ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या थरारक अंतिम फेरीत वेस्ट इंडिजने इंग्लंडला चार विकेट्स राखून पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषकाला गवसणी घातल्यानंतर साजऱ्या करण्यात येणाऱ्या कॅरेबियन उत्साहाला गालबोट लावणारी घटना घडली. इंग्लंडविरुद्धच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मार्लन सॅम्युअल्सचे विजयानंतरचे मैदानावरील आणि पत्रकारपरिषदेतील वर्तन टीकेचा विषय ठरत आहे. या सामन्यातील विजयानंतर एकीकडे विडिंजचे खेळाडू मैदानावर नेहमीप्रमाणे नृत्य करून आनंद साजरा करत असताना सॅम्युअल्स भलताच आक्रमक झाला होता. याशिवाय, सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सॅम्युअल्स पूर्णवेळ टेबलावर पाय ठेवूनच बसला होता. त्याने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरेही तशीच दिली. सॅम्युअल्सच्या या वर्तनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निंदा होत आहे. कालरेस ब्रेथवेटने विजयी षटकार मारल्यानंतर मार्लन सॅम्युअल्सने अंगावरचा टी-शर्ट उतरवत आक्रमकपणे इंग्लिश संघाच्या डगआऊटच्या दिशेने धावला होता. त्यावेळी संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी सॅम्युअल्स यांनी त्यांना आवरले होते. सॅम्युअलचा हाच अवतार पत्रकारपरिषदेतही पहायला मिळाला. यावेळी सॅम्युअल्सने पॅड घातलेले त्याचे पाय टेबलावर ठेवले होते. तत्पूर्वी पत्रकारपरिषदेच्या कक्षाबाहेर असणाऱ्या एका सोफ्यावर सॅम्युअलने अंग झोकून दिले होते.

Story img Loader