ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत इंग्लंडने न्यूझीलंडचा विजयी घोडदौडीला लगाम घातला. इंग्लंडने दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत न्यूझीलंडवर सात विकेट्सने मात केली.
न्यूझीलंडने दिलेले १५४ धावांचे आव्हान इंग्लंडने १८ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूत गाठले. इंग्लंडचा सलामीवर जेसन रॉय विजयाचा शिल्पकार ठरला. रॉयने २ षटकार आणि ११ चौकारांच्या आतषबाजीसह केवळ ४० चेंडूत ७८ धावा ठोकल्या, तर हेल्सनेही त्याला साजेशी साथ देत २० धावांचे योगदान दिले. सलामीजोडी तंबूत दाखल झाल्यानंतर कर्णधार इऑन मार्गन शून्यावर माघारी परतला. त्यानंतर जो रुट (२७ नाबाद) आणि जोस बटलरने(३२ नाबाद) संघाची मदार सांभाळत संघाला विजय प्राप्त करून दिला. ( Full coverage || Fixtures || Photos)
दरम्यान, या सामन्याचा नाणेफेक जिंकून इंग्लंडने न्यूझीलंडला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. न्यूझीलंडला वीस षटकांत १५४ धावांचे आव्हान इंग्लंडसमोर उभे करता आले. न्यूझीलंडच्या सलामीवरांनी जोरदार फटकेबाजीने सुरूवात केली होती. पण तिसऱया षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मार्टिन गप्तील मोठा फटका मारण्याच्या नादत बाद झाला. त्यानंतर विल्यमसन आणि कॉलिन मुर्नो यांनी जोरदार फटकेबाजी करून अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र, विल्यमसन (३२) मोठी खेळी साकारण्यास अपयशी ठरला. विल्यमसन अकराव्या षटकात मोईन अलीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. विल्यमसन माघारी परतल्यानंतर चौदाव्या षटकात न्यूझीलंडला आणखी एक धक्का बसला. मैदानात जम बसवलेला कॉलिन मुर्नो ४६ धावा ठोकून माघारी परतला. लायम प्लंकेटने मुर्नोची विकेट घेतली. अखेरच्या षटकांत मोठे फटके मारण्याच्या नादात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी अक्षरश: विकेट्स टाकल्या. त्यामुळे वीस षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडला १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा