भारताला पराभवाची धूळ चारल्यानंतर न्यूझीलंडने आपली विजयी घोडदौड कायम राखत ऑस्ट्रेलियालाही धक्का दिला आहे. धरमशालाच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात किवींनी कांगारुंचा ८ धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर १४३ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाला वीस षटकांच्या अखेरीस १३४ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. मिचेल मॅक्लेघन याने तीन, तर अँडरसन आणि मिचेल सँटर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक ३८ धावांची खेळी करून चांगली सुरूवात करून दिली होती. पण इतर फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्याने अखेरच्या षटकांत ऑस्ट्रेलियाची दयनीय अवस्था पाहायला मिळाली.
दरम्यान, न्यूझीलंडच्या डावाची मार्टिन गप्तिलने तुफानी फटकेबाजी करत दमदार सुरूवात केली होती. गप्तिनने ३९, तर केन विल्यमसनने २४ धावा केल्या. अखेरच्या षटकांत ग्रँट एलियटने(२७) फटकेबाजी करत संघाला १४२ चा आकडा गाठून दिला.

Story img Loader