मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवरच २०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील भारत-पाकिस्तान हा उपांत्य फेरीचा सामना झाला होता. पाकिस्तानला हरवून भारताने अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली होती. त्या सामन्यासाठी दोन्ही देशांचे पंतप्रधान आणि बरीच दिग्गज मंडळी आली होती. पाकिस्तानमधूनही अनेक नागरिकांनी त्या सामन्याला हजेरी लावली होती. क्रिकेटच्या इतिहासात एक सोनेरी अध्याय त्या सामन्याने लिहिला गेला. सचिन तेंडुलकरची ८५ धावांची संस्मरणीय खेळी आजही क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. वर्षभरापूर्वी पीसीए स्टेडियमचे नाव बदलून इंदरजीत सिंग बिंद्रा स्टेडियम असे नामकरण करण्यात आले. बिंद्रा हे पंजाब क्रिकेट असोसिएशनचे धूर्त प्रशासक. एके काळी भारतीय क्रिकेटच्या पटावर ते महत्त्वाचे मोहरे होते. ‘आयपीएलचे जनक’ म्हटल्या जाणाऱ्या वादग्रस्त ललित मोदी यांना बिंद्रा यांनीच भारतीय क्रिकेट राजकारणाच्या पटलावर आणले. १९७८ ते २०१४ अशी ३६ वष्रे बिंद्रा यांनी पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा वाहिली. मग प्रदीर्घ आजारपणामुळे त्यांना बाजूला करून कार्याध्यक्षपद देण्यात आले. १९९३मध्ये बिंद्रा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष झाले आणि १९९६पर्यंत त्यांनी ते पद भूषवले. बिंद्रा आणि जगमोहन दालमिया या दोघांच्या प्रयत्नांमुळेच १९८७ व १९९६मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पध्रेचे यजमानपद भारताकडे चालून आले. शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असताना बिंद्रा मुख्य सल्लागार होते. याचप्रमाणे एन. श्रीनिवासन जावयामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यावर बीसीसीआयच्या बैठकीत त्याला राजीनामा देण्यासाठी थेट आव्हान करणारे बिंद्राच होते. बिंद्रा यांचा भारतीय क्रिकेट प्रशासनातील प्रवास सुरू झाला, नेमक्या त्याच वेळी पीसीए स्टेडियमच्या सुवर्णकाळालाही प्रारंभ झाला. १९९३मध्येच चंदिगडच्या सीमेवर हे स्टेडियम बांधण्यात आले. विमानतळ जवळ असल्याने कमी उंचीवरील १६ खांबांद्वारे येथे प्रकाशयोजना करण्यात आली आहे. २२ नोव्हेंबर १९९३ या दिवशी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील हिरो चषकातील सामन्याने या स्टेडियमच्या कारकीर्दीला प्रारंभ झाला. तो सामना भारताने ४३ धावांनी जिंकला होता. या मैदानावरील १३ एकदिवसीय सामन्यांपैकी ८ सामने भारताने जिंकले आहेत, तर ५ सामने गमावले आहेत. १० डिसेंबर १९९४पासून बिंद्रा स्टेडियमवर कसोटी क्रिकेटला प्रारंभ झाला. भारताचा पहिला सामना विंडीजने २४३ धावांनी जिंकला. आतापर्यंत झालेल्या १२ कसोटी सामन्यांत भारताने ६ विजय मिळवले आहेत, तर ५ अनिर्णीत राखले आहेत. याशिवाय भारत २००९मध्ये या स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध एकमेव ट्वेन्टी-२० सामना खेळला, तो भारतानेच जिंकला. १९९६च्या विश्वचषकातील विंडीजविरुद्धचा रोमहर्षक उपांत्य सामना ऑस्ट्रेलियाने फक्त ५ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २०७ धावा केल्या, तर विंडीजचा डाव शेवटच्या षटकात २०२ धावांत आटोपला व ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. आता रविवारच्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात कोणता इतिहास लिहिला जातो, ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
– प्रशांत केणी