भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्या नावाचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) गांभीर्याने विचार करीत आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांचा समावेश असलेली बीसीसीआयची सल्लागार समिती द्रविडबाबत आग्रही आहे. मात्र रवी शास्त्री यांच्याबाबत ते उत्सुक नसल्याचे सूत्रांकडून समजते आहे. आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकातून भारताचे आव्हान संपुष्टात आले, त्याच वेळी शास्त्री यांच्या संघ संचालक पदाचा कार्यकाळ संपला.
द्रविड सध्या भारत ‘अ’ आणि भारताच्या १९ वर्षांखालील (युवा) संघाला मार्गदर्शन करीत आहे. बांगलादेशमध्ये नुकत्याच झालेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत भारताच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करल्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या स्पध्रेतील द्रविड यांच्या मार्गदर्शनाचे आणि युवा खेळाडूंची गुणवत्ता जोपासण्याच्या वृत्तीचे क्रिकेटजगतामध्ये कौतुक झाले होते.
द्रविड यांनी विचार करण्यासाठी मुदत मागितली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सल्लागार समितीच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत प्रशिक्षक पदाचा निर्णय घेण्यात येईल. द्रविड यांच्या प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ २०१९च्या विश्वचषकापर्यंत असेल. याशिवाय बीसीसीआयकडून राष्ट्रीय प्रशिक्षक पदाच्या जबाबदारीसाठी ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज माइक हसी यांनासुद्धा विचारणा करण्यात आली होती; परंतु त्यांचे मन वळवण्यात यश आले नाही.
२०१४ मध्ये इंग्लंडने कसोटी मालिकेत भारतावर ३-१ असा विजय मिळवल्यानंतर बीसीसीआयकडून मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय संघाच्या संचालक पदावर शास्त्री यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने मागील वर्षी एकदिवसीय विश्वचषकात आणि या वर्षीय ट्वेन्टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. याशिवाय चालू वर्षांत ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० मालिका ३-० अशी जिंकली आणि आशिया चषक जिंकण्याचा मान मिळवला.
दरम्यान, बीसीसीआयकडून साहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर, गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्याशी नवा करार करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा