दक्षिण आफ्रिका महिला संघावर १० धावांनी विजय
महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक
महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आलेल्या श्रीलंकेच्या संघाने सोमवारी दक्षिण आफ्रिकेवर १० धावांनी विजय मिळवून निरोप घेतला. विजयासाठी ११५ धावांचा पाठलाग करणाऱ्या आफ्रिकेला निर्धारित २० षटकांत ७ बाद १०४ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. अर्धशतकी खेळी आणि १ बळी टिपणाऱ्या श्रीलंकेच्या ए. सी. जयांगनीला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज ७० धावांवर माघारी परतले. मात्र, कर्णधार जयांगनीने एका बाजूने तग धरून ठेवताना श्रीलंकेचा धावफलक हलता ठेवला. जयांगनीने ४९ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकार खेचून ५२ धावा केल्या. जयांगनी बाद झाल्यानंतर प्रसादनी विराक्कोडी (१५) आणि इशानी लोकुसुरियागे (१२) यांनी छोटेखानी, परंतु महत्त्वाच्या खेळी करून संघाला शतकी आकडा गाठून दिला. श्रीलंकेने निर्धारित २० षटकांत ७ बाद ११४ धावांचा समाधानकारक पल्ला गाठला. आफ्रिकेच्या मॅरीजान्ने कॅप आणि सुन लूस यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.
प्रत्युत्तरात मैदानावर दाखल झालेल्या आफ्रिकेला डॅन व्हॅन निएकेर्क आणि ट्रिशा चेट्टी यांनी अर्धशतकी सलामी दिली. विजयी पाया रचल्यानंतर इशानीच्या एकाच षटकात या दोघीही एकामागून तंबूत परतल्या. त्यानंतर श्रीलंकेने सामन्यावर पकड घेत अचूक मारा करून आफ्रिकेच्या धावगतीला चाप बसवला. मजबूत स्थितीत असलेल्या आफ्रिकेची अवस्था बिनबाद ५० वरून ६ बाद ८४ अशी दयनीय झाली. तळाच्या फलंदाजांनी विजयासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडल्याने आफ्रिकेला १०४ धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेच्या सुगंधिका कुमारी आणि उदेशिका प्रबोधनी यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक :
श्रीलंका : ७ बाद ११४ (ए.सी. जयांगनी ५२, प्रसादनी विराक्कोडी १५, इशानी लोकुसुरियागे १२; मॅरीजान्ने कॅप २-१७, सुन लूस २-२०) विजयी वि. दक्षिण आफ्रिका : ७ बाद १०४ (डॅन व्हॅन निएकेर्क २४, ट्रिशा चेट्टी २६; सुगंधिका कुमारी २-२४, उदेशिका प्रबोधनी २-१३).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा