विश्वचषकात पुन्हा एकदा आम्हाला उपांत्य फेरीतून माघारी परतावे लागले आहे. मात्र तरीही उपांत्य फेरीचे भूत मानगुटीवर बसलेले नाही, अशा शब्दांत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने आपल्या भावना व्यक्त केल्या. प्राथमिक फेरीत चारही लढतीत अपराजित राहणाऱ्या न्यूझीलंडला उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. आमच्यापेक्षा चांगला आणि सर्वागीण खेळ करणाऱ्या संघाकडून आम्ही पराभूत झालो, असेही विल्यमसनने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘एका वेळी एका सामन्याचा विचार करून आम्ही खेळतो. प्रत्येकाला सर्वोत्तम प्रदर्शन करायचे असते. मात्र काही वेळा दुसरा संघ चांगला खेळतो आणि तुम्हाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागते. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकातही आम्ही उपांत्य फेरीचा सामना खेळलो होतो. त्या वेळी दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढय़ संघाला नमवण्याची किमया आम्ही केली
होती. या वेळी तसे होऊ शकले नाही. हा क्रिकेटचा भाग आहे.’ विश्वचषकात उपांत्य फेरीच्या सहा लढती गमावल्यानंतर गेल्या वर्षी पहिल्यांदाच न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली होती.
प्रथम फलंदाजी करताना १५३ ही धावसंख्या पुरेशी आहे का, या प्रश्नावर विल्यमसन म्हणाला, ‘आम्हाला २५ धावा कमी पडल्या. शेवटच्या पाच षटकांमध्ये सामन्याचे चित्र पालटले. शेवटच्या पाच षटकांमध्ये आम्ही केवळ ३२ धावा केल्या आणि ५ विकेट्स गमावल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. ३ बाद १३० या स्थितीतून मोठी धावसंख्या उभारण्याची आम्हाला संधी होती.’
‘स्पर्धेतील प्रदर्शनातून अनेक सकारात्मक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. आशियाई उपखंडात आम्ही वातावरणाशी, खेळपट्टय़ांशी चांगल्या पद्धतीने जुळवून घेतले. आमच्या फिरकीपटूंनी सुरेख पद्धतीने गोलंदाजी केली. धावा रोखणे आणि विकेट्स मिळवणे या दोन्ही आघाडय़ांवर त्यांनी यश मिळवून दिले. मिचेल सँटनर, इश सोधी आणि नॅथन मॅक्क्युलम या त्रिकुटाने आपली उपयोगिता सिद्ध केली,’ असे विल्यमसनने सांगितले.
जागतिक स्तरावरील अव्वल वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांना एकदाही अंतिम अकरात संधी न देण्याच्या निर्णयाचे विल्यमसनने समर्थन केले. चेंडू जराही स्विंग होत नव्हता. आम्ही विचारपूर्वक संघ निवडला. इंग्लंडविरुद्धही आम्ही खेळपट्टीला साजेसे आक्रमण निवडले होते. मात्र जेसन रॉयने तडाखेबंद खेळी साकारत सामना आमच्यापासून हिरावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा