विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचा इतिहास कायम राखत भारताने पाकिस्तानवर सहा विकेट्सने विजय प्राप्त केला. विराट कोहलीच्या नाबाद ५५ धावांच्या खेळीवर भारताने पाकिस्तानचे ११९ धावांचे आव्हान दोन षटके आणि एक चेंडू राखून गाठले. कोहलीने आपल्या खेळीत ७ चौकार आणि १ खणखणीत षटकार खेचून उपस्थितांची मने जिंकली. (Full Coverage|| Fixtures||Photos)

सामन्याचा नाणेफेक जिंकून भारताने स्विकारलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय सार्थ ठरवत पाकिस्तानला १८ षटकांच्या अखेरीस ११८ धावांवर रोखले होते. सामन्याआधी सुरू झालेल्या पावसामुळे हा सामना १८ षटकांचा खेळविण्यात आला. पाकिस्तानच्या समाधानकारण आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात समाधानकारक झाली होती. मात्र, रोहित शर्मा (१०) मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट देऊन बसला. त्यानंतर धवनने संयमी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण तोही स्वस्तात बाद झाला. धवनपाठोपाठ रैना आल्यापावलीच माघारी परतल्याने संघावर बिकट परिस्थिती ओढावली होती. पण कोहलीने एक बाजू लावून धरत युवराजला हाताशी घेऊन धावसंख्येला आकार दिला. युवराजनेही कोहलीला साजेशी साथ देत दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कोहलीने सामन्यात सचिन तेंडुलकरच्या दिशेने अभिवादन करून अर्धशतक साजरे केले, तर युवराजने २४ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. युवराज बाद झाल्यानंतर धोनीने आपल्या अंदाजात खेळीला आकार देऊन सामन्याच्या सोळाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विजयी धाव घेतली आणि पाकिस्तानने पुन्हा एकदा विजयाचा ‘मौका’ गमावला.

दरम्यान, पहिल्या डावात गोलंदाजांचीचा भेदक मारा, अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या बळावर भारताला पाकिस्तानला १८ षटकांच्या अखेरीस ५ बाद ११८ धावांवर रोखता आले. भारताकडून नेहरा, बुमराह, जडेजा आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली, तर आर.अश्विनने आपली फिरकी जादू दाखवत ४ षटकांत केवळ १२ धावा दिल्या. ईडन गार्डन्सच्या मैदानावर सकाळपासूनच पावसाच्या शक्यतेमुळे आच्छादन घालण्यात आले होते. पाऊस थांबल्यानंतर स्टेडियमला कोरडे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली स्वत: जातीने मैदानात उपस्थित होता. स्टेडियमची संपूर्ण पाहणी झाल्यानंतर सामना खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. स्टेडियम कोरडे रहावे यासाठी खास लंडनहून मागविण्यात आलेले आच्छादन वापरण्यात आले होते. त्यामुळे आऊट फिल्ड लवकरात लवकर कोरडे करण्यात यश आले.

LIVE UPDATE:

# विजयाचा शिल्पकार कोहली ठरला सामनावीराच्या पुरस्काराचा मानकरी.

# भारताचा पाकिस्तानवर सहा विकेट्स राखून विजय, कोहलीची नाबाद ५५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी

# धोनीचा विनिंग स्टाईल षटकार, भारत विजयाच्या एक पाऊल दूर

# अर्धशतक ठोकल्यानंतर कोहलीचे सचिनला अभिवादन.

# कोहलीचे अर्धशतक, भारत ४ बाद १०५.

# कोहलीचा मोहम्मद अमीरला शानदार चौकार, भारताला विजयासाठी २० धावांची गरज.

# पुन्हा सामन्याकडे वळूया, भारताला विजयासाठी २७ चेंडूत २५ धावांची गरज.

# ज्युनिअर आणि सिनिअर बच्चन सोबत मास्टर ब्लास्टर सचिन.

# कोहली भारताला पुन्हा तारणार, मोहम्मद कैफने व्यक्त केला विश्वास.

# धोनी मैदानात, कोहलीचा शाहिद आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर चौकार.

# युवराजची विकेट, भारत ४ बाद ८४

# कोहलीचा मिड-विकेटच्या दिशेने दमदार चौकार, भारत ३ बाद ७४

# कोहलीचा शोएब मलिकला उत्तुंग षटकार, भारताला विजयासाठी ४३ चेंडूत ४५ धावांची गरज.

# कोहली, युवराजची फटकेबाजी. भारत ३ बाद ६२

# भारताला ६० चेंडूत ७३ धावांची गरज.

# सात षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद ४० (कोहली- १०*, युवराज- ६*)

# कोहलीनंतर युवराजनेही ठोकला चौकार, भारत ३ बाद ३८.

# कोहलीचा मोहम्मद सामीला खणखणीत चौकार, भारत ३ बाद ३३

# सहा षटकांच्या अखेरीस भारताची धावसंख्या ३ बाद २८.

# धवनपाठोपाठ रैना आल्यापावली माघारी, भारत ३ बाद २३ धावा.

# धवन बाद, मोहम्मद सामीने घेतली विकेट. धवनने १६ चेंडूत केल्या फक्त ६ धावा.

# शिखर धवनचा दमदार चौकार, भारत १ बाद २३ धावा.

# चार षटकांच्या अखेरीस भारताची धावसंथ्या १ बाद १८ धावा. (कोहली- २*, शिखर- १*)

# ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताची धावांचा पाठलाग करतानाची भारताची आकडेवारी-

# तिसऱया षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भारतला पहिला धक्का, रोहित शर्मा झेलबाद.

# रोहितचा आणखी एक चौकार, दोन षटकांच्या अखेरीस भारत बिनबाद १४ धावा.

# रोहित शर्माचा मोहम्मद इरफानच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार, भारत बिनबाद ८ धावा

# पहिल्या षटकात भारत बिनबाद ४ धावा.

# मोहम्मद अमीरकडून पहिले षटक, रोहित आणि शिखर मैदानात.

# सामन्याच्या दुसऱया डावाला सुरूवात.

# अठराव्या आणि सामन्याच्या शेवटच्या षटकात ७ धावा. भारतासमोर विजयासाठी ११९ धावांचे लक्ष्य

# नेहराची चार षटके संपली, आपल्या चार षटकांत नेहराने एक विकेट घेत दिल्या २० धावा. पाकिस्तान १७ षटकांच्या अखेरीस ५ बाद १११

# पाकिस्तानच्या धावसंख्येचे शतक.

# शोएब मलिकने १६ चेंडूत ठोकल्या २६ धावा.

# नेहराने भारताला मिळवून यश मिळवून दिले, घातक शोएब मलिक बाद

# सामन्याचे १७ वे षटक नेहराकडून

# टीम इंडियाला चौथे यश, उमर अकमल(२३) बाद; पाकिस्तान ४ बाद १०३ धावा.

# Also read: विश्वचषक.. पाकिस्तान आणि विराट

# शोएब मलिकपाठोपाठ उमर अकमलनेही पंड्या खेचला षटकार, १४ षटकांच्या अखेरीस पाकिस्तान ३ बाद ८२

# शोएब मलिकचा खणखणीत षटकार

# रोहित शर्माचे दमदार क्षेत्ररक्षण, पाकिस्तान ३ बाद ६५

# हार्दिक पंड्याने दिले भारताला मोठे यश, पाकचा घातक फलंदाज शाहिद आफ्रिदी झेलबाद, पाक ३ बाद ६०

# हार्दिक पंड्या पुन्हा मैदानात, सामन्याचे १२ वे षटक हार्दिक पंड्याकडून

# दहा षटकांच्या अखेरीस पाकिस्तान २ बाद ५१ (आफ्रिदी- ६*, उमर अकमल- ०*)

# भारताला दुसरे यश, पाकचा घातक फलंदाज अहमद शेहझाद(२५) झेलबाद. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात गमावली विकेट. रवींद्र जडेजाने टीपला झेल.

# शार्जिल खान बाद झाल्यानंतर तिसऱया स्थानावर शाहिद आफ्रिदी मैदानात.

# पाकिस्तानच्या फलंदाजी क्रमवारीत बदल.

# झेल टिपल्यानंतर हार्दिक पंड्याला दुखापत, पव्हेलियनमध्ये दाखल

# भारताल पहिले यश, शार्जिल खान बाद; हार्दिक पंड्याने टिपला अफलातून झेल

# रवींद्र जडेजाच्या षटकात ६ धावा, पाकिस्तान बिनबाद ३५

# फलंदाजी पावर-प्ले संपला, पाकिस्तान २८/०

# चार षटकांच्या अखेरीस पाकिस्तान १९/०

# अश्विनची अचूक गोलंदाजी, पाकच्या फलंदाजांवर अंकुश

# तीन षटकांच्या अखेरीस पाकिस्तान १३/०

# दुसऱया षटकात केवळ २ धावा, अश्विनची अफलातून गोलंदाजी

# नेहराच्या पहिल्या षटकात केवळ तीन धावा.

# पाकिस्तानचे सलामीवीर शार्जिल खान आणि अहमद शेहझाद मैदानात दाखल

# भारताच्या राष्ट्रगीताला सुरूवात, महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजात राष्ट्रगीत.

# पाकिस्तानच्या राष्ट्रगीताला सुरूवात.

# भारताचा संघ-

# भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय.

# सामना वीसऐवजी १८ षटकांचा, पहिल्या पाच षटकांत फलंदाजी पावर-प्ले

# टीम इंडियाच्या खेळाडूंचा स्टेडियमवर वॉर्मअप.

# भारत-पाक सामना सुरू होण्याआधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून पाहुण्यांचे स्वागत.

# सामना सुरु होण्याआधी विराटचा सराव

# बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी आणि अभिनेता अभिषेक बच्चन.

# सामन्यामागचे खरे हिरो..

# मास्टर ब्लास्टर सचिन तेेंडुलकर, उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी भारत-पाक सामन्याचा आनंद लुटण्यासाठी कोलकात्यात दाखल. थोड्याच वेळात स्टेडियमवर पोहोचणार.

# स्विंगचे सुलतान वसिम अक्रम आणि लिटील मास्टर सुनील गावस्कर हस्तांदोलन करताना.

# मुसळधार पाऊस पडूनही मैदान कोरडे, खास लंडनहून मागवलेल्या कव्हर्सची कमाल.

# भारत-पाक महिला संघाचा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानने दोन धावांनी जिंकला.

# स्टेडियमची परिस्थिती आणि तयारी पाहण्यासाठी सौरव गांगुली मैदानात जातीने हजर

# पाऊस पूर्णपणे थांबला, मैदानावरील कव्हर्स काढली

# भारत-पाक संघांच्या ड्रेसिंग रुमची झलक

# भारताने आजचा सामना का जिंकावा? यावर चिमुकल्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया

# बिग बी आणि सौरव गांगुली ईडन गार्डन्सवर

# दिलासादायक बातमी, कोलकात्यात पाऊस थांबला.

Also read: आजचा सामना रद्द झाल्यास भारताचे भवितव्य काय?

# पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान देखील ईडन गार्डन्सवर पोहोचले.

imrankhan

# महानायक अमिताभ बच्चन ईडन गार्डन्स स्टेडियमवर पोहोचले.

# VIDEO: सचिनचा सर्वात मोठ्या चाहत्याला भारत-पाक सामन्याविषयी काय वाटतं?

# टीम इंडिया ईडन गार्डन्स स्टेडियमच्या दिशेने रवाना

# पावसाचे पुन्हा आगमन, भारत-पाक सामन्यावर साऱयांचे लक्ष

# कोलकात्यात पुन्हा ढगाळ वातावरण

# कोलकात्यात पाऊस थांबला, सामना नियोजित वेळेत सुरू होण्याची शक्यता.