‘‘या खेळाडूंना शिकवण्याची गरज नाही. उपजत गुणांना शिस्तीची जोड असल्यामुळे त्यांना योग्य दिशा देणे, हे इतकेच काम माझ्यासाठी शिल्लक राहते,’’ श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि सध्या इंग्लंड संघाचा फलंदाज सल्लागार असलेल्या माहेला जयवर्धनेने दक्षिण आफ्रिकेवरील विजयानंतर इंग्लंड संघाचे केलेले कौतुक.. डोळ्यासमोर २३० धावांचे विशाल लक्ष्य असूनही इंग्लंडने अगदी संयतपणे दक्षिण आफ्रिकेला नमवून स्पध्रेतील आव्हान कायम राखले. धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. याआधी २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या २४८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने २०९ धावा केल्या होत्या. त्या विक्रमी खेळीत आणि शुक्रवारच्या आफ्रिकेवरील विजयात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे जो रुट. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने नाबाद ९० धावा केल्या होत्या, तर आफ्रिकेविरुद्ध त्याने ८३ धावा फटकावल्या. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांचा पुरेसा अनुभव नसूनही इंग्लंडने दमदार खेळाची प्रचीती घडवली. मोठय़ा धावसंख्येसमोर न डगमगता, कोणताही आतताईपणा न करता लक्ष्यावर लक्ष केंद्रित करणे, हे यशाचे गमक त्यांना कळले आहे. इयॉन मॉर्गन, जोस बटलर यांच्या ट्वेन्टी-२० प्रकारातील अनुभवाच्या तुलनेत संपूर्ण संघ तसा नवखाच आहे. जो रुट तर कसोटी आणि मर्यादित क्रिकेट प्रकारात मोडणारा खेळाडू. पण, संयम आणि परिस्थितीशी सामना करण्याची वृत्ती यामुळेच तो झटपट प्रकारातही सरस ठरला. मोठे लक्ष्य पार करण्यासाठी चांगली सुरुवात होणे गरजेचे आहे आणि याची जाण ठेवून जेसन रॉय आणि अ‍ॅलेक्स हेल्स यांनी इंग्लंडचा मजबूत पाया रचला. त्यानंतर बेन स्टोक्स व इऑन मॉर्गन छोटेखानी खेळी करून माघारी परतल्यानंरही इंग्लंडच्या खेळाडूंनी उगाच फटके मारण्याचा मोह टाळला. रुटने अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी करताना संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. पहिल्याच सामन्यात ख्रिस गेलच्या वादळाने उद्ध्वस्त झालेल्या इंग्लंडला आवश्यक असलेली खेळी रुटने साकारली. पण, त्यात गेलसारखा आक्रसताळेपणा, राक्षसी प्रहार नव्हता, तर अगदी तंत्रशुद्ध शैलीने उभारलेला डोलारा होता. ‘‘एक परिपूर्ण फलंदाज आमच्याकडे आहे,’’ अशा शब्दात कर्णधार मॉर्गनने रुटचे कौतुक केले. ८३ धावांच्या खेळीत रुटने कोणताही आत्मघातकी फटका मारला नाही. ट्रेवर बायलीस यांनी प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर हा संघ दिवसेंदिवस प्रगती करत चालला आहे. युवा खेळाडूंची मोट बांधून बायलीस यांनी इंग्लंडला जेतेपदाचे स्वप्न दाखवले आहे आणि या स्वप्नांना खेळाडूंच्या सातत्यपूर्ण खेळाचे बळ आहे. आता आफ्रिकेवरील विजयानंतर मनोबल उंचावलेल्या इंग्लंडची पुढील वाटचाल कशी होते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. अखेरीस शिस्त हीच त्यांच्या विजयाचे ‘रुट’ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– स्वदेश घाणेकर

– स्वदेश घाणेकर