माझ्या खेळीवरून अनुष्काला लक्ष्य करणाऱ्यांची लाज वाटते; कोहलीची टीका
एका जाहिरातीच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांच्या प्रेमाचा अंकुर फुटला. त्यानंतर प्रेमाच्या खेळपट्टीवर त्याची बहारदार फटकेबाजी सुरु होती, पण क्रिकेटच्या मैदानात मात्र तो तितका यशस्वी ठरत नव्हता. त्यावेळी तिला लक्ष्य करून त्याच्या कामगिरीवर टीका केली जायची. वास्तविक दोन्ही गोष्टींचा काडीमात्रही संबंध नव्हता. पण समाजमाध्यमांवर या विषयांची तिखट-मीठ लावून लज्जत घेतली गेली नाही तरच नवल. पण समाजमाध्यमांवर झालेल्या अतिरेकामुळे आपलं खाजगी आयुष्य चव्हाटय़ावर आल्याची जाणीव भारताचा फलंदाज विराट कोहलीला झाली आणि तो या सुशिक्षितांच्या ‘सवंग’गिरीवर बरसला. माझ्या खेळीवरून अनुष्काला लक्ष्य करणाऱ्यांची लाज वाटते, असे म्हणत त्याने आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली.
सध्या सुरु असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात कोहलीने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध अप्रतिम खेळी साकारल्यावर विराट आणि अनुष्का शर्मा यांच्यावरील संदेशांचा पूर आला. हे सारे समजल्यावर तो म्हणाला की, ‘‘माझ्या खेळातील गुण-दोषांनंतर अनुष्काला टीकेचे लक्ष्य करणाऱ्या लोकांची मला कीव कराविशी वाटते. अशा व्यक्ती जर स्वत:ला सुशिक्षित समजत असतील तर ही शरमेची बाब आहे.’’
अनुष्काशी त्याचे ‘ब्रेक-अप’ झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी वृत्तवाहिन्यांवर आले होते. पण या वृत्ताला या दोघांनाही दुजोरा दिलेला नाही. त्यामुळेच कोहली तिच्याबाबतच्या वक्तव्यांवर भावनिक झाल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. या टीकाकारांना उद्देशून कोहली म्हणाला की, ‘‘समाजमाध्यमांवर असे संदेश टाकणाऱ्या लोकांचा मी आदर करणार नाही. तिच्याबद्दल आदर करायलाच हवा. तिने आतापर्यंत मला प्रेरणा आणि सकारात्मक दृष्टिकोनच दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी तुमच्या बहिणीला, मैत्रिणीला किंवा बायकोला जर कोणी टीकेचे लक्ष्य करत असेल तर ते कसे वाटेल, याचा विचार करायला हवा.’’ ़विराट आणि अनुष्का यांच्यामध्ये अजूनही प्रेमसंबंध कायम असल्याचे काही जणांना वाटते. विरहामध्ये प्रेम वृद्धिंगत होत असते आणि तसेच कोहलीच्या बाबतीतही होत असल्याचे म्हटले जात आहे. बांगलादेशमध्ये काही दिवसांपूर्वी कोहलीने ‘जो वादा किया वो निभाना पडेगा..’ हे गाणे म्हटले होते, ते कोणासाठी होते हे सांगण्याची गरज नाही .

Story img Loader