झालेला दिसत नाही.

सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या काही वर्षांत शंभरावं शतक आणि निवृत्ती या दोन गोष्टींनी त्याचा बराच पिच्छा पुरवला. मी कुणाच्या सांगण्यावरून क्रिकेटमध्ये आलो नव्हतो, तर मग कुणाच्या सांगण्यावरून का थांबावं, असा सवालसुद्धा त्यानं एकदा पत्रकार परिषदेत केला होता. पण त्यालाही कुठे तरी थांबावं लागलं. कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्ती पत्करल्यानंतर फक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील नेतृत्व धोनीकडे आहे. कसोटीत विराट कोहली समर्थपणे नेतृत्वाची धुरा सांभाळत आहे. आता कोहलीनं तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताचं नेतृत्व करावं, असा एक प्रवाह आहे. पण अजून तरी धोनीनं निवृत्तीच घ्यावी, अशी त्याची कामगिरी नाही. परंतु प्रश्न विचारण्याची क्षमता पत्रकारांमध्येच आहे. त्यांनाच योजनापूर्वक गप्प करू.  तुमच्याकडे ‘प्रतिधोनी’ नसताना मला निवृत्तीबाबत विचारायची, तुमची हिंमतच कशी होते? हेच धोनीनं ठरवलेलं दिसतंय.

– प्रशांत केणी

Story img Loader