दक्षिण आफ्रिकेवर ७ विकेट्स राखून मात
गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर न्यूझीलंडच्या महिला संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेवर सात विकेट्सनी मात केली. या विजयासह न्यूझीलंडने प्राथमिक फेरीत निर्भेळ यशासह उपांत्य फेरीत आगेकूच केली आहे. पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दक्षिण आफ्रिकेला ९९ धावांतच गुंडाळत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. आफ्रिकेतर्फे मॅरिझान कापने सर्वाधिक २२ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे सोफी डेव्हाइन आणि लीघ कॅस्परक यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. इरिन बर्मिगहॅमने २ बळी घेत या दोघींना चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना सूजी बेट्स आणि राचेल प्रिस्ट यांनी ५७ धावांची सलामी देत न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला. सूजीने २९ तर राचेलने २८ धावांची खेळी केली. या दोघी बाद झाल्यानंतर सोफी डेव्हाइनने २७ धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : १९.३ षटकांत सर्वबाद ९९ (मॅरिझान काप २२, सोफी डेव्हाइन ३/१६, लीघ कॅस्परक ३/१९, इरिन बर्मिगहॅम २/१४) पराभूत विरूद्ध न्यूझीलंड : १४.३ षटकांत ३ बाद १०० (सूजी बेट्स २९, राचेल प्रिस्ट २८, सोफी डेव्हाइन २७, मसाबाटा लास १/११)
सामनावीर : सोफी डेव्हाइन