भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलंय. टी-२० विश्वचषकात सुपर १२ मधूनच भारत बाहेर पडल्यानंतर भारतीय संघावर जोरदार टीका झाली. यानंतर रवी शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा करारही संपुष्टात आला. या सर्व घडामोडींवरच शास्त्री यांनी भाष्य केलं. तसेच भारतीय संघाने मागील ७ वर्षात अनेक सामने जिंकले, मात्र एकदा पराभूत झालो तरी लगेच पेन-पिस्तुल बाहेर येतात, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
रवी शास्त्री म्हणाले, “माझ्याबाबत माझ्या आयुष्यातील मागील ७ वर्षांवरून मतं बनवली जात आहेत. या काळात मी सार्वजनिक आयुष्यात असताना माझी चिकित्सा केली गेली. आता मी न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊन माझी चिकित्सा करणाऱ्यांवर बोलण्याची वेळ आलीय. भारतात क्रिकेटचे अनेक चाहते आहेत त्यामुळे पराभवामुळे टीका होणं स्वाभाविक आहे. मात्र, कधीकधी भारतीय संघावरील टीका खूप कठोर असते. असं असलं तरी ही सर्व टीका मागे टाकून पुढे जाण्याला पर्याय नसतो.”
“पराभवानंतर लोकांकडून दागल्या गेलेल्या ‘गोळ्या’ झेलणं हे प्रशिक्षकाचं काम”
“भारतात क्रिकेट हा धर्म आहे. तुम्ही ५ सामने जिंकल्यानंतर हरता तेव्हा पेन आणि पिस्तुल बाहेर येतात. कधीकधी हे फार विषारी असतं. अशावेळी कोणतीही तक्रार न करता ही टीका सहन करावी लागते. आम्ही खूप वेळा जिंकलो. लोकांना आम्हाला पराभूत पाहण्याची सवय नाही. त्यामुळे पराभवानंतर लोकांकडून झाडलेल्या ‘गोळ्या’ झेलणं हे प्रशिक्षकाचं काम असतं,” असं रवी शास्त्री यांनी सांगितलं. ते रिपब्लिक वर्ल्डशी बोलत होते.
हेही वाचा : कोहली कसोटी, एकदिवसीय संघांचेही कर्णधारपद सोडण्याची शक्यता -शास्त्री
“टीका सहन करून पुढे चालत राहावं लागतं”
“तुम्हाला हे सर्व अडथळे पार करून यावं लागतं. तुम्हाला यामुळे खचून चालत नाही. तुम्हाला संघ त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल यासाठी प्रयत्न करावे लागतात. या प्रवासात टीका सहन करून पुढे चालत राहावं लागतं,” असंही शास्त्री यांनी नमूद केलं.