‘‘विश्वचषकापूर्वी बरेच काही घडून गेले, पण आम्ही फक्त क्रिकेटवरच लक्ष देण्याचे ठरवले. क्रिकेट मंडळाचे प्रश्न, ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी, हे विषय आम्हाला शिवलेही नाही. आमची कामगिरीच सारे काही बोलून गेली. आमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा हा अभूतपूर्व क्षण आहे,’’ अशा शब्दांत वेस्ट इंडिजची कर्णधार स्टेफनी टेलरने विश्वविजयानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तिच्या या वक्तव्याने बऱ्याच गोष्टींचा वेध घेतला. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि पुरुषांचा संघ यांच्यातील वाद तर चव्हाटय़ावरच आला आहे. या पाश्र्वभूमीवर महिलांच्या क्रिकेटची वेस्ट इंडिजमध्ये काय स्थिती असेल, ही कल्पना करणे कठीण नाही. मंडळाची अनास्था, देशातील गरिबी, जागतिक क्रिकेटमध्ये न मिळणारे सन्मान, यामधून क्रिकेटचा वसा जोपासण्याचे ध्येय म्हणजे अग्निपरीक्षाच. पण ती अग्निपरीक्षा वेस्ट इंडिजच्या महिलांनी दिली आणि त्यामध्ये अभूतपूर्व असे यशही संपादन केले. आता क्रिकेट विश्वाने त्यांना डोक्यावर घेतले आहे, पण हा फक्त त्यांच्या गुणवत्तेचा विजय नाही, तर मानसिकतेचाही विजय आहे. महिला क्रिकेटमधला हा क्रांतिकारक विजय त्यांना मोठय़ा उंचीवर नेऊन ठेवणारा आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड म्हणजेच महिला विश्वचषक, असे समजले जायचे. पण या विजयाने वेस्ट इंडिजने क्रिकेट विश्वाच्या विचारांची परिभाषा बदलायला लावली आहे.
वेस्ट इंडिजचे आव्हान यापूर्वी उपांत्य फेरीतच संपुष्टात येत होते. बऱ्याचदा ऑस्ट्रेलियानेच त्यांची वाट रोखली होती. अंतिम फेरीचा त्यांना अनुभवही नव्हता. पण त्यांची कामगिरी बघा, सारे काही सांगून जाणारी. टेलर आणि मॅथ्यूज यांची सलामी वेस्ट इंडिज संघाची ताकद होती. त्यांच्या मनात खदखदणाऱ्या गोष्टींनी सलामीच्या माध्यमातून त्यांनी वाट मोकळी करून दिली. सदैव हसतमुखपणे त्यांनी बऱ्याच टीका पचवल्या, पण या सामन्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नव्हते, तर अभिमान होता. स्वत:ची ओळख निर्माण केल्याचा.
या महिला संघाला या वेळी पुरुष संघाने समजून घेतले. कारण एका क्रिकेटपटूचे दु:ख दुसरा क्रिकेटपटूच जाणत असतो. पुरुष संघाला सर्व गोष्टींची माहिती होती. त्यामुळेच त्यांनी या महिलांना मानसिक बळ दिले. भेटून चर्चा करून मार्गदर्शन करता येत नसेल, तर संदेशाच्या माध्यमातून नेहमीच पुरुष संघाने खास करून कर्णधार डॅरेन सॅमीने त्यांना प्रेरणा दिली. क्रिकेटच्या मैदानातील प्रत्येक गोष्टीचे बाळकडूच या महिला संघाला पुरुष संघाकडून मिळत होते.
हा विजय महिला क्रिकेटचे डोळे उघडणारा आहे. दडपण न घेता तुमच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवलात तर तुम्ही गगनभरारी घेऊ शकता, हाच संदेश वेस्ट इंडिजच्या संघाने दिला आहे. भारतासारख्या संघाला या कामगिरीतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. कारण आतापर्यंत भारताचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले आहे, त्यांना एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. कदाचित विंडीजच्या विजयाने प्रेरणा घेऊन पुढचा विश्वचषक भारतात येईल, अशी आशा व्यक्त करायला काहीच हरकत नसावी.
प्रसाद लाड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा