पंखांना क्षितिज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कवेत मावणारे आकाश असते. पण क्रिकेटच्या अवकाशात आत्मविश्वासाने भरारी घेणाऱ्या किवींच्या मर्यादा ट्वेन्टी-२० विश्वचषकाने स्पष्ट केल्या. वर्षभरापूर्वी एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषकात हा संघ साखळीमधील सहापैकी सहा सामने जिंकून बाद फेरीत पोहोचला. मग वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेला हरवून त्यांनी विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. मेलबर्नला झालेल्या अंतिम फेरीपर्यंतचा न्यूझीलंडचा प्रवास हा भारावणाराच होता. ब्रेंडन मॅक्क्युलमच्या नेतृत्वाखाली हा संघ नवा इतिहास घडवणार असे वाटत होते, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम फेरीत हा सहजगत्या नतमस्तक झाला. त्यांची वाटचाल उपविजेतेपदापर्यंतच होऊ शकली. मॅक्क्युलमच्या निवृत्तीनंतर हा संघ सावरणार का, हा प्रश्न तमाम क्रिकेटरसिकांना पडला होता. पण ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच लढतीत न्यूझीलंडने भारताला धक्का दिला. फिरकी हे भारताचे बलस्थान. त्यामुळे नागपूरला भारताने फिरकीचा चक्रव्यूह रचला होता; परंतु मिचेल सँटनर आणि इश सोधी या फिरकी गोलंदाजांच्या बळावर न्यूझीलंडने तो सामना जिंकला. मग पाहता-पाहता ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बांगलादेश या संघांना त्यांनी आरामात नामोहरम केले. साखळीत चारपैकी चार सामने जिंकण्याचे कर्तृत्व फक्त न्यूझीलंड या एकमेव संघालाच दाखवता आले. ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊदी यांच्यासारख्या जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांना न्यूझीलंडने खेळवलेच नाही. भारतीय वातावरणात आणि खेळपट्टय़ांवर खेळायचे, तर फिरकी हेच हुकमी अस्त्र वापरायला हवे, हे प्रशिक्षक माइक हेसन यांना चांगलेच उमगले. याशिवाय सराव सामन्यांत सुपर ओव्हरचा सरावसुद्धा किवी संघाने केला, त्यामुळे दडपण हाताळण्याच्या दृष्टीनेही त्यांची तयारी झाली. केन विल्यमसनने कर्णधारपदाला न्याय देणारी फलंदाजी केली. मार्टिन गप्तील, कॉलिन मुन्रो, रॉस टेलर आणि कोरे अँडरसन यांनी जबाबदारीने फलंदाजी केली. पण इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पुन्हा मागील वर्षीच्या विश्वचषक अंतिम फेरीची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. १०व्या षटकापर्यंत एका फलंदाजाच्या मोबदल्यात नव्वदीला पोहोचलेला हा संघ २० षटकांत जेमतेम दीडशेपर्यंत पोहोचू शकला. पण त्यासाठी आणखी सात फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर जेसन रॉयच्या फलंदाजीपुढे किवी गोलंदाजी निष्प्रभ झाल्याचे पाहायला मिळाले. बोल्ट-साऊदीची उणीव इथे तीव्रतेने जाणवली. उत्तरार्धात सँटनर-सोधी यांनी तीन फलंदाज बाद करून इंग्लंडवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तोवर अतिशय उशीर झाला होता. उपांत्य फेरीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत विल्यमसनने आम्ही या चुकांमधून शिकू, असे सांगितले. तूर्तास, किवीभरारीला मर्यादा असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. कोणत्याही प्रकारच्या विश्वचषकात जोरदार मुसंडी मारल्यानंतर मग कच खाणारा हा संघ, अशी दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच ‘चोकर्स’ ही त्यांची प्रतीमा निर्माण झाली आहे. येत्या काळात किवीभरारी जगज्जेतेपदापर्यंत झेपावेल अशी आशा राखू या!

– प्रशांत केणी

Story img Loader